श्री गणेशाय नमः
नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आपल्या आजच्या पोस्ट मध्ये आपण अष्टागरातील होळीबद्दल जाणून घेऊयात. अष्टागर आणि परिसरात होळी फक्त एक दिवसाची नसते, तब्बल १५ दिवस आणि धुलीवंदन अशी १६ दिवस होळी साजरी केली जाते.
फाल्गुन शुद्ध पाडव्यापासून दररोज लहान होळी पेटवली जाते अर्थात लहान मुलं ही होळी साजरी करतात. संध्याकाळी घरोघरी जाऊन मुलं लाकडं हक्काने मागून आणतात. डब्बे, छोटे वाजवण्याचे साहित्य घेऊन वाजवत, गात, मौज करत मुलं आपल्या आळीत कुडी(लाकडं) मागत फिरतात.
"कुडी द्या कुडी मारीन उडी, कुडी नाही दिली तर होळी कशी पेटेल"
अशा आशयाची गाणी गात लहान मुलं घरोघरी फिरतात. हल्ली लहान मुलांना शाळेमुळे वेळ कमी मिळतो आणि ह्या गोष्टी करता येत नाहीत, पण अजूनही काही ठिकाणी मुलं ह्या गोष्टींचा आनंद लुटतात. पूर्वी होळी असली की "आट्या-पाट्या" हा खेळ खेळला जात असे आता मात्र हे खेळ खूप कमी (किंवा नाहीच) खेळले जातात.
लाकडं, पालापाचोळा, वाळलेले गवत एका झाडाच्या फांदीभोवती रचले जाते, या फांदीस सरा म्हणतात ही फांदी अगदी सरळ असते. पूर्ण झाड न तोडता फक्त फांदी तोडली जाते त्यामुळे वृक्षतोड होत नाही, भेंडीचा(भेंड वृक्ष) सरा शक्यतो लावला जातो, काही ठिकाणी सुपारी किंवा गावातील प्रथा पद्धती नुसार सरा असतो हे झाड फुटीर वृक्ष असल्याने पुन्हा नव्याने त्याला फांद्या येतात. . होळीला अग्नी देऊन मुलं नाचतात, आनंदाने मोठ्याने "होळी पेटली रे" म्हणून एक सुरात आवाज देतात.
होळी पौर्णिमा आणि त्याच्या आदल्या दिवशी मोठी मंडळी होळीत सहभागी होत असतात. वर्गणी गोळा करून लाकडे खरेदी केली जातात काही मंडळी आपल्या कडे उपलब्ध असलेली लाकडे होळीस आनंदाने देतात. वृक्ष तोडून कोणी होळी साजरी करीत नाहीत वाळलेली जुनी लाकडे वापरून होळी साजरी केली जाते. मोठ्ठा सरा आणून त्याभोवती लाकडे रचून रांगोळी काढली जाते. होळीस हार साखरेची माळ घातली जाते. घरातील लहान मुलांना देखील साखरेची माळ किंवा साखरेचे दागिने घातले जातात.
आद्य अगरबत्ती सुगंधी लोबान |
स्त्रिया होळीसाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळी, उकडीचे मोदक करतात. होळीची पूजा, औक्षण, नारळ अर्पण करून एखादे नाणे वाहिले जाते व नैवैद्य दाखवला जातो.
रात्री १२ वाजता किंवा मुहूर्तावर होळीस अग्नी दिला जातो. या प्रसंगी स्त्रीया पुरुष लहान मुले तसेच पहिला होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या पतीसोबत माहेरी आलेल्या नवविवाहित कन्या, अशी मोठी फौज होळीवर एकत्र येते.
अल्पउपहार केला जातो, तसेच होळीत वाहिलेले नारळ बाहेर काढले जातात प्रसाद म्हणून भाजलेले खोबरे खूप चविष्ट लागते. पुरुष मंडळी होळीशेजारी बसुन जागरण करतात.
दुसऱ्या दिवशी आनंदाने धुलीवंदन साजरे केले जाते, घरोघरी जाऊन शक्यतो नैसर्गिक रंग लावून होळी साजरी केली जाते, पूर्वी फुले आणि झाडांपासून रंग तयार केले जात असत हल्ली कालानुरूप त्यात बदल झाले आहेत. तसेच पूर्वी होळीच्या विस्तवावर अंघोळीचे पाणी तापवित असत त्यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही असा समज होता. रात्री विस्तवावर चणे, वालाच्या शेंगा,उकडले जातात आणि मंडळी एकत्र येऊन त्याचा आस्वाद घेतात.
धुलीवंदनाच्या दिवशी आपल्याकडे वर्षभर काही ना काही कामासाठी येणाऱ्या गडी मंडळींना किंवा घरकाम करणाऱ्या ताईंना आनंदाने पोस्त द्यायची पद्धत आहे, पोस्त म्हणजे पौशाच्या स्वरूपात दिली जाणारी छोटीशी भेट.
अष्टागरात सर्वच ठिकाणी अशाप्रकारे होळी साजरी केली जाते काही ठिकाणी थोडा फार बदल असला तरी मूळ प्रथा सारख्याच आहेत. तुम्हा सर्वांना होळीच्या खुप शुभेच्छा.
धन्यवाद.
Hari Om
ReplyDeleteKhup chhan
Aasech lihit Raha
धन्यवाद...नक्कीच लिहीत राहीन
Deleteहा लेख वाचुन आपण केलेली मजा आठवली.
ReplyDeleteहो ना
DeleteKhup chan lihilay. Mi anubhavli nahi pan te Chitra mazya samor ubha rahila
ReplyDeleteधन्यवाद
DeleteApli holi miss krte khup...and iconic group photo miss zalay ...beach vrchi majja bharich
ReplyDeleteहो....होळी खेळून समुद्रावर जाणे आणि नैसर्गिक wave pool मध्ये मजा करणे एकदम भारीच…
Delete