श्री गणेशाय नमः
नमस्कार,
मी अजित विनोद पंडीत अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखमालेत आपलं सगळ्यांच मनःपूर्वक स्वागत. आपण आत्तापर्यंत वधुस कुंकू लावणे, साखरपुडा आणि गहू टिपणे ह्याबद्दल माहिती करून घेतली आहे. आपल्या लग्नसमारंभ ह्या लेखांना किंवा पोस्टना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, तुमच्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून मिळत आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. आपल्या ह्या पोस्ट (भारतात) सर्वात जास्त पुण्यात वाचल्या जातात तर भारताबाहेर अमेरिकेत वाचल्या जातात, कॅनडा, दुबई मध्ये देखील वाचकवर्ग आहे. मी आपल्या सर्व वाचकांना धन्यवाद देतो आणि आपल्या विषयाकडे येतो.
आज आपण "देव देवक" किंवा ग्रहमख ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. लग्नाला अगदी काही दिवस राहिले की देव देवता आणि ग्रहांचे पूजन केले जाते. शक्यतो देवक हे लग्न किंवा मुंजेच्या आधी समसंख्येने म्हणजे दोन, चार किंवा सहा दिवस ह्या प्रमाणे स्थापले जाते. एकदा देव देवक झाले की लग्नविधी मध्ये सोयर सुतक आले तरी त्याची अडचण होत नाही, पूढील कार्य निःसंकोचपणे पार पाडता येतात.
सकाळी घरातील देव-देवतांचा आशीर्वाद घेऊन वराकडून/वधुकडून घराच्या मुहूर्तमेढीची पूजा केली जाते.
या दिवशी नवग्रह पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, घाणा, जात्याचे पूजन, तसेच नंदिनीं देवतांचे पूजन, तसेच यज्ञ/हवन केले जाते. वधु/वर आई वडील आणि करवली यांच्या हस्ते हे कार्य पार पाडले जाते.
ग्रहमखाच्या वेळी घरचा आहेर देण्याची प्रथा आहे. घरातील मंडळी म्हणजेच वर किंवा वधूचे जवळचे नातेवाईक किंवा आईचे माहेरचे या वेळी पहिला आहेर देतात.
आपल्याकडे आंब्याच्या वृक्षाला शुभकार्यात अढळ स्थान आहे, आंब्याच्या पानांच्या माळा, कलशावर आंब्याची पाने, तोरण तर ग्रहमखासाठी नंदिनी देवता तयार केल्या जातात, आंब्याच्या छोटया डहाळ्या घेऊन त्यास आंब्याचे पान गुंडाळून वर धागा बांधला जातो अशा या सहा नंदिनीं देवतांचे पूजन करण्याचा प्रघात आहे शास्त्रानुसार त्यांना नांदीन्यादि मंडप देवता असे म्हणतात..
आपण जो दारापुढे मंडप घालतो त्यास पूर्वी ५ खांब असत चहूबाजूला ४ आणि १ खांब मध्ये आधारस्तंभ असे एकूण ५ खांब तसेच मंडपाच्या प्रवेशद्वारी १ खांब असे तो ६ वा खांब. ह्या सहा खांबांना ह्या देवता आवाहन आणि पूजन करून बांधल्या जात असत त्या पुढील प्रमाणे नंदिनी, नलिनी, मैत्रा, उमा, पशुवर्धिनी ह्या पाच मंडपात आणि मंडपाचे रक्षण करण्यासाठी सहावी मंडपाबाहेर शस्त्रगर्भा भगवती. हल्ली मंडपाची पूर्वीसारखी पावित्र्यता राखता येत नसल्या कारणाने त्यांस घरात देवकाशेजारी सुपामध्ये पूजन करून स्थानापन्न केले जाते.
![]() |
नंदीनी देवतांचे पूजन |
घाणा :- रोवळी (बांबू पासून बनवलेली उखळी) मध्ये दोन मुसळ ठेवली जातात दोन्ही मुसळांना एकत्र आंब्याच्या पानांची माळ घातली जाते. रोवळीमध्ये भात(साळी), उडीद, सुपारी, तांदूळ आणि हळकुंड घातले जातात आणि कांडले/कुटले जाते, वधु/वर आणि इतर ५ सुवासिनी मिळून ही रित करतात सोबतीला पारंपरिक गाणी असतातच. त्यास घाणा पाडणे/ भरणे असे म्हणतात.
पहिला घाणा घालू खंडिये भाताचा,
मंडपी गोताचा गणराज,
दुसरा घाणा घालू खंडिये गुलाल,
मंडपी दलाल गणराज,
तिसरा घाणा घालू खंडिये सुपारी,
मंडपी व्यापारी गणराज,
चौथा घाणा घालू खंडिये खारीक,
मंडपी बारीक गणराज,
पाचवा घाणा घालू खंडिये हळद,
मंडपी दळद गणराज.
तद्नंतर जात्यावर उडीद दळले जातात, जात्याला आंब्याच्या पानाची माळ घातली जाते, त्यात उडीद घालून वर/वधु आणि इतर स्त्रिया जात्यावर उडद्या मुहूर्त करतात. जात्यावर उडीद दळताना पारंपरिक गाणी गायली जातात.
जात्यानरे गणपती तुला तांदुळाचा घास,
वर/ वधू मोतीयाचा घोस.
जात्यानरे गणपती तुला सुपारी वाहिली,
वर/वधुस हळद लागली,
जात्यानरे गणपती तुला दूर्वाची जुडी,
अम्माघरी ग कार्य मोरया ग घाली उडी,
अशाप्रकारे आनंदात देवदेवक स्थापित केले जाते लग्न झाल्यानंतर त्याची उत्तरपूजा केली जाते.
गाण्यांसाठी विशेष आभार:- माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत (पूर्वाश्रमीचे नाव),
तसेच श्री प्रसाद तिवाड आणि श्री विजय पंडीत ह्यांचे खूप आभार.
धन्यवाद.
![]() |
ऑर्डर साठी 9637847937 ह्या क्रमांकावर संपर्क करा |