श्री गणेशाय नमः
नमस्कार
मंडळी मी अजित विनोद पंडीत आपल्या आजच्या विशेष पोस्ट मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत
आहे सध्या नवरात्र सुरु आहे आणि कोरोनाच्या साथीमुळे शक्यतो आपल्याला बाहेर मंदिरात
जाता येत नाही त्यामुळे आपल्या अष्टागारातील परिवारांच्या कुलस्वामिनी बद्दल आज आपण
माहिती घेऊयात.
1) श्री चंडिका देवी,
2) श्री महालक्ष्मी देवी,
3) श्री आशापुरा देवी,
4) श्री वेडुबाई माता,
5) श्री पिंपळा देवी,
6) श्री पाटणा देवी,
7) श्री रेणुका देवी,
8) श्री मुजबा देवी,
9) श्री महाजाई,
10) श्री भवानी माता.
चला
करूया दर्शन आपल्या कुलस्वामिनीचे.
श्री
चंडिका देवी :- आलेवाडी
येथील पंडीत कुटुंबाची कुलस्वामिनी श्री चंडिका देवी रत्नागिरीतील दापोली शेजारी दाभोळ
येथे आहे, देवीचे कौलारू मंदिर हे आपण कोकणात आहोत ह्याची प्रचिती देते. देवीच्या मंदिर
परिसरात एक गोड पाण्याचा झरा आहे ह्या
पाण्यात पाय धुवून मंदिरात प्रवेश केला जातो. देवी मंदिराच्या आत एका शांत, खोल व थंड
गुहेमध्ये विसावली आहे. राक्षस मर्दुन देवीने येथे विसावा घेतला आहे, देवीचे लोभस रूप
समईच्या मंद प्रकाशात उजळून निघालेले आपण पाहू शकता, देवीला समईचा प्रकाश जास्त प्रिय
असावा म्हणून आजही गाभाऱ्यात विजेचा दिवा टिकत नाही.
मंदिराच्या
शेजारी पुरातन समाधी आढळते. मंदिर परिसरामध्ये शिवकालीन भुयार आहे. महाराज आणि मावळे
त्याचा वापर करीत असत हल्ली मात्र हा भुयारी मार्ग बंद आहे.
मैसूर
येथे श्री चंडिका देवीचे मूळ स्थान असून वसई जूचंद्र येथे देखील ही देवी छोटेखानी टेकडीवर
विराजमान झाली आहे हे मंदिर पांडव कालीन असून हल्ली मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला
आहे. श्री चंडिका, श्री महिषासुर मर्दिनी आणि श्री महाकाली अशा तिघी देवी येथे बसल्या
आहेत. वसईचा किल्ला बांधतांना श्री चिमाजी अप्पा ह्यांनी येथील दगड वापरले होते त्यावेळेस
त्यांनी सुद्धा ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
![]() |
श्री चंडिका देवी |
![]() |
श्री चंडिका देवी , मंदिर |
श्री महालक्ष्मी देवी : - कोल्हापूरची अंबाबाई ही अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे अष्टागरातील अनेक कुटुंबांची ती कुलस्वामिनी आहे. फाटक, पंडीत, पाठक, जोशी, तिवाड, शहाणे, ह्या कुटुंबाची ही कुलस्वामिनी आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे. देवी बद्दल माहिती जग जाहीर आहे आपण देवीची थोडी वेगळी माहिती पाहुयात.
पातशाह्यांच्या
काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची.
राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या
मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची
मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर
प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न
नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची
पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन
आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस
सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर
यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली.
महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर
करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक
२६ सप्टेंबर १७१५.
तोच ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या
मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे
ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल
छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी
सावगाव हे गाव इनाम दिले.छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू
व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत.
![]() |
श्री महालक्ष्मी देवी |
![]() |
श्री महालक्ष्मी देवी, मंदिर |
![]() |
श्री महालक्ष्मी देवी मंदिर , पोखरण |
श्री आशापुरी माता :- राणे कुटुंबाची कुलस्वामिनी आशापुरी माता सफाळे येथील एडवण गावात समुद्रात वसली आहे, समुद्रात एका छोटेखानी बेटावर /टेकडीवर सर्वोच्च ठिकाणी गुहेमध्ये देवी विराजमान झाली आहे. देवीचे मंदिर देखील खूप सुंदर आहे. या टेकडीवर देवी सोबत काही वृक्ष आहेत त्यांना येथील बोली भाषेत राजणीचे वृक्ष म्हणतात. आता देवी पर्यंत जाण्यासाठी सिमेंटचा मार्ग असून येथे विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. राणे कुटुंबीय नेहेमी देवीच्या मंदिरासाठी सुखसोयी करण्यात तत्पर असतात. समुद्राला भरती असली की या टेकडी च्या चोहोबाजूने पाणी असते.
देवीचा
डोंगर म्हणा किंवा टेकडी अतिशय नयन रम्य आहे मागील बाजूस खूप छान परिसर आहे समुद्राचे
पाणी येथील दगड अतिशय फोटोजेनिक जागा आहे. काहींच्या म्हणण्यानुसार मागे एक पाण्याचा
खड्डा किंवा खोल विहीर आहे त्याच्या खोलीचा थांग लागत नाही. अतिशय नयन रम्य ठिकाण आहे.
येथील कोळी समुदाय ह्या देवीचे
मनोभावे सर्व काही करीत असतात.
आपण
थेट मंदिरापर्यंत आपल्या वाहनाने जाऊ शकता. सफाळे रेल्वे स्टेशन पासून एडवणला जायला
सहा आसनी रिक्षा तसेच एस टी बसेस ची सोय आहे.
![]() |
श्री आशापुरी देवी |
![]() |
श्री आशापुरी देवी, मंदिर |
श्री वेडुबाई माता :- आलेवाडी चे नाईक कुटुंबाची ही कुलस्वामिनी असून आलेवाडी येथे हिचे मंदिर आहे. येथील श्री वेडुबाई मातेचे छोटेखानी मंदिर मनाला शांती देणारे असून देवी सोबत श्री परशुरामाची आणि श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे, देवीचे व्याघ्रवाहन आणि कूर्म देवीसमोर नतमस्तक झालेले आढळतात. नाईक कुटुंब मंदिराचा वर्धापन दिन साजरा करतात तसेच नवरात्रौत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
नाईक
कुटुंबाच्या कुलस्वामिनीचे मूळ स्थान उस्मानाबाद येरमाळा आहे. तेथूनच देवीची मूर्ती
तसेच अखंड तेवणारा दीप मंदिर उभारणीच्या वेळेस आणले गेले होते.
येरमाळा येथे एका टेकडीवर किंवा छोटेखानी गडावर देवी विराजमान झाली आहे मंदिर परिसरात श्री दत्त, गणपती
श्री दुर्गा ह्यांच्या मूर्ती आहेत टेकडीवर अनेक वृक्ष आहेत. येथील स्थानिक मंडळी येथे
दरवर्षी चुना वेचण्यासाठी येतात.
देवीची
गोष्ट :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा
त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा
प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच
ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली
जाते. देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी
महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही
येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा
चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत
देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या
चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून
मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार
केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही
देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा
येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात.
![]() |
श्री वेडुबाई माता, आलेवाडी |
![]() |
श्री येडेश्वरी माता ,येरमाळा |
![]() |
श्री येडेश्वरी माता मंदिर, येरमाळा |
श्री
पाटणा देवी:- सरावली
येथील रोडे कुटुंबाची कुलस्वामिनी श्री पाटणा देवी (चाळीसगाव) असून हे एक शक्तीपीठ
आहे.
माता
सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह
तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारदमुनींच्या सूचनेवरुन
माता सती यज्ञ सोहळ्यास येतात. मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता
सती अपमान झाला म्हणून स्वतःच्या शरिरातील प्राण काढून घेते त्यामुळे तिचे शव यज्ञ
मंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात आणि तिचे शव हातात घेऊन
तांडव नृत्य करु लागतात. त्यावेळी त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप उडतो.
अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णु सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे
करतात. उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तिचीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ
निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी
तपस्या करुन चंडिकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरुन खाली यावे अशी विनंती
गोविंद स्वामींनी भगवतीला केली. यावर भगवतीने होकार देतांना गोविंद स्वामींना मागे
न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे
आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंद स्वामी
पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते. कुंडात स्नान कर तेव्हा माझी स्वयंभु
मुर्ती तुझ्या हातात येईल असे भगवती सांगते. पाटणादेवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या
स्वयंभु मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केली आहे.
पाटणादेवी
हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. चाळीसगाव
शहरापासून अवघ्या 18 किमी अंतरावर नैऋत्येला असणारे हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत
वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी
होते. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तिचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक
येथे आवर्जून हजेरी लावतात.
![]() |
श्री पाटणा देवी |
![]() |
श्री पाटणा देवी, मंदिर |
श्री
रेणुका देवी : - नगावे
येथील पाटील/ जोशी , पंडित कुटुंबाची ही कुलस्वामिनी असून आपण सगळे देवीबद्दल जाणून आहात. नांदेड
येथील माहूर येथे देवी विराजीत आहे.
देवीची
आख्यायिका :- शिवाची
पत्नी पार्वती ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी
ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न
झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय
आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने
जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना
ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूर चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस
रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी
आई भूमीतून वर येउन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने
मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच
राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.
![]() |
श्री रेणुका देवी |
![]() |
श्री रेणुका देवी, मंदिर |
श्री
मुजबा देवी :- वेढी
येथील पाध्ये कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी आहे. मांडा, सफाळे येथे देवीचे स्थान आहे. देवीचे मंदिर सुंदर
असून समोर पुरातन विहीर आहे, मनशांती साठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. छायाचित्रांमध्ये
आपण ते अनुभवू शकता.
देवीबद्दल :- देवीबद्दल :- कै केशवराव कुशाबा आचार्य ह्यांना श्री तुळजा भवानी देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि "मांडा सफाळे येथे आसपासच्या टेकडीवर मी श्री मुजबा देवी या नावाने स्वयंभू प्रकट झाले आहे तू मला माझे स्थान बांधून दे" अशाच प्रकारचे स्वप्न गोसावी श्री सोमगिरी हे मांड्यात आले होते तेव्हा त्यांना पडले होते "तू मुंबईला जाऊन श्री केशवरावांना भेट आणि त्यांना इथे घेऊन ये"असे देवीचे सांगणे होते, गोसावी आणि श्री केशवराव तसेच त्यांचे बंधू श्री गणेश आचार्य ह्या सर्वांनी मांडे परिसरात येऊन बैलगाडीत स्वयंभू प्रकट मूर्ती घेतली आणि सफाळेच्या दिशेने प्रवास सुरु केला पुढे जात असताना गावाच्या वेशीवर गाडीचा बैल आज देवीचे मंदिर आहे तिथे बसून पडला हेच ते स्थान. ही जागा केशवरावांनी विकत घेऊन वैशाख शुद्ध पौर्णिमा शके १८१४ इसवी सन १८९२ रोजी देवीची स्थापना केली.
![]() |
श्री मुजबा देवी, मांडा |
![]() |
श्री मुजबा देवी मंदिर, मांडा |
श्री महाजाई :- वेढी येथील साठे कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी असून आलेवाडी येथील एका नाईक कुटुंबाची देखील ही कुलस्वामिनी आहे. बोईसर पासून अंदाजे ७ किलोमीटर वर महागाव वसले आहे तेथेच श्री महाजाई देवीचे सुंदर स्थान आहे. देवीचे मंदिर एका छोटेखानी घराप्रमाणे आहे अतिशय सुंदर मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला अनेक वृक्ष आहेत परिसर अतिशय लोभस आहे एकूणच मन प्रसन्न करणारे हे पवित्र स्थान आहे.
मंदिरामध्ये
देवीच्या मूर्ती सोबत आणखी काही पुरातन मूर्ती आहेत. मंदिरासमोर तुळशीवृंदावन आहे.
देवीचे देखणे रूप , छानदार नथ मन प्रसन्न करते. देवीसमोर संगमरवर दगडामध्ये कोरलेली देवीची
पाऊले खूप रेखीव आहेत.
![]() |
श्री महाजाई, महागाव |
![]() |
श्री महाजाई, मंदिर महागाव |
श्री भवानी देवी :- बहाड येथील काही मंडळी श्री भवानी देवीस आपली कुलस्वामिनी मानतात, देवी सर्वश्रुत आहे, देवीबद्दल माहीती पुढील प्रमाणे.
हे
गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे.
इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या
मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.
श्री
तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास
राजे शहाजी महाद्वार तर दुसर्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात
आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्या आहेत.पायर्या उतरून खाली गेल्यानंतर
गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात.
समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या
बाबतीत सागितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे.
येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.
पुढे
गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात
आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्याचा
दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे.
येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन
फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या
मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण,
चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या
मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून
राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे
मस्तक आहे.
श्री
तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष
श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून
एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते.
नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते.
देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.
नवरात्रीच्या
काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी
भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी
एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.
![]() |
श्री भवानी माता |
![]() |
श्री भवानी माता, मंदिर |
अतिशय सुंदर माहिती आहे देवींची आणि गावांची सुद्धा
ReplyDeleteधन्यवाद भावना
Deleteअतिशय सुंदर माहिती आहे देवींची आणि गावांची सुद्धा
ReplyDeleteखूप सुंदर माहिती संग्रहित करून आम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.👍
ReplyDeleteखूप सुंदर माहिती संग्रहित करून आमच्या पर्यंत पोहचली आहे
ReplyDeleteKhup Chan nav Navin mahiti tujyamule amhla milate.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुपच छान पोस्ट ,आणी प्रत्येकालाच आपल्या कुलस्वामिनी बद्दल नवराञी मध्ये माहीती वाचुन खरच खूप छान वाटलं असेल.
ReplyDeleteधन्यवाद... बरोबर आहे
Deleteखूपच छान👌👌
ReplyDeleteमाहिती चांगली आहे पण कुलदैवत कुठलं आहे ह्या बद्दल काही ठिकाणी कुटुंबात कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीत.
ReplyDeleteफक्त सांगोपांगी दैवत असावी.
धन्यवाद... खरे आहे आपले बरेच ठिकाणी पुरावे नाहियेत.
DeleteHari om
ReplyDeleteनवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे दर्शन व माहिती वाचुन मन प्रसन्न झाले
खूप छान संग्रह