श्री गणेशाय नमः
नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आपल्या दिवाळी विशेष दुसऱ्या पोस्ट मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. दिवाळी जशी सगळी कडे साजरी होते तशीच अष्टागरात देखील साजरी होतेच. जशी येथे आठवड्याची प्रथा आहे तशाच इथे आणखी काही वेगळ्या प्रथा आहेत. दिवाळीत येथे इतर प्रथांसोबत आणखी काय केले जाते चला पाहूया.
एऱ्या बेऱ्या:- सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात एऱ्या बेऱ्या म्हणजे काय. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अष्टागरात हा पायंडा किंवा ही प्रथा आहे. तिन्ही सांजेला येथे पणत्यांसोबत काही दिवट्या पाजळल्या जातात. आपल्या महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दिवट्या आहेत पण ह्या दिवट्या थोड्या वेगळ्या आहेत, निवडुंगापासून किंवा थेवापासून (येथील बोलीभाषेत त्याला थेव म्हणतात) ह्या बनवल्या जातात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकवीस दिवट्या तिन्ही सांजेला पाजळल्या जातात. एका पाटावर ह्या दिवट्या ठेवल्या जातात, त्यांची पंचोपचार किंवा षोडशोपचाराने पूजा केली जाते. या एकवीस दिवट्यांपैकी २० दिवट्या तेलाच्या असतात आणि १ दिवटी तुपाची असते. तुपाची दिवटी तुळशीत ठेवली जाते आणि ती विचंवासाठी असते वर्षभरात कोणालाही विचुदंश होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. ही दिवटी लावून विंचवास प्रार्थना केली जाते कि तू आमच्यापासून दूर रहा. एक तेलाची दिवटी परसात सापासाठी ठेवली जाते आणि त्यालाही प्रार्थना केली जाते कि आमच्या पासून दूर रहा.
उरलेल्या एकोणीस दिवट्यांपैकी काही घरात तर काही ओटीवर तसेच अंगणात, गोठ्यात लावल्या जातात एक दिवटी शौचालयात देखील ठेवली जाते. या दिवट्यांसोबत पणत्या देखील असतात त्यामुळे दिवाळीत रोजच्या पेक्षा अंमळ जास्त लखलखाट असतो. थोड्या फार प्रमाणात बदल असले तरी मूळ पद्धती अष्टागरात सारख्याच आहेत.
आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या दिवट्या ठेवताना आरोग्यासाठी एक प्रकारची प्रार्थना केली जाते,
एऱ्या बेऱ्या डुंमडुंम काऱ्या
ईड जावो पीड जावो
ताप जावो झाप जावो
खईन जावो खोकला जावो
घरच्या धन्याला सुखी ठेव
पूर्वी लहान मोठे सगळेच जण दिवट्या ठेवताना हे गात असत हल्ली कालानुरूप त्यात थोडा बदल जाणवतो.
ह्या दिवट्या कशा बनवल्या जातात :- सकाळीच निवडुंग (कॅक्टस ) येथील बोली भाषेत थेव आणून त्याचे एकसमान एकवीस तुकडे केले जातात त्या तुकड्यांना कोयता किंवा कटर च्या मदतीने दिवट्यांचा आकार दिला जातो आणि कडक उन्हात या दिवट्या वाळवल्या जातात. कापसाच्या वाती लावून त्या पाजळतात.
बळीराज :- आता पुढे जाऊयात आणि पाहुयात आणखी पुढे काय होते, अष्टागारातील दिवाळीत साजरा होतो बळीराज. बलिप्रतिपदेला सकाळी बळीराज पेटवला जातो, ह्या दिवशी मुख्यरस्त्यावर आडवे गावत, केरकचरा, पालापाचोळा , पेंड्या पसरून बळीराज रचला जातो. आणि त्याला अग्नी दिला जातो.
ह्या दिवशी अष्टागरात गुरांना धुवून त्यांच्या शिंगाना गेरूने रंगवले जाते, बळीराजाचा आग्निदाह थोडा कमी झाला कि ह्यावरून गुरे उंच उड्या मारून पलीकडे जातात. गुरांना त्रास होऊ नये याकडे लक्षही दिले जाते. त्यानंतर नमस्कार करून कपाळी उदी लावून कार्यक्रमाची सांगता होते, काही हौशी मंडळी त्यात फटाके फोडतात.
बलिप्रतिपदेला भल्या पहाटे येथील गृहिणी घरातील केर-कचरा आणि जुनी केरसुणी घेऊन त्यावर एक दिवटी(निवडुंगाची) ठेवते आणि हा केर बाहेर नेऊन ठेवते. घरातील अलक्ष्मी बाहेर जाउन शुभ लक्ष्मी घरात येण्यासाठी प्रार्थना करते.
याच दिवशी भल्यापहाटे अंगणात शेणापासून गोवर्धन साकार करून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी बळी साकारून पूजन केले जाते.
![]() |
दिवट्या |
रोवळे :- दिवाळी चा विषय सुरु आहे आणि फराळ कसा मागे असेल, इथे दिवाळीच्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला इतर फराळासोबत रोवळे किंवा रवळे खाल्ले जाते. तांदळाच्याच्या रव्यापसुन हे बनविले जाते.
घरातील स्त्रिया नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी रात्री हे रोवळ शिजवून ठेवतात. आणि पहाटे पहिल्या आंघोळी नंतर त्याचा नैवद्य दाखवतात, पायाखाली चिरडले चिरोटे किंवा कारोटे म्हणजे नरकासुर आणि हे रोवळे म्हणजे त्याचे काळीज त्याचा आस्वाद घेतला जातो ह्या रोवळयाचे छान तुकडे पडतात.
तांदळाचा रवा, नारळ, दूध, तूप, गुळ, सुका मेवा घालून हे रोवळ करण्याची प्रथा आहे. मी काही मास्टर शेफ नाही त्यामुळे रेसिपी मला काही येत नाही. पण अष्टागरातील लेकी सुना नक्की हे करतात त्यांना विचारून आपण ह्या वर्षी नक्की बनवायचा प्रयत्न करा.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.... ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची आणि भरभराटीची जावो.
धन्यवाद
अजित विनोद पंडीत.
वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या
Hari Om
ReplyDeleteदिवाळीच्या अनिरुद्ध शुभेच्छा
माहिती खूप छान आहे
माझ्या करिता सर्व माहिती नवीन आहे
ही प्रथा नवीन समजली
धन्यवाद
धन्यवाद...इथल्या प्रथा परंपरा जाणून घेण्यासाठी नेहमी वाचत रहा... पुनश्च धन्यवाद, आपण आवर्जून अभिप्राय देता.
DeleteHari om
ReplyDeleteSundar likhan,apratim