Thursday, February 18, 2021

अष्टागरातील खाद्यसंस्कृती

                                                                    श्री गणेशाय नमः  

 नमस्कार,

माझे नाव अजित विनोद पंडीत आहे, अष्टगरातील माहिती आपण माझ्या पोस्ट मध्ये वाचत असता. माझ्या या पोस्टमध्ये आपण अष्टगरातील खाद्य संस्कृती बद्दल महिती करून घेणार आहोत. आपल्या अष्टागरात अतिशय चविष्ट आणि सात्विक स्वयंपाक केला जातो. अतिशय साध्या पद्धतीचे पण रुचकर भोजन येथील पानात वाढले जाते. मी अष्टागरातील प्रत्येक अन्नपूर्णेस नमन करून आपल्या आजच्या विषयाकडे येतो.

अष्टागरात सर्वांना प्रिय आहे ते वालाचे बिरडे, काही मंडळी त्यास डाळिंब्या म्हणतात मात्र येथे बिरडे हाच शब्दप्रचार आहे. शेवगाच्या शेंगा (येथील बोलीभाषेत शेगटाच्या शेंगा) आणि बिरडे ही भाजी म्हणजे फक्कड बेत. येथे बिरड्यासोबत अनेक भाज्या असतात, अनेक रानभाज्यांना या बिरड्याने रुचकरपणा येतो. शेवगाची पाने आणि बिरडे ह्याची भाजी आणि आमटी खूप लोकप्रिय आहे. केळफूल, फणस, मोहाची फळे(मोट), माठाचे देठ तसेच शिराळा(दोडका), मेथी, दुधी, बटाटा, अळू, तेरी(पांढरे अळू), रानभाजी टाखळा, खापरा, शतावरी,  कुळी(कवाळी), शिंद(कोवळा बांबू, वास्ता) अगदी कारले सुद्धा बिरड्यात घातले जाते. या भाज्या भातासोबत छान लागतात, भात म्हणजे येथील मंडळींचा जीव की प्राण आहे.  येथील नैवेद्यामध्ये भातासोबत आवर्जून बिरड्याची भाजी हजेरी लावत असते.

शेवगाच्या शेंगा आणि बिरडे

येथील शेतीमध्ये पिकणारा लाल वाल येथे खूप आवडीने खाल्ला जातो. लाल वालाची उसळ तर खुपच आवडीची आहे, बटाटयासोबत देखील ह्या वालाची उत्तम भाजी केली जाते. आंबट वरण भात आणि वालाची भाजी म्हणजे अप्रतिम बेत.

येथे आमटीला आंबट वरण म्हणतात, वरणाचे अनेक प्रकार अष्टागरात प्रसिद्ध आहेत. चिंच थोडासा गूळ घालून तुरीच्या डाळीचे वरण केले जाते त्यास आंबट वरण म्हणतात. कच्ची कैरी, शेवगाच्या शेंगा, बटाटा, मुळा, वांगे देखील येथील वरणाला सांबर प्रमाणे चविष्ट बनवतात. डाळीला फोडणी देऊन फोडणीचे वरण केले जाते तर तुरीच्या डाळीच्या साध्या वरणास आम्ही गोडं वरण म्हणतो. खूप मसाले विविध प्रकारची वाटणे किंवा अतिशय कांदा लसूण न वापरता येथील स्वयंपाक केला जातो तेलाचा हातही थोडा आखडताच असतो. 

येथे पातळ भाज्यांना आमटी म्हंटले जाते वरणाला दुसरा पर्याय म्हणून ह्याकडे पाहिले जाते. अळूच्या पानाची आमटी येथे अतिशय लोकप्रिय आहे काही मंडळी त्यास फदफदं म्हणतात पण येथे तिला आमटीच म्हंटले जाते. थोडासा गुळ, खोबरे, चिंच, डाळ किंवा बिरडे, शेंगदाणे आणि काही मोजके मसाल्याचे पदार्थ घालून ही फक्कड आमटी केली जाते. येथील गृहिणीच्या हातची अळूची आमटी खाल्ल्यानंतर हात धुतला तरी त्या आमटीचा खमंग दर्प बराच वेळ हातावर राहतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला येथे रानभाजी शेवळी येते शेवळ्याची आमटी येथील बहुतांश मंडळींचा जीव की प्राण आहे. शिळी आमटी देखील खूप चविष्ट लागते.

शेगटाच्या पानाची आमटी, पालकाची आमटी आणि हो चिंचेचा सार येथे केला जातो, चिंचेच्या कोळात ओला नारळ, आणि काही मसाले घालून आमटी केली जाते त्यास चिंचेचा सार म्हणतात.

कटाची आमटी म्हणजे येथील बोली भाषेत आळणाची आमटी देखील आवडीने लोक खातात.

भाकरी, पोळ्या, घावन देखील स्वयंपाकघरात बनत असले तरी शक्यतो नाष्टा म्हणून खाल्ले जाते, पोळी सोबत बटाट्याच्या काचऱ्या(काप) येथे खूप प्रसिध्द आहेत. भाकरी सोबत पिठले, पातळ पिठले किंवा कोरडे पिठले खाल्ले जाते. चटणी घावन भाजी किंवा आमटी सोबत घावन पानात येतात. संक्रांतीला येथे खास आंबवलेले घावन केले जातात त्यास पोळा म्हणतात. अतिशय चविष्ट असतात हे पोळे. नाश्त्यासाठी आटवले(मऊभात) देखील केले जाते, नवीन तांदळाचे आटवले खूप चविष्ट असते, मऊभाताचा प्रकार कणेरी (कण्हेरी) खास आजारी माणसाला दिली जाते पचायला अतिशय हलकी असते. अन्न वाया घालवू नये या उद्देशाने उरलेल्या भाताचा फोडणीचा भात देखील येथे नाश्त्याला आवडीने खाल्ला जातो.

संक्रांतीमध्ये केले जाणारे पोळे

चटण्यामध्ये कच्च्या चिंचेची चटणी, कैरीची, ओल्या नारळाची चटणी, काही ठिकाणी शेंगदाण्याची लाल चटणी केली जाते. कैरीचे करंभट येथे आवडीने खाल्ले जाते, कैरीचे फोड त्यात तेल तिखट मीठ घालून तात्पुरते लोणचे केले जाते त्यास करंभट म्हणतात. कैरी किंवा कच्चा आंबा मिठाच्या पाण्यात किंवा मिठात खारवला जातो त्यास पाण्यातला आंबा म्हणतात जेवताना तोंडी लावायला उत्तम पर्याय आहे. येथील पानात कोशिंबिरी पण अधून मधून हजेरी लावत असतात.

उकडीचे मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या, गुळ पापडी, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, मुगाचे लाडू, खीर ही मिष्टान्न लोक आवडीने खातात, पुरणपोळी होळीत आवर्जून केली जाते. ओल्या नारळाच्या वड्या देखील येथील स्त्रिया सुरेख करतात त्यास नारळी पाक म्हणतात. पितृ पक्षात उंबर केले जातात गोड घारगे म्हणू शकतो त्यास, तांदळाची खीर देखील या पानात ठेवली जाते. येथे तिखट घारग्यांना वडे म्हणतात.

    
नारळी पाक

                                
अळूवडी, कवाळीचे(कुळीचे) मुटगे(मुडगे), कांदा भजी, बटाटा भजी आणि विविध प्रकारची भजी, देखील येथे प्रसिद्ध आहे.

अशा प्रकारे अनेक पद्धतीने आणि अनेक प्रकारची व्यंजने, खाद्यपदार्थ येथे तयार केले जातात. त्यातील फक्त काहींचा मी येथे उल्लेख केला आहे मात्र आणखी अनेक पदार्थ येथे स्वयंपाकात समाविष्ट असतात, त्याला उजाळा देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे, तुम्हाला आवडल्यास नक्की कंमेंट करा.

धन्यवाद,


पुढील लिंकवर क्लिक करून इतर पोस्ट वाचा. 










वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Sunday, November 22, 2020

अष्टागरातील शब्दप्रचार

 

श्री गणेशाय नमः

 


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण गेले अनेक दिवस आपल्या अष्टागर ब्राह्मण समाजाविषयी जाणून घेतोय. एव्हाना आपण खूप माहिती जाणून घेतली आहे, आपल्याकडे भारतात दर एक मैलावर भाषा बदलते त्यामुळे बोलीभाषा आणि त्यातील शब्द खूप वेगवेगळे आणि मजेशीर असतात. आलेवाडी गावाबद्दलच्या माझ्या पोस्ट मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे आपण अष्टागरात प्रसिद्ध असणारे काही शब्द, शब्द-प्रचार, म्हणी आज जाणून घेणार आहोत.

आपण जे शब्द पाहणार आहोत त्यातील बरेच शब्द, शब्द प्रचार ,म्हणी आता काळाच्या पडद्याआड दडले गेले आहेत. त्यांना उजाळा देण्याचा माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पालघर हे गुजरात राज्याच्या जवळ असल्या कारणाने काही गुजराती भाषेतील शब्द तसेच्या तसे किंवा थोड्याफार फरकाने आपल्या इथल्या भाषेत रुजले आहेत. तर काही शब्द येथील ब्राह्मणेतर समाजातील बोली भाषेतुन आले आहेत.

यातील काही शब्द, शब्द प्रचार, म्हणी खूप मजेशीर आहेत नक्की वाचा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय, प्रतिक्रिया मला लिहायला बळ देतात आणि त्यामुळे मी हे लेखन करतोय. तुमच्या कमेंट मुळे तुम्ही वाचताय तुम्हाला ते आवडतेय ह्याची पोच पावती मला मिळते.

सुरुवात करतोय कालगणनेशी संबंधित काही शब्दांपासून

·        पाख :- पक्ष

·        चांदणी पाख :- शुक्ल  पक्ष

·        काळोखी पाख :- कृष्ण पक्ष

·        भादवा :- भाद्रपद महिना

·        मगशीर, मक्षीर:- मार्गशीर्ष महिना  

·        घटका/घडका  :- घटिका, "घटकाभर बैस" अशा प्रकारचा शब्द प्रयोग

·        अख्खय :- नेहेमी किंवा अक्षय

आहेत ना मजेशीर शब्द? काही शब्द वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील,  पुढे  अन्न किंवा खाण्याशी संबंधित  काही  शब्द :-

·        पळसांडे :- पळीपडे, ह्या थोडा घट्ट रस्सा असलेली भाजीचा उल्लेख या शब्दाने केला जातो.

·        कठवळ/ कठोळ :- कडधान्य

·        आटवलं :- मऊ भात  

·        रोवळं :- तांदळाच्या रव्यापासून बनवलेला शिरा, मात्र हे रोवळं दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी फराळासोबत असतं.

·        पोळा / पोळे :- मकर संक्रातीला केले जाणारे विशेष प्रकारचे धिरडे (घावन/घावण) .

·        आंबोशी :- कच्ची कैरी कापून वाळवून मीठ लावून ठेवणे. (चिंचेप्रमाणे स्वयंपाकात वापर केला जातो)

·        डांगर :- हिरवा भोपळा

·        अनान :- सीताफळ किंवा सीताफळीचे झाड

·        मोरली  :- विळी

·        करंभट :- कैरीचे तिखट मीठ तेल घालून केलेले तात्पुरते लोणचे  (वाचताना तोंडाला पाणी आले ना?)

·        आळण :- कटाची आमटी किंवा पूरण पोळीच्या डाळीच्या पाण्यापासून तयार होणारी आमटी.

·        शेगट :- शेगवा / शेवगा

·        तूस :- भात किंवा साळीचे टरफल.

·        घट्टी :- मोठे दळणाचे जाते (जातं)

·        तेरी :- पांढरं अळू

·        कवाळी :- कुळी ची भाजी

·        आंबट वरण :- चिंच किंवा कोकम घालून केलेली डाळीची आमटी, येथे अष्टागरात आंबट वरण, गोडं वरण, फोडणीचे वरण खूप प्रसिद्ध आहे. 

·        कणेरी :- तांदूळ भाजून भरडून केली जाणारी पेज, आजारी माणसाला दिला जाणारा पदार्थ.

·        नारळी पाक :- ओल्या नारळाच्या वड्या.

·        कानवले / कानोले :- ओल्या नारळाच्या करंज्या

·        खापरा :- एक प्रकारची पावसाळ्यात येणारी रानभाजी

·        लोणा :- एक प्रकारची रानभाजी

·        शतावेल/ सतावेल :- शतावरीची पाने भाजी म्हणून येथे खाल्ली जाते  

 

खाण्याशी संबंधित शब्दांनंतर काहि वस्तू किंवा जवळपासच्या रोजच्या जागा याबद्दल पुढील शब्द :-

·        शेरी :- गल्ली, छोटा रस्ता

·        सुलुप :- छोटा किंवा मोठा पूल

·        सडक:- रस्ता

·        वई/ वय :- कुंपण (कंपाउंड) 

·        वाडा :- परस, अष्टागरात परस बागेला वाडा म्हणायची पद्धत आहे, यात फळझाडे, फुलझाडे, इतर औषधी झाडे, तुळशी वृंदावन, विहीर असे अनेक प्रकार आढळतात

·        खळे :- सारवून स्वच्छ केलेली जागा जेथे शेतातील भाताच्या पेंड्या ठेवल्या जातात त्यांना झोडपून भात वेगळे केले जाते ती जागा

·        बेडं : - गोठा

·        उडवं:- भाताच्या पेंड्या गोलाकार रचून ठेवल्या जातात किंचितसा मंदिराचा आकार असतो.

·        पारतेक :- प्राजक्त किंवा पारिजातक

·        रोज :-झेंडूचे फुल

·        कचरं :- गवत किंवा शेतातील तण

·        निमडा :- कडुनिंब

·        थेव :- निवडुंग (कॅक्टस)

·        टाकाबारी :- फडताळ, भिंतीतले लाकडी कपाट

·        हडपा :- चाके असणारी मोठी पेटी, पूर्वी यात वाण सामान देखील ठेवत  

·        मुजी :- नेहेमी पेक्षा थोडे मोठे मडके ज्यात वस्तू साठवल्या जात

·        झार :- मोट्ठे मडके ज्यात धान्य साठवले जाइ

·        ओटा / ओटी :- व्हरांडा

·        ओटली:- घरासमोर खास दिवाळीत लाल माती पासून बनवण्यात येणारी पायरी ज्यावर रांगोळी काढतात, हल्ली ह्या ओटल्या नामशेष झाल्या आहेत. 

·        कणा :- रांगोळी हो कणा हा शब्द कणा- रांगोळी असा हि वापरला जातो

·        उंतर :- उंबरठा

 

आणखी काही शब्द :-  

·        देव देवक :- ग्रहमख, लग्न मुंजी प्रसंगी काही दिवस आधी केले जाणारे देव देवतांचे पूजन

·        मेढ :- जुन्या घरामधील घराचा लाकडी आधारस्तंभ लग्नात किंवा शुभ कार्यात मुहूर्त मेढ पूजन केले जाते

·        गहू टिपणे :- लग्नाचा मुहूर्त करून हळद कुटली जाते व गहू तांदूळ निवडण्यास सुरुवात केली जाते, स्त्रिया गाणी गाऊन हा कार्यक्रम साजरा करतात , लग्नापूर्वी पहिली मुंडावळ ह्याच दिवशी बांधली जाते,

·        पारणेट :- वधूवस्त्र, लग्नात पिवळ्या रंगाची खास मामाने घेतलेली वधू साठीची साडी

·        कंड :- खाज येणे

·        लचांड :- नकारात्मक ऊर्जा किंवा शुक्लकाष्ठ मागे लागणे

·        बळणे :- भाजणे थोडा मजेशीर शब्द आहे हा खरेतर रागावून हा शब्द घेतला जातो "बळलं तुझं काम" किंवा "जळलं मेलं लक्षण" या उद्देशाने स्त्रिया हा शब्द वापरात असत पण मजेखातर.

·        पाटा फुटणे :- या शब्दाचा शब्दश: अर्थ न घेता लग्न होणे या साठी गमतीने वापरला जाणारा शब्द प्रचार

·        डोबा :- हा सुद्धा शब्द शक्यतो गमतीने घेतला जातो अर्थ आहे वयाने मोठा, मला असे वाटते कि हा मूळ गुजराती शब्द आहे  "केटलो डोबो थई गयो" असा शब्द गुजराती मध्ये वापरलेला माझ्या ऐकण्यात आहे.   

·        जऊळ :- मळभ

·        नाका वरची  माशी न उडणे :- एखादी व्यक्ती खुप अचपळ असणे 

·        वडा-पिंपळा खाली भेट न होणे :- कुठेच आणि मुळीच भेट न होणे

 

हल्ली फारसे कुणी हे शब्द वापरात आणत नसले तरी सुद्धा या अष्टागराशी नाते सांगणाऱ्या प्रत्येक माणसाला ते हवे हवेसे आहेत. काहींनी पहिल्यांदा वाचले असतील त्यांना खुप गम्मत वाटत असेल, काहींनी खुप वर्षांपूर्वी हे शब्द ऐकले असतील ह्याचा वापर आपल्या भाषेत केला असेल तर कुणाचा सुवर्ण काळ त्यांना ह्या  शब्दांनी जागा झाला असे वाटत असेल. आपण कितीही नागरी भाषा व्यवहारात वापरली तरी आपल्या घरात बोलली जाणारी किंवा आपली जवळची भाषा बोलताना जो खरा आनंद मिळतो त्याला तोड नाही.

धन्यवाद.

वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

Saturday, November 14, 2020

अष्टागरातील दिवाळी

श्री गणेशाय नमः 


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आपल्या दिवाळी विशेष दुसऱ्या पोस्ट मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. दिवाळी जशी सगळी कडे साजरी होते तशीच अष्टागरात देखील साजरी होतेच. जशी येथे आठवड्याची प्रथा आहे तशाच इथे आणखी काही वेगळ्या प्रथा आहेत. दिवाळीत येथे इतर प्रथांसोबत आणखी काय केले जाते चला पाहूया.  

एऱ्या बेऱ्या:- सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात एऱ्या बेऱ्या म्हणजे काय. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अष्टागरात हा पायंडा किंवा ही प्रथा आहे. तिन्ही सांजेला येथे पणत्यांसोबत काही दिवट्या पाजळल्या जातात. आपल्या महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दिवट्या आहेत पण ह्या दिवट्या थोड्या वेगळ्या आहेत, निवडुंगापासून किंवा थेवापासून (येथील बोलीभाषेत त्याला थेव म्हणतात) ह्या बनवल्या जातात. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकवीस दिवट्या तिन्ही सांजेला पाजळल्या जातात. एका पाटावर ह्या दिवट्या ठेवल्या जातात, त्यांची पंचोपचार किंवा षोडशोपचाराने पूजा केली जाते. या एकवीस दिवट्यांपैकी २० दिवट्या तेलाच्या असतात आणि १ दिवटी तुपाची असते. तुपाची दिवटी तुळशीत ठेवली जाते आणि ती विचंवासाठी असते वर्षभरात कोणालाही विचुदंश होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. ही दिवटी लावून विंचवास प्रार्थना केली जाते  कि तू आमच्यापासून दूर रहा. एक तेलाची दिवटी परसात सापासाठी ठेवली जाते आणि त्यालाही प्रार्थना केली जाते कि आमच्या पासून दूर रहा.

उरलेल्या एकोणीस दिवट्यांपैकी काही घरात तर काही ओटीवर तसेच अंगणात, गोठ्यात लावल्या जातात एक दिवटी शौचालयात देखील ठेवली जाते. या दिवट्यांसोबत पणत्या देखील असतात त्यामुळे दिवाळीत रोजच्या पेक्षा अंमळ जास्त लखलखाट असतो. थोड्या फार प्रमाणात बदल असले तरी मूळ पद्धती अष्टागरात सारख्याच आहेत. 

आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या दिवट्या ठेवताना आरोग्यासाठी एक प्रकारची प्रार्थना केली जाते,

एऱ्या बेऱ्या डुंमडुंम काऱ्या

ईड जावो पीड जावो

ताप जावो झाप जावो  

खईन जावो  खोकला जावो

घरच्या धन्याला सुखी ठेव 

पूर्वी लहान मोठे सगळेच जण दिवट्या ठेवताना हे गात असत हल्ली कालानुरूप त्यात थोडा बदल जाणवतो.


ह्या दिवट्या कशा बनवल्या जातात :- सकाळीच निवडुंग (कॅक्टस ) येथील बोली भाषेत थेव आणून त्याचे एकसमान एकवीस तुकडे केले जातात त्या तुकड्यांना कोयता किंवा कटर च्या मदतीने दिवट्यांचा आकार दिला जातो आणि कडक उन्हात या दिवट्या वाळवल्या जातात. कापसाच्या वाती लावून त्या पाजळतात.


बळीराज :- आता पुढे जाऊयात आणि पाहुयात आणखी पुढे काय होते, अष्टागारातील दिवाळीत साजरा होतो बळीराज. बलिप्रतिपदेला सकाळी बळीराज पेटवला जातो, ह्या दिवशी मुख्यरस्त्यावर आडवे गावत, केरकचरा, पालापाचोळा , पेंड्या पसरून बळीराज रचला जातो. आणि त्याला अग्नी दिला जातो.

ह्या दिवशी अष्टागरात गुरांना धुवून त्यांच्या शिंगाना गेरूने रंगवले जाते, बळीराजाचा आग्निदाह थोडा  कमी झाला कि ह्यावरून गुरे उंच उड्या मारून पलीकडे जातात. गुरांना त्रास होऊ नये याकडे लक्षही दिले जाते. त्यानंतर नमस्कार करून कपाळी उदी लावून कार्यक्रमाची सांगता होते, काही हौशी मंडळी त्यात फटाके फोडतात.

बलिप्रतिपदेला भल्या पहाटे येथील गृहिणी घरातील केर-कचरा आणि जुनी केरसुणी घेऊन त्यावर एक दिवटी(निवडुंगाची) ठेवते आणि हा केर  बाहेर नेऊन ठेवते. घरातील अलक्ष्मी बाहेर  जाउन शुभ लक्ष्मी घरात येण्यासाठी प्रार्थना करते.

याच दिवशी भल्यापहाटे अंगणात शेणापासून गोवर्धन साकार करून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी बळी साकारून पूजन केले जाते. 

दिवट्या


रोवळे  :- दिवाळी चा विषय सुरु आहे आणि फराळ कसा मागे असेल, इथे दिवाळीच्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला इतर फराळासोबत रोवळे  किंवा रवळे खाल्ले जाते. तांदळाच्याच्या रव्यापसुन हे बनविले जाते. 

घरातील स्त्रिया नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी रात्री हे रोवळ शिजवून ठेवतात. आणि पहाटे पहिल्या आंघोळी नंतर त्याचा नैवद्य दाखवतात, पायाखाली चिरडले चिरोटे किंवा कारोटे म्हणजे नरकासुर आणि हे रोवळे म्हणजे त्याचे काळीज त्याचा आस्वाद घेतला जातो ह्या रोवळयाचे छान तुकडे पडतात.

तांदळाचा रवा, नारळ, दूध, तूप, गुळ, सुका मेवा घालून हे रोवळ करण्याची प्रथा आहे. मी काही मास्टर  शेफ नाही त्यामुळे रेसिपी मला काही येत नाही. पण अष्टागरातील लेकी सुना नक्की हे करतात त्यांना विचारून  आपण ह्या वर्षी नक्की बनवायचा प्रयत्न करा.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.... ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची आणि भरभराटीची जावो.

धन्यवाद

अजित विनोद पंडीत.

वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

Sunday, November 8, 2020

अष्टागरातील आठवडा

 

श्री गणेशाय नमः


नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, आपण आजच्या विशेष पोस्ट मध्ये अष्टागरात दिवाळसण सुरु होण्याआधी वातावरण निर्मिति कशी होते ते जाणून घेणार आहोत. येथे दिवाळी आधी आठवडा साजरा केला जातो, काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात. 

आठवडा :-  अष्टागरात दिवाळीची चाहूल लागते ती आठवड्यापासून, अश्विन महिन्यातील कालाष्टमीला येथे संध्याकाळी आठवडा साजरा केला जातो तो कसा ते आपण पाहू. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि त्याचा पगडा आपल्या सणवारांवर आहे हे काही मी वेगळे सांगायला नको.  अश्विन महिना म्हणजे अष्टागरातील भातशेती मध्ये पिकलेले भात घरात आलेले असते आणि हे धान्य मोठाल्या कणग्यांमध्ये साठवून ठेवले जाते आणि अशा कणग्या कायम घरात भरलेल्या राहाव्या या श्रद्धेने हा सण साजरा केला जातो.

हल्ली फारसे कुणी शेती करत नसले तरी काही ठिकाणी आजही शेती केली जाते आणि घरात कणगे भरून भात साठवले जाते. ह्याचेच प्रतीक म्हणून आंगणात रांगोळीने कणग्या / कणगे काढले जातात. पूर्वी भाताच्या टरफलापासून (येथील बोलीभाषेत त्यास तूस म्हणतात ) रांगोळी तयार केली जात असे हा तूस जाळला की रांगोळी तयार होते. ही रांगोळी एक उत्तम दंतमंजन देखील आहे.

अर्थात या दिवशी घरातील स्त्रिया अंगणात गोलाकार मोठ्या आकाराचे कणगे रांगोळीने काढतात, सोबत शिडी आणि त्याचा रखवालदार देखील रांगोळीने साकारला जातो. तसेच गोठ्यामध्ये गाईची पाऊले आणि चंद्र सूर्य रांगोळीने साकारले जातात. पायरीवर रांगोळ्या काढल्या जातात. तिन्हीसांजेला ह्या कणग्यावर नवीन पिकवलेले धान्य ठेवले जाते तसेच पणती ठेवून पूजा केली जाते. घराच्या ओटिवर पणत्या देखील लावल्या जातात. असा हा आठवडा साजरा  झाला की दिवाळीची चाहूल लागते.

मी काही छायाचित्र सोबत जोडत आहे त्यामुळे आपल्याला कल्पना येईल की कशाप्रकारे रांगोळ्या साकारल्या जातात. 





रांगोळीने साकारलेला कणगा / कणगी 





अंगणात साकारलेल्या कणग्या /रांगोळ्या. 




धन्यवाद,

वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना




Wednesday, November 4, 2020

अष्टागरातील वेढी गाव

 

श्री गणेशाय नमः

श्री हरबा देवी, वेढी 

नमस्कार , मी अजित विनोद पंडीत, आपल्या नवीन पोस्ट मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत, आपण अष्टागरातील आतापर्यंत ७ गावे पाहिली तसंच नवरात्री निमित्त विशेष पोस्ट "कुलस्वामिनी", आणि नवान्न पौर्णिमा विशेष पोस्ट देखील वाचलीत. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात तसेच प्रोत्साहन दिलेत, अष्टागरातील ८ मूळ गावे जरी आज पूर्ण होत असली तरी देखील माझे लिखाण सुरु राहणारच आहे.  येथील बोलीभाषेतील शब्द, येथील सण, समारंभ, येथील समाजातील पारंपारिक गाणी, रांगोळ्या, तसेच काही कर्तृत्ववान व महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती, येथील शिक्षक, पुरोहित, सरपंच त्यांच्याबद्दल माहिती असे बरेच काही आपण माझ्या पुढे येणाऱ्या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात आजच्या गावाबद्दल. 

वेढी  :- आज आपण वेढी ह्या गावाबद्दल माहिती घेणार आहोत, गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता भोवताली खाडी आणि डोंगर ह्याने वेढलेले हे नयनरम्य गाव आहे त्यामुळे  वेढी हे नाव अतिशय साजेसे वाटते आहे.  सफाळे रेल्वे स्थानकापासून अंदाजे ५ किलोमीटर वर वेढी हे गाव वसले आहे. धामणगाव म्हणून देखील वेढी ओळखले जात होते तशी सरकार दरबारी नोंद आहे. गावाच्या दिशानुसार गावाचे वर्णन केले तर गावाच्या पूर्व दिशेला वेशीवर श्री वेताळ देवांचे मंदिर आहे. पश्चिम दिशेला मोठे तलाव असून काठावर ग्रामदेवता श्री हरबादेवीचे जागृत देवस्थान आहे येथे श्री अतुल तिवाड आणि श्री अरुण तिवाड ह्यांच्या दोन पिढ्या नित्यपूजन करतात. उत्तरेला आणखी एक पाणवठा असून श्री वाघोबा देव वेशीची राखण करतात. ईशान्य वेशीवर देखील आणखी एक तलाव असून श्री महादेवाचे पवित्र मंदिर आहे.  गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री मारुतीचे मंदिर आहे.

शिवलिंग, वेढी 

श्री महादेव मंदिर 

शिक्षकांचे गाव म्हणून देखील ह्या गावाची वेगळी अशी ओळख आहे, प्रत्येक घरात किमान दोन शिक्षक आहेतच, येथील शिक्षकांचा मी आता नावाने उल्लेख करत नाही पण मी लवकरच अष्टागारातील शिक्षक मंडळींवर पोस्ट लिहिणार आहे त्यात मी सगळ्यांचा उल्लेख नक्की करेन. पौरोहित्य हा देखील येथील अतिशय महत्वाचा भाग आहे. क्रिकेट तर येथील मंडळींच्या रक्तात आहे. गावातील ब्रह्मवृंदांची लोकसंख्या अंदाजे ५० असून बाहेर कामानिमित्त असणारी लोकसंख्या १३५ असावी.

गावात तिवाड, पाध्ये, आणि साठे ही कुटुंबे राहतात. तिवाड कुटुंबाचे गोत्र कात्यायन असून श्री महालक्ष्मी त्यांची कुलस्वामिनी आहे तर कुलपुरुष श्री खंडोबा आहे.

पाध्ये कुटुंबीयांची कुलस्वामिनी श्री मुजबा देवी, मांडे असून जमदग्नी हे गोत्र आहे. येथील साठे कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महाजाई देवी, महागाव असून गोत्र भारद्वाज आहे. 

वेढी गाव हे अष्टागरातील इतर गावांप्रमाणे अतिशय उत्सवप्रिय आहे. येथील श्रीकृष्ण जन्मोत्सवाला जुना इतिहास आहे. श्री हनुमान जयंतीला येथे जत्रौत्सव असतो तर दुसऱ्या दिवशी श्री हरबादेवीचा जत्रौत्सव असतो.  "दिलीप मित्र मंडळ" ह्या माध्यमातून गावात अनेक कार्यक्रम राबवले जातात उत्सवात श्री उल्हास पाध्ये ह्यांच्या नेतृत्वाखाली येथे नाटकाचे प्रयोग केले जातात वेढी गाव आणि नाटक-अभिनयाचा खूप जुना संबंध आहे. येथील बरेचसे पुरोहित टीव्ही सिरीयल मध्ये झळकले आहेत, रिअल लाईफ चे पुरोहित रील लाईफ मध्ये देखील छोट्या पडद्यावर अधून मधून दिसत असतात.

श्री कृष्ण मूर्ती, वेढी येथील जन्मोत्सव 



श्री मारुती, वेढी 

वेढी गावाचे विशेष म्हणजे गावात चार स्वातंत्र्य सैनिक झाले आहेत त्यातील दोन आपल्या समाजाचे आहेत कै. श्री दत्तात्रय हरी तिवाड आणि कै. श्री दयाराम गोविंद पाध्ये (मनोर). देशासाठी कै. श्री दत्तात्रय हरी तिवाड ह्यांनी तुरुंगवास भोगला आहे. खूप हिरीरीने स्वातंत्र्य लढ्यात दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला होता. 

विशेष उल्लेखनीय :- श्री स्वप्नील मंगेश पाध्ये हे व्यवसायाने CA (चार्टर्ड अकाउंटंट) आहेत तेही पहिल्या प्रयत्नात. श्री प्रसाद हरिश्चंद्र तिवाड ह्यांचा वेदभ्यास दांडगा आहे. गोरेगावस्थित श्री राजन वसंत पाध्ये हे बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात नगरसेवक आहेत ते तीन वेळा निवडून आले आहेत. श्री मोहित पाध्ये हे ज्योतिष आणि वास्तुविशारद आहेत. श्री प्रवीण तिवाड ह्यांचे डोंबिवली येथे स्वतःचे क्लासेस आहेत.येथील श्री प्रशांत प्रकाश तिवाड लंडन येथे पंचतारांकित होटेल मध्ये उच्चपदस्थ आहेत. कु.सौरभ नंदकुमार तिवाड हे Ethical Hacker असून BE आहेत Robotics मध्ये अभ्यास केला असून १० वित ९१% गुण मिळवले होते.श्री संदेश पाध्ये हे प्रध्यापक आहेत. येथील भाईंदर स्थित कै. श्री राजाराम दामोदर पाध्ये (नाना) हे विशेष कार्यकारी अधिकारी होते तसेच अनेक लोकाभिमुख कार्य केली असून पेन्शन असोसिएशन चे अध्यक्ष होते. श्री नरेश कुलकर्णी ह्यांचे वधुवर सूचक मंडळ आहे. कै.श्री पुरूषोत्तम काशीनाथ पाध्ये हे वनविभागात उच्चपदस्थ होते. आणखी काही उल्लेखनीय नावे  कै. कांताभाई साठे (समाज सेवक), श्री अनिल तिवाड (नाट्यक्षेत्र पुरस्कार प्राप्त) हे आणि इतर श्री केशव सखाराम तिवाड, श्री नारायण विष्णू  पाध्ये, श्री नारायण गोविंद पाध्ये, श्री शरद पाध्ये, श्री दिनकर पाध्ये, श्री अरुण पाध्ये,  श्री जयप्रकाश पाध्ये, श्री विकास तिवाड, श्री हरिशचंद्र तिवाड, श्री प्रकाश तिवाड  ह्यांनी समाज एकीकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे.

येथील श्री उमेश अच्युत साठे हे सिव्हिल इंजिनीअर असून अतिशय कठीण किंवा किचकट समजला जाणारा विरार येथील रेल्वे मार्गावरील पूर्व पश्चिम जोडणारा पूल, तसेच दांडा खाडी केळवे येथील पूल आणि वैतरणा खाडीवरील रेल्वे पूल बांधकामात त्यांचा अतिशय मोठा वाटा आहे.

येथील श्री उल्हास भाऊराव पाध्ये म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात त्यांची कामगिरी मोठी आहे, "शिवरायांची सून ताराराणी आणि दरोडेखोर" , चौकट राजा " ह्या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी वेढी गावाने पालघर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते ह्यात सात पारितोषिके श्री उल्हास पाध्ये ह्यांच्या प्रयत्नामधून मिळाली आहेत निःसंशय इतर सर्व कलाकरांचा त्यात वाटा आहे. श्री उल्हासजी राजकारणात देखील सक्रिय असून मोठ्या राजकीय पक्षात ते उच्चपदस्थ आहेत. तसेच समाजासाठी आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. नवीन तरुणांना नेहेमीच प्रोत्साहित करत असतात.

तलाव आणि वेढितील डोंगरी 

येथील विरारस्थित श्री आशिष रामचंद्र साठे आणि श्री जितेंद्र रामचंद्र साठे ह्यांचे "आशिष साठे क्लासेस" पंचक्रोशीत खूप प्रसिद्ध आहेत, गेली पंधरा वर्षे क्लासेस अविरत सुरु आहेत. आगरवाडी, माकुणसार आणि विरार (पूर्व) अशा तीन शाखा ह्या क्लासेसच्या आहेत श्री आशिष यांच्या पत्नी सौ स्वप्नाली आशिष साठे ह्यांचे शिशुवर्ग किंवा छोटे स्कूल "होरायझन किड्स अकॅडमी" विरार येथे सुरु आहे.वेढी गावातील आणखी विशेष उल्लेख करावा असे दुसरं दाम्पत्य म्हणजे श्री अभिजीत अनिल तिवाड आणि सौ अंकिता अभिजीत  तिवाड, श्री अभिजीत ह्यांनी फुलशेती करण्याचा आगळा वेगळा प्रयोग केला असून त्यात त्यांना यश मिळत आहे, सौ अंकिता ह्यांचा खास मराठमोळे पेहेराव design करून देण्याचा "शुभवस्त्रम" हा व्यवसाय आहे व खूप चांगला प्रतिसाद आहे. एक नमूद करावेसे वाटते की मी टेंभी गावातील श्री दर्पण पंडित ह्यांचा उल्लेख केला होता कि शाळेत १० वीत त्यांचा ८५% गुण मिळवण्याचा रेकॉर्ड बरीच वर्ष कोणी मोडला नव्हता तो सौ अंकिता ह्यांनी ८९% गुण मिळवून मोडला होता. 

वेढी येथील पूर्वाश्रमीच्या निशा भाऊराव पाध्ये ह्यांचे सुपुत्र श्री सिद्धांत प्रवीण जोशी हे यूटुबर आहेत त्यांचे दहा लाखांपेक्षा जास्त subscribers (चाहते) आहेत पुढील लिंक वर क्लिक करून  त्यांच्या चॅनेलला नक्की भेट द्या "श्रीमान लिजेंड". येथील मीनाक्षी पाध्ये (पूर्वआश्रमीचे नाव) ह्यांचे पुत्र श्री किरण कुलकर्णी हे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये लेखक आहेत अनेक मालिका त्यांनी लीहील्या आहेत सध्या गाजत असलेली मालिका "अग्ग बाई सासू बाई" देखील त्यांनी लिहिली आहे. तसेच कलाकार आणि असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्यांचे चित्रपट :- हुप्पा हुय्या आणि आणि चिंतामणि. 

येथील स्त्रिया देखील मागे नाहीत गावातील सौ आशा अनिल तिवाड ह्या दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य होत्या त्यात त्या एकदा उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळत होत्या तर काही वर्ष सरपंच पद देखील त्यांनी सांभाळले आहे. त्यांच्या कन्या अनामिका अनिल तिवाड प्राध्यापिका आहेत. येथील बोईसरस्थित डॉक्टर भक्ती उल्हास पाध्ये ह्या family physician आणि consulting homeopath आहेत त्यांचे Heal RX क्लीनिक असून सायन, चेंबूर आणि वसई येथे शाखा आहेत, तसेच त्या कोविड योद्धा आहेत. येथील काही लेकी शिक्षिका आहेत. येथील मालाडस्थित सानिका हरिशचंद्र तिवाड(पूर्वआश्रमीचे नाव) ह्यांचा आस्वाद केटरर्स ह्या नावाने हॉटेल, कॅटरिंग व इव्हेंट मॅनेजमेंट चा व्यवसाय आहे. 

श्री मुजबा देवी :- वेढी येथील पाध्ये कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी आहे. मांडा, सफाळे येथे देवीचे स्थान आहे. देवीचे मंदिर सुंदर असून समोर पुरातन विहीर आहे, मनशांती साठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. छायाचित्रांमध्ये आपण ते अनुभवू शकता.

देवीबद्दल :- कै केशवराव कुशाबा आचार्य ह्यांना श्री तुळजा भवानी देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि  "मांडा सफाळे येथे आसपासच्या टेकडीवर मी श्री मुजबा देवी या नावाने स्वयंभू प्रकट झाले आहे तू मला माझे स्थान बांधून दे" अशाच प्रकारचे स्वप्न गोसावी श्री सोमगिरी हे मांड्यात आले होते तेव्हा त्यांना पडले होते "तू मुंबईला जाऊन श्री केशवरावांना भेट आणि त्यांना इथे घेऊन ये"असे देवीचे सांगणे होते, गोसावी आणि श्री केशवराव तसेच त्यांचे बंधू श्री गणेश आचार्य ह्या सर्वांनी मांडे परिसरात येऊन बैलगाडीत स्वयंभू प्रकट मूर्ती घेतली आणि सफाळेच्या दिशेने प्रवास सुरु केला पुढे जात असताना गावाच्या वेशीवर गाडीचा बैल आज देवीचे मंदिर आहे तिथे बसून पडला हेच ते स्थान. ही जागा केशवरावांनी विकत घेऊन वैशाख शुद्ध पौर्णिमा शके १८१४ इसवी सॅन १८९२ रोजी देवीची स्थापना केली.

श्री महाजाई :- वेढी येथील साठे कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी असून बोईसर पासून अंदाजे ७ किलोमीटर वर महागाव वसले आहे तेथेच श्री महाजाई देवीचे सुंदर स्थान आहे. देवीचे मंदिर एका छोटेखानी घराप्रमाणे आहे अतिशय सुंदर मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला अनेक वृक्ष आहेत परिसर अतिशय लोभस आहे एकूणच मन प्रसन्न करणारे हे पवित्र स्थान आहे.  

मंदिरामध्ये देवीच्या मूर्ती सोबत आणखी काही पुरातन मूर्ती आहेत. मंदिरासमोर तुळशीवृंदावन आहे. देवीचे देखणे रूप , छानदार नथ मन प्रसन्न करते. देवीसमोर संगमरवर दगडामध्ये कोरलेली देवीची पाऊले खूप रेखीव आहेत.

श्री मुजबा देवी, मांडा

धन्यवाद 

सौजन्य :- ही पोस्ट लिहिण्यासाठी मला श्री उल्हास पाध्ये आणि श्री प्रसाद पाध्ये ह्यांनी खूप मदत केली आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. 

वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना




Friday, October 30, 2020

नवान्न पौर्णिमा

 श्री गणेशाय नमः 


नवान्न पौर्णिमेचे नवकं 

नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, आज माझ्या ह्या विशेष पोस्ट मध्ये आपण नवान्न पौर्णिमेबद्दल जाणून घेणार आहोत. बरेचदा कोजागिरी आणि नवान्न पौर्णिमा एकाच दिवशी येतात मात्र ह्या वर्षी वेग-वेगळ्या आहेत. आपल्या अष्टागरात नवान्न पौर्णिमेला वेगळे महत्व आहे.

आपल्या महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्र पूजन करतो, पाटी पूजन (सरस्वती पूजन)करतो, आपल्या घरातील विविध वस्तू ,वाहने ह्यांची देखील पूजा करतो, सोने वाटले जाते हे सगळे इथे आपल्या अष्टागारात देखील केले जाते मात्र दाराला तोरण नवान्न पौर्णिमेला बांधले जाते. 

अष्टागरात ह्या तोरणाला नवकं असे म्हणतात आणि हे बनवण्याची पद्धत सुद्धा थोडी वेगळी आहे. भरीव बांबूचा रुंदीने लहान आणि दाराच्या मापाचा तुकडा घेतला जातो तो मध्ये चिरून त्याचे दोन भाग केले जातात. काही जण दोन बांबू घेऊन हे तोरण बनवतात. आंब्याचे पान, झेंडूचे फुल, भाताचे कणीस हे सगळे एकत्र करून चिरलेल्या बांबू मध्ये घट्ट बसवले जाते, अशाप्रकारे एकमेकांना लागून आपल्या दाराला पुरेल इतके गुच्छ लावले जातात. हे तोरण दिसायला अतिशय सुंदर असते. सोबत एक गुच्छ देखील दोरीला बांधून एकेरी तोरण तयार केले जाते.

हे नवकं आणि इतर एकेरी तोरणं एका पाटावर ठेवून त्याची पंचोपचारे पूजा केली जाते. आणि घराच्या मुख्य दाराला हे तोरण बांधले जाते. तयार केलेली एकेरी तोरणं घरातील इतर दारांना, इलेट्रॉनिक वस्तू, कपाटे, वाहने ह्यांना बांधायची प्रथा आहे. खूप मंगलमय वातावरण असते ह्या दिवशी.

आपल्याला कल्पना यावी ह्या उद्धेशाने नवक्याचा आणि एकेरी तोरण ह्याचे फोटो सोबत शेअर करत आहे. आहे की नाही वेगळी प्रथा. ह्या रूढी ह्या प्रथा परंपरांमुळेच अष्टागराने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे.

आंब्याचे पान  फुल आणि कणसाचा गुच्छ  



अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...