Wednesday, March 17, 2021

अष्टागरातील साखरपुडा

 श्री गणेशाय नमः



नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या शृंखलेच्या पुढच्या कडी मध्ये आपले सगळयांचे स्वागत. मागच्या भागात आपण "कुंकू लावणे" ह्या प्रथेबद्दल जाणून घेतलेत. आज आपण "वाङ्निश्चय" अर्थात साखरपुड्याबद्दल जाणून घेणार आहोत.

लग्न जमले आणि वधुस कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडला की वेध लागतात साखरपुड्याचे. बैठकीत किंवा कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात साखरपुड्याचा मुहूर्त पाहिला जातो, घरातील जाणती मंडळी पंचांग पाहून योग्य तो मुहूर्त काढतात किंवा गुरुजींना विचारून सवडीनुसार साखरपुडा ठरतो.

वधु आणि वरपक्ष दोन्ही कडे आनंदाचे आणि लगबगीचे वातावरण असते. शक्यतो साखरपुडा वधु पक्षाकडे असतो किंवा दोन्ही पक्ष सोयीनुसार ठिकाण ठरवतात. वधूपक्षाकडून किंवा ज्या पक्षाकडे कार्य असते त्या पक्षाकडून साखरपुड्याचे स्थळ, गुरुजी, भोजन व्यवस्था, मंडप व्यवस्था याची तजवीज केली जाते.

सगळ्यात आवडीचे म्हणजे दोन्हीही पक्षात खरेदी सुरू होते, वराचा पोशाख आणि अंगठी वधु पक्ष आणि वधूची साडी आणि अंगठी वरपक्ष खरेदी करतात. अर्थात वधू वराच्या आवडीनुसार खरेदी केली जाते. दोन्ही पक्ष एकमेकांशी संवाद साधून या सर्व गोष्टी करीत असतात, ह्यामध्ये दोन्ही पक्षातून प्रत्येकी एक व्यक्ती पुढाकार घेऊन संवाद साधतात किंवा लग्न जुळवून देणारी मध्यस्त व्यक्ती हे कार्य आनंदाने पार पाडत असते.

पाहुण्यांचे यथायोग्य स्वागत झाले की आपले आराध्य दैवत श्री गणेशाचे पूजन केले जाते वधु आणि वराचे आईवडील किंवा जवळचे नातेवाईक दांपत्य यजमानपद भूषवतात, गुरुजींच्या/ भटजींच्या उपस्थितीत सर्व कार्य केले जाते.







वरपक्षाकडून (वधूस पाटावर किंवा चौरंगावर बसवून) वधुची ओटी भरून साडीचोळी आणि सौंदर्य प्रसाधने दिली जातात तसेच पुष्पमाला घातली जाते. तसेच यथाशक्ती एखादा दागिना वधुस भेट दिला जातो. वरास देखील वधूपक्षाकडून पोशाख आणि यथायोग्य आहेर देवून सन्मान केला जातो तसेच पुष्पमाला घातली जाते. वधूचे तसेच वराचे पाच सुवासिनी औक्षण करतात. वधूची साखरपुड्यातील ओटी खास लग्नापर्यंत जपून ठेवली जाते.  

हिरव्या रंगाच्या साडीत वधु 


वधु वर दोघेही समोरच्या पक्षाकडून मिळालेला पेहेराव करतात, वधूची साडी शक्यतो हिरवी असते किंवा कुठल्याही शुभरंगाची असते. वधुवर एकमेकांना अंगठी घालून वाङ्निश्चय पार पाडतात तसेच एकमेकांना साखरपुडा दिला जातो.

वधु-वराच्या नातेवाईकांचा तसेच  करवलीचा दोन्ही पक्षांकडून मानपान केला जातो. सुवासिनीच्या ओट्या भरून त्यांचा सन्मान केला जातो. गजरा किंवा फुले दिली जातात. व्याही भेट होते तसेच इतर नातेवाईक उदा. वधू चे काका व वराचे काका एकमेकांस आलिंगन देऊन श्रीफळ देतात त्याच प्रमाणे स्त्रीवर्गात देखील एकमेकींना भेटण्याचा कार्यक्रम होतो. 

दोन्ही पक्षांकडून आणलेले पेढे एकत्र करुन पाहुण्यांना दिले जातात, तसेच आप्तस्वकीय व शेजाऱ्यांना वाटले जातात. आनंदाने स्नेहभोजन केले जाते वधुवरास उखाण्यात एकमेकांचे नाव घेण्याचा आग्रह नाही झाला तर नवलच.

लग्नाचा मुहूर्त, ठिकाण, वेळ याच वेळी निश्चित करण्यात येते. अशाप्रकारे आनंदात साखरपुडा संपन्न होतो.

पुढील भागात आपण "गहू टिपणे/ निवडणे" ह्या प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत.

धन्यवाद.

फोटो सौजन्य :- श्री अभिजित तिवाड व सौ अंकिता तिवाड.






वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



5 comments:

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...