श्री गणेशाय नमः
नमस्कार,
मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखमालेत आपले सगळ्यांचे स्वागत, या लेखमालेतील हे तिसरे पुष्प आहे. आज आपण "गहू टिपणे" या प्रथेबद्दल माहिती करून घेणार आहोत. काही ठिकाणी यास भात हळदीचा मुहूर्त असे म्हंटले जाते मात्र अष्टागरात "गहू टीपणे" म्हणतात. मी वाचकांना आवाहन करतो की आपल्या या प्रथा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्धेशाने जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, फेसबुकवर शेअर करा जेणे करून आपल्या या रितिभाती सर्वश्रुत होतील.
साखरपुडा आटोपला की लगबग सुरू होते आमंत्रणांची, कुलस्वामिनी, ग्रामदेवता तसेच घरातील देवांना आमंत्रण पत्रिका देऊन झाली की बाकी आमंत्रणे केली जातात. लग्नाला काही दिवस राहिले की गहू टिपण्याचा कार्यक्रम केला जातो, काही ठिकाणी आमंत्रणं सुरू करण्यपूर्वी सुद्धा हा कार्यक्रम शुभमुहूर्त म्हणून केला जातो.
वरपक्ष आणि वधुपक्ष दोन्ही ठिकाणी हा घरगुती कार्यक्रम केला जातो, वधूपक्ष आपल्या घरी आणि वरपक्ष आपल्या घरी (मुखत्वे स्त्रिया) हा कार्यक्रम पार पाडतात, ह्यासाठी शेजारील तसेच आळीतील स्त्रियांना खास आमंत्रण दिले जाते.
या दिवशी पहिली मुंडावळ बांधली जाते आणि शक्यतो जुनी मुंडावळ बांधण्याची प्रथा आहे. या कार्यक्रमात कोरे सूप घेऊन सुपास आंब्याच्या पानाची माळ बांधली जाते, त्यात गहू ठेवले जातात या गव्हांमध्ये पाच खडे, पाच खारका, पाच हळकुंड घातले जातात किंवा आपल्या प्रथेनुसार इतर गोष्टी घातल्या जातात, समई प्रज्वलित केली जाते. होणाऱ्या वधुचे किंवा वराचे औक्षण केले जाते, त्यानंतर ह्या सुपाभोवती स्त्रिया आणि वर किंवा वधु बसून गव्हांमघ्ये हात फिरवत पारंपारिक गाणी गातात. सोबत व्हीडिओ आहे तो नक्की पहा.
"सारवल्या भिंती, वर काढिले पोपट,
वधूचे/ वराचे नाव माझ्या ग बाळाच्या लग्नाची खटपट."
"सारवल्या भिंती वर काढिली ताम्हणं,
वधूचे/ वराचे नाव माझ्या ग बाळाच्या लग्नाची सामानं."
व्हीडिओ
केळवणासाठी लागणारी हळद खास वराकडून/ वधुकडून कुटून घेतली जाते. खलबत्त्याला गोल आंब्याच्या पानाची माळ बांधली जाते व त्यात हळद कुटली जाते. प्रथमतः वर/वधुकडून हळद कुटली की स्त्रिया उरलेली हळद कुटतात सोबत परंपरेने चालून आलेली गाणी गातात.
वराकडून मुहूर्तमणी आणि त्यात काळेमणी ओवून घेतले जातात. हा कार्यक्रम म्हणजे विवाहाची दिनांक जवळ आल्याची एकप्रकारे आठवणच आहे. हा कार्यक्रम अल्पउपहार करून संपन्न होतो.
पूर्वी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गहू, तांदूळ निवडले जात, पापड व इतर वाळवणं केली जात, लोणची मुरांबे करून लग्नासाठी लागणारी सर्व तयारी केली जाई.
"रात्री दळू गहू, दिवसा दळू पापडीच,
..........माझ्या ग बाळाचं लग्न आलं तातडीचं,"
"रात्री दळू गहू, दिवसा दळू पापड पिठी,
........माझ्या ग बाळाचं लग्न आलं कोण्या तिथी"
आणखी एक गाणे :-
"जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
बापापाशी पुसू लागला, माझे लग्न कधी कराल सांगा मला.
जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
आईपाशी पुसू लागला, माझी वरमाय कधी होशील सांग मला.
जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
बहिणीपाशी पुसू लागला, माझी करवली कधी होशील सांग मला.
आपण या लेखात ज्या गाण्यांचा उल्लेख केला आहे ती गाणी कोणी लिहिली कधी लिहिली ह्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत मात्र गाणी अवीट गोडीची आहेत आणि आजही मनात जपून ठेवलेली आहेत, तर काही गाणी काळाच्या पडद्याआड गेली आहेत. माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत(पूर्वाश्रमीचे नाव) हिच्याकडच्या गाण्यांचा ठेवा मी येथे उल्लेखला आहे, तीचे खूप आभार.
धन्यवाद.
Hari Om
ReplyDeleteगहू टिपणे कारेक्रम छान व.गाणी पण.सुंदर
छान माहीती आहे
ReplyDeleteधन्यवाद
Delete