Sunday, November 22, 2020

अष्टागरातील शब्दप्रचार

 

श्री गणेशाय नमः

 


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण गेले अनेक दिवस आपल्या अष्टागर ब्राह्मण समाजाविषयी जाणून घेतोय. एव्हाना आपण खूप माहिती जाणून घेतली आहे, आपल्याकडे भारतात दर एक मैलावर भाषा बदलते त्यामुळे बोलीभाषा आणि त्यातील शब्द खूप वेगवेगळे आणि मजेशीर असतात. आलेवाडी गावाबद्दलच्या माझ्या पोस्ट मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे आपण अष्टागरात प्रसिद्ध असणारे काही शब्द, शब्द-प्रचार, म्हणी आज जाणून घेणार आहोत.

आपण जे शब्द पाहणार आहोत त्यातील बरेच शब्द, शब्द प्रचार ,म्हणी आता काळाच्या पडद्याआड दडले गेले आहेत. त्यांना उजाळा देण्याचा माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पालघर हे गुजरात राज्याच्या जवळ असल्या कारणाने काही गुजराती भाषेतील शब्द तसेच्या तसे किंवा थोड्याफार फरकाने आपल्या इथल्या भाषेत रुजले आहेत. तर काही शब्द येथील ब्राह्मणेतर समाजातील बोली भाषेतुन आले आहेत.

यातील काही शब्द, शब्द प्रचार, म्हणी खूप मजेशीर आहेत नक्की वाचा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय, प्रतिक्रिया मला लिहायला बळ देतात आणि त्यामुळे मी हे लेखन करतोय. तुमच्या कमेंट मुळे तुम्ही वाचताय तुम्हाला ते आवडतेय ह्याची पोच पावती मला मिळते.

सुरुवात करतोय कालगणनेशी संबंधित काही शब्दांपासून

·        पाख :- पक्ष

·        चांदणी पाख :- शुक्ल  पक्ष

·        काळोखी पाख :- कृष्ण पक्ष

·        भादवा :- भाद्रपद महिना

·        मगशीर, मक्षीर:- मार्गशीर्ष महिना  

·        घटका/घडका  :- घटिका, "घटकाभर बैस" अशा प्रकारचा शब्द प्रयोग

·        अख्खय :- नेहेमी किंवा अक्षय

आहेत ना मजेशीर शब्द? काही शब्द वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील,  पुढे  अन्न किंवा खाण्याशी संबंधित  काही  शब्द :-

·        पळसांडे :- पळीपडे, ह्या थोडा घट्ट रस्सा असलेली भाजीचा उल्लेख या शब्दाने केला जातो.

·        कठवळ/ कठोळ :- कडधान्य

·        आटवलं :- मऊ भात  

·        रोवळं :- तांदळाच्या रव्यापासून बनवलेला शिरा, मात्र हे रोवळं दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी फराळासोबत असतं.

·        पोळा / पोळे :- मकर संक्रातीला केले जाणारे विशेष प्रकारचे धिरडे (घावन/घावण) .

·        आंबोशी :- कच्ची कैरी कापून वाळवून मीठ लावून ठेवणे. (चिंचेप्रमाणे स्वयंपाकात वापर केला जातो)

·        डांगर :- हिरवा भोपळा

·        अनान :- सीताफळ किंवा सीताफळीचे झाड

·        मोरली  :- विळी

·        करंभट :- कैरीचे तिखट मीठ तेल घालून केलेले तात्पुरते लोणचे  (वाचताना तोंडाला पाणी आले ना?)

·        आळण :- कटाची आमटी किंवा पूरण पोळीच्या डाळीच्या पाण्यापासून तयार होणारी आमटी.

·        शेगट :- शेगवा / शेवगा

·        तूस :- भात किंवा साळीचे टरफल.

·        घट्टी :- मोठे दळणाचे जाते (जातं)

·        तेरी :- पांढरं अळू

·        कवाळी :- कुळी ची भाजी

·        आंबट वरण :- चिंच किंवा कोकम घालून केलेली डाळीची आमटी, येथे अष्टागरात आंबट वरण, गोडं वरण, फोडणीचे वरण खूप प्रसिद्ध आहे. 

·        कणेरी :- तांदूळ भाजून भरडून केली जाणारी पेज, आजारी माणसाला दिला जाणारा पदार्थ.

·        नारळी पाक :- ओल्या नारळाच्या वड्या.

·        कानवले / कानोले :- ओल्या नारळाच्या करंज्या

·        खापरा :- एक प्रकारची पावसाळ्यात येणारी रानभाजी

·        लोणा :- एक प्रकारची रानभाजी

·        शतावेल/ सतावेल :- शतावरीची पाने भाजी म्हणून येथे खाल्ली जाते  

 

खाण्याशी संबंधित शब्दांनंतर काहि वस्तू किंवा जवळपासच्या रोजच्या जागा याबद्दल पुढील शब्द :-

·        शेरी :- गल्ली, छोटा रस्ता

·        सुलुप :- छोटा किंवा मोठा पूल

·        सडक:- रस्ता

·        वई/ वय :- कुंपण (कंपाउंड) 

·        वाडा :- परस, अष्टागरात परस बागेला वाडा म्हणायची पद्धत आहे, यात फळझाडे, फुलझाडे, इतर औषधी झाडे, तुळशी वृंदावन, विहीर असे अनेक प्रकार आढळतात

·        खळे :- सारवून स्वच्छ केलेली जागा जेथे शेतातील भाताच्या पेंड्या ठेवल्या जातात त्यांना झोडपून भात वेगळे केले जाते ती जागा

·        बेडं : - गोठा

·        उडवं:- भाताच्या पेंड्या गोलाकार रचून ठेवल्या जातात किंचितसा मंदिराचा आकार असतो.

·        पारतेक :- प्राजक्त किंवा पारिजातक

·        रोज :-झेंडूचे फुल

·        कचरं :- गवत किंवा शेतातील तण

·        निमडा :- कडुनिंब

·        थेव :- निवडुंग (कॅक्टस)

·        टाकाबारी :- फडताळ, भिंतीतले लाकडी कपाट

·        हडपा :- चाके असणारी मोठी पेटी, पूर्वी यात वाण सामान देखील ठेवत  

·        मुजी :- नेहेमी पेक्षा थोडे मोठे मडके ज्यात वस्तू साठवल्या जात

·        झार :- मोट्ठे मडके ज्यात धान्य साठवले जाइ

·        ओटा / ओटी :- व्हरांडा

·        ओटली:- घरासमोर खास दिवाळीत लाल माती पासून बनवण्यात येणारी पायरी ज्यावर रांगोळी काढतात, हल्ली ह्या ओटल्या नामशेष झाल्या आहेत. 

·        कणा :- रांगोळी हो कणा हा शब्द कणा- रांगोळी असा हि वापरला जातो

·        उंतर :- उंबरठा

 

आणखी काही शब्द :-  

·        देव देवक :- ग्रहमख, लग्न मुंजी प्रसंगी काही दिवस आधी केले जाणारे देव देवतांचे पूजन

·        मेढ :- जुन्या घरामधील घराचा लाकडी आधारस्तंभ लग्नात किंवा शुभ कार्यात मुहूर्त मेढ पूजन केले जाते

·        गहू टिपणे :- लग्नाचा मुहूर्त करून हळद कुटली जाते व गहू तांदूळ निवडण्यास सुरुवात केली जाते, स्त्रिया गाणी गाऊन हा कार्यक्रम साजरा करतात , लग्नापूर्वी पहिली मुंडावळ ह्याच दिवशी बांधली जाते,

·        पारणेट :- वधूवस्त्र, लग्नात पिवळ्या रंगाची खास मामाने घेतलेली वधू साठीची साडी

·        कंड :- खाज येणे

·        लचांड :- नकारात्मक ऊर्जा किंवा शुक्लकाष्ठ मागे लागणे

·        बळणे :- भाजणे थोडा मजेशीर शब्द आहे हा खरेतर रागावून हा शब्द घेतला जातो "बळलं तुझं काम" किंवा "जळलं मेलं लक्षण" या उद्देशाने स्त्रिया हा शब्द वापरात असत पण मजेखातर.

·        पाटा फुटणे :- या शब्दाचा शब्दश: अर्थ न घेता लग्न होणे या साठी गमतीने वापरला जाणारा शब्द प्रचार

·        डोबा :- हा सुद्धा शब्द शक्यतो गमतीने घेतला जातो अर्थ आहे वयाने मोठा, मला असे वाटते कि हा मूळ गुजराती शब्द आहे  "केटलो डोबो थई गयो" असा शब्द गुजराती मध्ये वापरलेला माझ्या ऐकण्यात आहे.   

·        जऊळ :- मळभ

·        नाका वरची  माशी न उडणे :- एखादी व्यक्ती खुप अचपळ असणे 

·        वडा-पिंपळा खाली भेट न होणे :- कुठेच आणि मुळीच भेट न होणे

 

हल्ली फारसे कुणी हे शब्द वापरात आणत नसले तरी सुद्धा या अष्टागराशी नाते सांगणाऱ्या प्रत्येक माणसाला ते हवे हवेसे आहेत. काहींनी पहिल्यांदा वाचले असतील त्यांना खुप गम्मत वाटत असेल, काहींनी खुप वर्षांपूर्वी हे शब्द ऐकले असतील ह्याचा वापर आपल्या भाषेत केला असेल तर कुणाचा सुवर्ण काळ त्यांना ह्या  शब्दांनी जागा झाला असे वाटत असेल. आपण कितीही नागरी भाषा व्यवहारात वापरली तरी आपल्या घरात बोलली जाणारी किंवा आपली जवळची भाषा बोलताना जो खरा आनंद मिळतो त्याला तोड नाही.

धन्यवाद.

वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

11 comments:

  1. खरचं मजा वाटली वाचुन आणी जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete
  2. Hahahaha गंमतीदार शब्द आहेत मस्त😁👍

    ReplyDelete
  3. सुंदर माहिती, नवीन शब्दांचे अर्थ समजले. ज्ञानात भर पडली. धन्यवाद.

    ReplyDelete
  4. Hari Om
    Khup chhan Mahiti द्यानात Navin bhar padli

    ReplyDelete
  5. Hari Om
    Khup chhan Mahiti द्यानात Navin bhar padli

    ReplyDelete
  6. Hari Om
    Khup chhan Mahiti द्यानात Navin bhar padli

    ReplyDelete

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...