Thursday, February 18, 2021

अष्टागरातील खाद्यसंस्कृती

                                                                    श्री गणेशाय नमः  

 नमस्कार,

माझे नाव अजित विनोद पंडीत आहे, अष्टगरातील माहिती आपण माझ्या पोस्ट मध्ये वाचत असता. माझ्या या पोस्टमध्ये आपण अष्टगरातील खाद्य संस्कृती बद्दल महिती करून घेणार आहोत. आपल्या अष्टागरात अतिशय चविष्ट आणि सात्विक स्वयंपाक केला जातो. अतिशय साध्या पद्धतीचे पण रुचकर भोजन येथील पानात वाढले जाते. मी अष्टागरातील प्रत्येक अन्नपूर्णेस नमन करून आपल्या आजच्या विषयाकडे येतो.

अष्टागरात सर्वांना प्रिय आहे ते वालाचे बिरडे, काही मंडळी त्यास डाळिंब्या म्हणतात मात्र येथे बिरडे हाच शब्दप्रचार आहे. शेवगाच्या शेंगा (येथील बोलीभाषेत शेगटाच्या शेंगा) आणि बिरडे ही भाजी म्हणजे फक्कड बेत. येथे बिरड्यासोबत अनेक भाज्या असतात, अनेक रानभाज्यांना या बिरड्याने रुचकरपणा येतो. शेवगाची पाने आणि बिरडे ह्याची भाजी आणि आमटी खूप लोकप्रिय आहे. केळफूल, फणस, मोहाची फळे(मोट), माठाचे देठ तसेच शिराळा(दोडका), मेथी, दुधी, बटाटा, अळू, तेरी(पांढरे अळू), रानभाजी टाखळा, खापरा, शतावरी,  कुळी(कवाळी), शिंद(कोवळा बांबू, वास्ता) अगदी कारले सुद्धा बिरड्यात घातले जाते. या भाज्या भातासोबत छान लागतात, भात म्हणजे येथील मंडळींचा जीव की प्राण आहे.  येथील नैवेद्यामध्ये भातासोबत आवर्जून बिरड्याची भाजी हजेरी लावत असते.

शेवगाच्या शेंगा आणि बिरडे

येथील शेतीमध्ये पिकणारा लाल वाल येथे खूप आवडीने खाल्ला जातो. लाल वालाची उसळ तर खुपच आवडीची आहे, बटाटयासोबत देखील ह्या वालाची उत्तम भाजी केली जाते. आंबट वरण भात आणि वालाची भाजी म्हणजे अप्रतिम बेत.

येथे आमटीला आंबट वरण म्हणतात, वरणाचे अनेक प्रकार अष्टागरात प्रसिद्ध आहेत. चिंच थोडासा गूळ घालून तुरीच्या डाळीचे वरण केले जाते त्यास आंबट वरण म्हणतात. कच्ची कैरी, शेवगाच्या शेंगा, बटाटा, मुळा, वांगे देखील येथील वरणाला सांबर प्रमाणे चविष्ट बनवतात. डाळीला फोडणी देऊन फोडणीचे वरण केले जाते तर तुरीच्या डाळीच्या साध्या वरणास आम्ही गोडं वरण म्हणतो. खूप मसाले विविध प्रकारची वाटणे किंवा अतिशय कांदा लसूण न वापरता येथील स्वयंपाक केला जातो तेलाचा हातही थोडा आखडताच असतो. 

येथे पातळ भाज्यांना आमटी म्हंटले जाते वरणाला दुसरा पर्याय म्हणून ह्याकडे पाहिले जाते. अळूच्या पानाची आमटी येथे अतिशय लोकप्रिय आहे काही मंडळी त्यास फदफदं म्हणतात पण येथे तिला आमटीच म्हंटले जाते. थोडासा गुळ, खोबरे, चिंच, डाळ किंवा बिरडे, शेंगदाणे आणि काही मोजके मसाल्याचे पदार्थ घालून ही फक्कड आमटी केली जाते. येथील गृहिणीच्या हातची अळूची आमटी खाल्ल्यानंतर हात धुतला तरी त्या आमटीचा खमंग दर्प बराच वेळ हातावर राहतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला येथे रानभाजी शेवळी येते शेवळ्याची आमटी येथील बहुतांश मंडळींचा जीव की प्राण आहे. शिळी आमटी देखील खूप चविष्ट लागते.

शेगटाच्या पानाची आमटी, पालकाची आमटी आणि हो चिंचेचा सार येथे केला जातो, चिंचेच्या कोळात ओला नारळ, आणि काही मसाले घालून आमटी केली जाते त्यास चिंचेचा सार म्हणतात.

कटाची आमटी म्हणजे येथील बोली भाषेत आळणाची आमटी देखील आवडीने लोक खातात.

भाकरी, पोळ्या, घावन देखील स्वयंपाकघरात बनत असले तरी शक्यतो नाष्टा म्हणून खाल्ले जाते, पोळी सोबत बटाट्याच्या काचऱ्या(काप) येथे खूप प्रसिध्द आहेत. भाकरी सोबत पिठले, पातळ पिठले किंवा कोरडे पिठले खाल्ले जाते. चटणी घावन भाजी किंवा आमटी सोबत घावन पानात येतात. संक्रांतीला येथे खास आंबवलेले घावन केले जातात त्यास पोळा म्हणतात. अतिशय चविष्ट असतात हे पोळे. नाश्त्यासाठी आटवले(मऊभात) देखील केले जाते, नवीन तांदळाचे आटवले खूप चविष्ट असते, मऊभाताचा प्रकार कणेरी (कण्हेरी) खास आजारी माणसाला दिली जाते पचायला अतिशय हलकी असते. अन्न वाया घालवू नये या उद्देशाने उरलेल्या भाताचा फोडणीचा भात देखील येथे नाश्त्याला आवडीने खाल्ला जातो.

संक्रांतीमध्ये केले जाणारे पोळे

चटण्यामध्ये कच्च्या चिंचेची चटणी, कैरीची, ओल्या नारळाची चटणी, काही ठिकाणी शेंगदाण्याची लाल चटणी केली जाते. कैरीचे करंभट येथे आवडीने खाल्ले जाते, कैरीचे फोड त्यात तेल तिखट मीठ घालून तात्पुरते लोणचे केले जाते त्यास करंभट म्हणतात. कैरी किंवा कच्चा आंबा मिठाच्या पाण्यात किंवा मिठात खारवला जातो त्यास पाण्यातला आंबा म्हणतात जेवताना तोंडी लावायला उत्तम पर्याय आहे. येथील पानात कोशिंबिरी पण अधून मधून हजेरी लावत असतात.

उकडीचे मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या, गुळ पापडी, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, मुगाचे लाडू, खीर ही मिष्टान्न लोक आवडीने खातात, पुरणपोळी होळीत आवर्जून केली जाते. ओल्या नारळाच्या वड्या देखील येथील स्त्रिया सुरेख करतात त्यास नारळी पाक म्हणतात. पितृ पक्षात उंबर केले जातात गोड घारगे म्हणू शकतो त्यास, तांदळाची खीर देखील या पानात ठेवली जाते. येथे तिखट घारग्यांना वडे म्हणतात.

    
नारळी पाक

                                
अळूवडी, कवाळीचे(कुळीचे) मुटगे(मुडगे), कांदा भजी, बटाटा भजी आणि विविध प्रकारची भजी, देखील येथे प्रसिद्ध आहे.

अशा प्रकारे अनेक पद्धतीने आणि अनेक प्रकारची व्यंजने, खाद्यपदार्थ येथे तयार केले जातात. त्यातील फक्त काहींचा मी येथे उल्लेख केला आहे मात्र आणखी अनेक पदार्थ येथे स्वयंपाकात समाविष्ट असतात, त्याला उजाळा देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे, तुम्हाला आवडल्यास नक्की कंमेंट करा.

धन्यवाद,


पुढील लिंकवर क्लिक करून इतर पोस्ट वाचा. 










वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



18 comments:

  1. खुप मस्त माहिती आहे

    ReplyDelete
  2. Are Ajit tondala paani sutle sagle varnan vachun... Khupach masta....

    ReplyDelete
  3. खुपच छान,वाचुन तोंडाला पाणी सुटले.

    ReplyDelete
  4. खुप सुंदर आणि परिपूर्ण माहिती. लिखाण पण ओघवत्या भाषेत आहे. तुझ्या लेखांचे जतन करून ठेव. काळाच्या ओघात संकृती मागे पडतात. वाचताना पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. Keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर, तुमचे आशिर्वाद सदैव असू देत....प्रिंट करून नक्की ठेवेन...

      Delete
  5. खुप सुंदर आणि परिपूर्ण माहिती. लिखाण पण ओघवत्या भाषेत आहे. तुझ्या लेखांचे जतन करून ठेव. काळाच्या ओघात संकृती मागे पडतात. वाचताना पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. Keep it up.

    ReplyDelete
  6. खूप सुंदर लिखाण आहे.. भाषा सुद्धा सहज आणि संस्कृती ची छान ओळख घडवणारी ... अशीच छान माहिती देत राहा ...... All the best for your blog....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. नक्कीच आणखी लिहीत राहीन

      Delete
  7. खाद्यपदार्थाचे खूप छान आणि रुचकर वर्णन केले आहेस ते वाचताना खूपच चविष्ट लागले . खूप सुंदर लिखाण केले आहेस. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेछा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... आपली कमेंट सुध्दा खमंग आहे..

      Delete
  8. मला नगाव किंवा नांदगावला आजोळी आल्या सारखं वाटलं.

    पदार्थांची रेलचेल होती.
    धन्यवाद.

    ReplyDelete

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...