श्री
गणेशाय नमः
श्री हरबा देवी, वेढी |
नमस्कार , मी अजित विनोद पंडीत, आपल्या नवीन पोस्ट मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत, आपण अष्टागरातील आतापर्यंत ७ गावे पाहिली तसंच नवरात्री निमित्त विशेष पोस्ट "कुलस्वामिनी", आणि नवान्न पौर्णिमा विशेष पोस्ट देखील वाचलीत. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात तसेच प्रोत्साहन दिलेत, अष्टागरातील ८ मूळ गावे जरी आज पूर्ण होत असली तरी देखील माझे लिखाण सुरु राहणारच आहे. येथील बोलीभाषेतील शब्द, येथील सण, समारंभ, येथील समाजातील पारंपारिक गाणी, रांगोळ्या, तसेच काही कर्तृत्ववान व महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती, येथील शिक्षक, पुरोहित, सरपंच त्यांच्याबद्दल माहिती असे बरेच काही आपण माझ्या पुढे येणाऱ्या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात आजच्या गावाबद्दल.
वेढी :- आज आपण वेढी ह्या गावाबद्दल माहिती घेणार आहोत,
गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता भोवताली खाडी आणि डोंगर ह्याने वेढलेले हे नयनरम्य
गाव आहे त्यामुळे वेढी हे नाव अतिशय साजेसे
वाटते आहे. सफाळे रेल्वे स्थानकापासून अंदाजे ५ किलोमीटर
वर वेढी हे गाव वसले आहे. धामणगाव म्हणून देखील वेढी ओळखले जात होते तशी सरकार दरबारी नोंद आहे. गावाच्या दिशानुसार गावाचे वर्णन केले तर गावाच्या पूर्व
दिशेला वेशीवर श्री वेताळ देवांचे मंदिर आहे. पश्चिम दिशेला मोठे तलाव असून काठावर
ग्रामदेवता श्री हरबादेवीचे जागृत देवस्थान आहे येथे श्री अतुल तिवाड आणि श्री अरुण तिवाड
ह्यांच्या दोन पिढ्या नित्यपूजन करतात. उत्तरेला आणखी एक पाणवठा असून श्री वाघोबा देव
वेशीची राखण करतात. ईशान्य वेशीवर देखील आणखी एक तलाव असून श्री महादेवाचे पवित्र मंदिर
आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री मारुतीचे मंदिर आहे.
![]() |
शिवलिंग, वेढी |
![]() |
श्री महादेव मंदिर |
शिक्षकांचे गाव म्हणून देखील ह्या गावाची वेगळी अशी ओळख आहे, प्रत्येक घरात किमान दोन शिक्षक आहेतच, येथील शिक्षकांचा मी आता नावाने उल्लेख करत नाही पण मी लवकरच अष्टागारातील शिक्षक मंडळींवर पोस्ट लिहिणार आहे त्यात मी सगळ्यांचा उल्लेख नक्की करेन. पौरोहित्य हा देखील येथील अतिशय महत्वाचा भाग आहे. क्रिकेट तर येथील मंडळींच्या रक्तात आहे. गावातील ब्रह्मवृंदांची लोकसंख्या अंदाजे ५० असून बाहेर कामानिमित्त असणारी लोकसंख्या १३५ असावी.
गावात
तिवाड, पाध्ये, आणि
साठे ही कुटुंबे राहतात. तिवाड कुटुंबाचे गोत्र कात्यायन असून श्री महालक्ष्मी
त्यांची कुलस्वामिनी आहे तर कुलपुरुष श्री खंडोबा आहे.
पाध्ये
कुटुंबीयांची कुलस्वामिनी श्री मुजबा देवी, मांडे असून जमदग्नी हे गोत्र आहे. येथील
साठे कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महाजाई देवी, महागाव असून गोत्र भारद्वाज आहे.
वेढी
गाव हे अष्टागरातील इतर गावांप्रमाणे अतिशय उत्सवप्रिय आहे. येथील श्रीकृष्ण जन्मोत्सवाला
जुना इतिहास आहे. श्री हनुमान जयंतीला येथे जत्रौत्सव असतो तर दुसऱ्या दिवशी श्री हरबादेवीचा
जत्रौत्सव असतो. "दिलीप मित्र मंडळ"
ह्या माध्यमातून गावात अनेक कार्यक्रम राबवले जातात उत्सवात श्री उल्हास पाध्ये ह्यांच्या
नेतृत्वाखाली येथे नाटकाचे प्रयोग केले जातात वेढी गाव आणि नाटक-अभिनयाचा खूप जुना
संबंध आहे. येथील बरेचसे पुरोहित टीव्ही सिरीयल मध्ये झळकले आहेत, रिअल लाईफ चे पुरोहित
रील लाईफ मध्ये देखील छोट्या पडद्यावर अधून मधून दिसत असतात.
![]() |
श्री कृष्ण मूर्ती, वेढी येथील जन्मोत्सव |
![]() |
श्री मारुती, वेढी |
वेढी गावाचे विशेष म्हणजे गावात चार स्वातंत्र्य सैनिक झाले आहेत त्यातील दोन आपल्या समाजाचे आहेत कै. श्री दत्तात्रय हरी तिवाड आणि कै. श्री दयाराम गोविंद पाध्ये (मनोर). देशासाठी कै. श्री दत्तात्रय हरी तिवाड ह्यांनी तुरुंगवास भोगला आहे. खूप हिरीरीने स्वातंत्र्य लढ्यात दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला होता.
विशेष उल्लेखनीय :- श्री स्वप्नील मंगेश पाध्ये हे व्यवसायाने CA (चार्टर्ड अकाउंटंट) आहेत तेही पहिल्या प्रयत्नात. श्री प्रसाद हरिश्चंद्र तिवाड ह्यांचा वेदभ्यास दांडगा आहे. गोरेगावस्थित श्री राजन वसंत पाध्ये हे बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात नगरसेवक आहेत ते तीन वेळा निवडून आले आहेत. श्री मोहित पाध्ये हे ज्योतिष आणि वास्तुविशारद आहेत. श्री प्रवीण तिवाड ह्यांचे डोंबिवली येथे स्वतःचे क्लासेस आहेत.येथील श्री प्रशांत प्रकाश तिवाड लंडन येथे पंचतारांकित होटेल मध्ये उच्चपदस्थ आहेत. कु.सौरभ नंदकुमार तिवाड हे Ethical Hacker असून BE आहेत Robotics मध्ये अभ्यास केला असून १० वित ९१% गुण मिळवले होते.श्री संदेश पाध्ये हे प्रध्यापक आहेत. येथील भाईंदर स्थित कै. श्री राजाराम दामोदर पाध्ये (नाना) हे विशेष कार्यकारी अधिकारी होते तसेच अनेक लोकाभिमुख कार्य केली असून पेन्शन असोसिएशन चे अध्यक्ष होते. श्री नरेश कुलकर्णी ह्यांचे वधुवर सूचक मंडळ आहे. कै.श्री पुरूषोत्तम काशीनाथ पाध्ये हे वनविभागात उच्चपदस्थ होते. आणखी काही उल्लेखनीय नावे कै. कांताभाई साठे (समाज सेवक), श्री अनिल तिवाड (नाट्यक्षेत्र पुरस्कार प्राप्त) हे आणि इतर श्री केशव सखाराम तिवाड, श्री नारायण विष्णू पाध्ये, श्री नारायण गोविंद पाध्ये, श्री शरद पाध्ये, श्री दिनकर पाध्ये, श्री अरुण पाध्ये, श्री जयप्रकाश पाध्ये, श्री विकास तिवाड, श्री हरिशचंद्र तिवाड, श्री प्रकाश तिवाड ह्यांनी समाज एकीकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे.
येथील
श्री उमेश अच्युत साठे हे सिव्हिल इंजिनीअर असून अतिशय कठीण किंवा किचकट समजला जाणारा
विरार येथील रेल्वे मार्गावरील
पूर्व पश्चिम जोडणारा पूल, तसेच दांडा खाडी केळवे येथील पूल आणि वैतरणा खाडीवरील रेल्वे पूल
बांधकामात त्यांचा अतिशय मोठा वाटा आहे.
येथील
श्री उल्हास भाऊराव पाध्ये म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात
त्यांची कामगिरी मोठी आहे, "शिवरायांची सून ताराराणी आणि दरोडेखोर" , चौकट
राजा " ह्या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र
राज्य नाट्य स्पर्धेसाठी वेढी गावाने पालघर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते ह्यात
सात पारितोषिके श्री उल्हास पाध्ये ह्यांच्या प्रयत्नामधून मिळाली आहेत निःसंशय इतर
सर्व कलाकरांचा त्यात वाटा आहे. श्री उल्हासजी राजकारणात देखील सक्रिय असून मोठ्या
राजकीय पक्षात ते उच्चपदस्थ आहेत. तसेच समाजासाठी आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतात.
नवीन तरुणांना नेहेमीच प्रोत्साहित करत असतात.
![]() |
तलाव आणि वेढितील डोंगरी |
येथील विरारस्थित श्री आशिष रामचंद्र साठे आणि श्री जितेंद्र रामचंद्र साठे ह्यांचे "आशिष साठे क्लासेस" पंचक्रोशीत खूप प्रसिद्ध आहेत, गेली पंधरा वर्षे क्लासेस अविरत सुरु आहेत. आगरवाडी, माकुणसार आणि विरार (पूर्व) अशा तीन शाखा ह्या क्लासेसच्या आहेत श्री आशिष यांच्या पत्नी सौ स्वप्नाली आशिष साठे ह्यांचे शिशुवर्ग किंवा छोटे स्कूल "होरायझन किड्स अकॅडमी" विरार येथे सुरु आहे.वेढी गावातील आणखी विशेष उल्लेख करावा असे दुसरं दाम्पत्य म्हणजे श्री अभिजीत अनिल तिवाड आणि सौ अंकिता अभिजीत तिवाड, श्री अभिजीत ह्यांनी फुलशेती करण्याचा आगळा वेगळा प्रयोग केला असून त्यात त्यांना यश मिळत आहे, सौ अंकिता ह्यांचा खास मराठमोळे पेहेराव design करून देण्याचा "शुभवस्त्रम" हा व्यवसाय आहे व खूप चांगला प्रतिसाद आहे. एक नमूद करावेसे वाटते की मी टेंभी गावातील श्री दर्पण पंडित ह्यांचा उल्लेख केला होता कि शाळेत १० वीत त्यांचा ८५% गुण मिळवण्याचा रेकॉर्ड बरीच वर्ष कोणी मोडला नव्हता तो सौ अंकिता ह्यांनी ८९% गुण मिळवून मोडला होता.
वेढी
येथील पूर्वाश्रमीच्या निशा भाऊराव पाध्ये ह्यांचे सुपुत्र श्री सिद्धांत
प्रवीण जोशी हे यूटुबर आहेत त्यांचे दहा लाखांपेक्षा जास्त
subscribers (चाहते) आहेत पुढील लिंक वर क्लिक करून त्यांच्या चॅनेलला नक्की भेट द्या
"श्रीमान लिजेंड". येथील मीनाक्षी पाध्ये (पूर्वआश्रमीचे नाव) ह्यांचे पुत्र श्री किरण कुलकर्णी हे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये लेखक आहेत अनेक मालिका त्यांनी लीहील्या आहेत सध्या गाजत असलेली मालिका "अग्ग बाई सासू बाई" देखील त्यांनी लिहिली आहे. तसेच कलाकार आणि असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्यांचे चित्रपट :- हुप्पा हुय्या आणि आणि चिंतामणि.
येथील
स्त्रिया देखील मागे नाहीत गावातील सौ आशा अनिल तिवाड ह्या दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य
होत्या त्यात त्या एकदा उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळत होत्या तर काही वर्ष सरपंच पद देखील त्यांनी सांभाळले आहे. त्यांच्या कन्या अनामिका अनिल तिवाड प्राध्यापिका आहेत.
येथील बोईसरस्थित डॉक्टर भक्ती उल्हास पाध्ये ह्या family physician आणि
consulting homeopath आहेत त्यांचे Heal RX क्लीनिक असून सायन, चेंबूर आणि वसई येथे
शाखा आहेत, तसेच त्या कोविड योद्धा आहेत. येथील काही लेकी शिक्षिका आहेत. येथील मालाडस्थित सानिका हरिशचंद्र तिवाड(पूर्वआश्रमीचे नाव) ह्यांचा आस्वाद केटरर्स ह्या नावाने हॉटेल, कॅटरिंग व इव्हेंट मॅनेजमेंट चा व्यवसाय आहे.
श्री
मुजबा देवी :- वेढी येथील पाध्ये कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी आहे. मांडा, सफाळे येथे
देवीचे स्थान आहे. देवीचे मंदिर सुंदर असून समोर पुरातन विहीर आहे, मनशांती साठी हे
ठिकाण अतिशय योग्य आहे. छायाचित्रांमध्ये आपण ते अनुभवू शकता.
देवीबद्दल :- कै केशवराव कुशाबा आचार्य ह्यांना श्री तुळजा भवानी देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि "मांडा सफाळे येथे आसपासच्या टेकडीवर मी श्री मुजबा देवी या नावाने स्वयंभू प्रकट झाले आहे तू मला माझे स्थान बांधून दे" अशाच प्रकारचे स्वप्न गोसावी श्री सोमगिरी हे मांड्यात आले होते तेव्हा त्यांना पडले होते "तू मुंबईला जाऊन श्री केशवरावांना भेट आणि त्यांना इथे घेऊन ये"असे देवीचे सांगणे होते, गोसावी आणि श्री केशवराव तसेच त्यांचे बंधू श्री गणेश आचार्य ह्या सर्वांनी मांडे परिसरात येऊन बैलगाडीत स्वयंभू प्रकट मूर्ती घेतली आणि सफाळेच्या दिशेने प्रवास सुरु केला पुढे जात असताना गावाच्या वेशीवर गाडीचा बैल आज देवीचे मंदिर आहे तिथे बसून पडला हेच ते स्थान. ही जागा केशवरावांनी विकत घेऊन वैशाख शुद्ध पौर्णिमा शके १८१४ इसवी सॅन १८९२ रोजी देवीची स्थापना केली.
श्री महाजाई :- वेढी येथील साठे कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी असून बोईसर पासून अंदाजे ७ किलोमीटर वर महागाव वसले आहे तेथेच श्री महाजाई देवीचे सुंदर स्थान आहे. देवीचे मंदिर एका छोटेखानी घराप्रमाणे आहे अतिशय सुंदर मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला अनेक वृक्ष आहेत परिसर अतिशय लोभस आहे एकूणच मन प्रसन्न करणारे हे पवित्र स्थान आहे.
मंदिरामध्ये देवीच्या मूर्ती सोबत आणखी काही पुरातन मूर्ती आहेत. मंदिरासमोर तुळशीवृंदावन आहे. देवीचे देखणे रूप , छानदार नथ मन प्रसन्न करते. देवीसमोर संगमरवर दगडामध्ये कोरलेली देवीची पाऊले खूप रेखीव आहेत.
![]() | |
श्री मुजबा देवी, मांडा |
सौजन्य :- ही पोस्ट लिहिण्यासाठी मला श्री उल्हास पाध्ये आणि श्री प्रसाद पाध्ये ह्यांनी खूप मदत केली आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो.
वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या
वाचा आलेवाडी बद्दल माहिती
वाचा नांदगाव बद्दल माहिती
वाचा टेंभी बद्दल माहिती
वाचा सरावली बद्दल माहिती
वाचा बहाड बद्दल माहिती
वाचा पोखरण बद्दल माहिती
वाचा अष्टागर प्रस्तावना
खुपच छान माहीती आहे
ReplyDeleteछान अजित दादा मूळे अष्टागरातील गावे पाहिली नाही त्यांची माहिती मिळते
ReplyDeleteधन्यवाद पुनम
Delete