Friday, March 28, 2025

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम: 


नमस्कार, 

मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला जातो त्याबद्दल जाणून घेऊयात. मराठी नववर्षाची सुरुवात आपण गुढीपाडव्यापासून करतो हे आपण जाणताच. चला तर मग जाऊयात अष्टागरातील एखाद्या घरात गुढीपाडव्याच्या दिवशी. 

जसा संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा होतो तसाच इथेही अगदी उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी घराच्या अगदी सर्वोच्च ठिकाणी उभारायची पद्धत आहे. सकाळीच लवकर उठून बांबूची काठी स्वच्छ केली जाते त्यावर भरजरी वस्त्र, सोवळे किंवा सुंदर साडी ठेऊन त्यावर कलश किंवा तांब्याचा तांब्या उपडा ठेवला जातो. गुढीला चाफ्याची माळ (त्याला खाली आंब्याचे टहाळ), झेंडूचा हार, कडुनिंबाची कोवळी पाने असलेली फांदी, साखरेची माळ (बत्ताश्याच्या गाठी) घातली जाते. 

त्या सोबत एका पाटावर कलश, त्यावरील नारळावर तीन छोट्या काड्या रोवल्या जातात. ह्या काड्यांवर चाफ्याची फुले किंवा झेंडूची फुले ओवलेली असतात. तसेच पाटावर नवीन वर्षाचे पंचांग ठेवले जाते, एखादा गोड पदार्थ आणि हो कडुनिंबाच्या पानाची चटणी असतेच. गुढीची, कलशाची तसेच पंचांगाची षोडशोपचार पूजा करण्याची पद्धत आहे. 

त्यानंतर गुढी उभारली जाते. खाली पायरीत रांगोळी काढून त्यावर कलश असलेला पाट ठेवला जातो ह्या कलाशासमोर दिवा अणि अगरबत्ती लावली जाते, गुढीचे पूजन केले जाते. कडुनिंबाच्या पानाची चटणी घरातल्या प्रत्येकाला खायला दिली जाते. गोडाधोडाचा नैवैद्य दाखवला जातो. श्रीखंड/आम्रखंड पुरी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, वरण-भात तूप, पापड, लोणचं आपल्या प्रथेप्रमाणे किंवा आवडीनिवडी नुसार स्वयंपाक असतो.   




ह्या सोबतच दुपारी तुळशीत एक गळती बांधली जाते. होय येणाऱ्या उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाला अखंड पाणी मिळत राहावे ह्यासाठी ही तजवीज केली जाते. एका छोट्याश्या सुगड्याला खाली एक भोक पाडले जाते आणि त्यातून थेंब थेंब पाणी पडत राहिल अशाप्रकारे ते सुगडे किंवा बोळके पाणी भरून टांगले जाते. दररोज त्यात पाणी घातले म्हणजे तुळशीच्या पाण्याची सोय झाली. पहा निसर्गाचा किती विचार केला गेला आहे इतक्या छोट्याश्या कृतीने.   




संध्याकाळी गुढी खाली उतरवली जाते, थोडा फार फरक वगळता अशाप्रकारे अष्टागरात गुढीपाडवा साजरा केला जातो.

धन्यवाद.

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...