श्री गणेशाय नमः
नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ ह्या लेखमालेत आपलं सगळयांचे मनःपूर्वक स्वागत. दिवसेंदिवस आपली ही लेखमाला अधिक खुलत आहे आणि हळूहळू पुढे सरकत आहे. आज आपण वधुस/ वरास हळद लावण्याच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत त्यास केळवण असे म्हणतात.
आपण सगळेच जाणून आहात की हळद ही आरोग्यासाठी अतिशय लाभदायक अशी औषधी वनस्पती आहे, आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. लग्न म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात असते अनेक जबाबदाऱ्या ओघाने दोघांवर येत असतात त्यासाठी निरोगी असणे अती आवश्यक आहे, म्हणूनच आपल्या आर्यावर्तात/भारतात लग्नाआधी हळद लावली जाते हे काही मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
आपल्याकडे लग्नाआधी वर/वधुस हळद लावण्याची प्रथा आहे आणि या केळवणाच्या कार्यक्रमात हळदी सोबत केसाला शिरं म्हणजे नारळाचे दूध, सुगंधी तेल देखील लावले जाते, केळवण, तेलवण, ह्याबद्दल जाणून घेऊयात.
आदल्या दिवशीच (गहू टिपण्याचा वेळेस वर/वधु कडून कुटून घेतलेली) हळद त्यात चंदन भुकटी(पावडर) घालून रात्रभर भिजवली जाते. केळवणाच्या आधी ओल्या नारळाचे दूध शिरं तयार केले जाते. ह्या कार्यक्रमास स्रीवर्गास विशेषतः आमंत्रण असतं कारण हा कार्यक्रम सुद्धा मुख्यतः त्याच पार पाडत असतात.
केळवण करताना वर/वधु सोबत करवली आणि आई वडील ह्यांना पाटावर बसवून त्यांचे पाच सुवासिनी औक्षण करतात, सुरुवातीला सुवासिनी आंब्याच्या पानाने वधुस/वरास हळद लावतात आणि ही हळद आधी पायाला, गुढगे हात अशाप्रकारचे वर चढवली जाते. वर/वधु पाठोपाठ करवली, आई वडील ह्यांना हळद लावली जाते मुहूर्ताची हळद लावून झाली की हाताने हळद लावली जाते सोबत पारंपारिक गाणी गायली जातात. वराची उष्टी हळद वधुसाठी पाठवली जाते. केळवण घरात किंवा मंडपात करण्याचा प्रघात आहे.
मंडपाच्या दारी हळदीचं वाळवण,
....माझ्या ग बाळाचे/बाईचे नवऱ्याचे/नावरीचे केळवण.
हळदी लाविल्या सारणी दंडीवाहे पाणी
तेवत्या मालिनी दाल देता,
बहू जाहले उशीर चिंते तुमचे दीर लक्ष्मण,
लक्ष्मणाचे धोतरे चंदन माखले, वाळत घातले नाग चाफे.
हळद लावून झाली की तेलवण केले जाते, डोक्याला शिरं आणि सुगंधी तेल लावले जाते. खायच्या पानाला तेल लावून ते डोक्यावर पडेल अशा पद्धतीने पाच सुवासिनी पान हाताळतात आणि गाणी गातात.
चाफेलं धुपेलं मोगरेल तेल,
त्या तेलवणासाठी चौघी सुवासिनी
उभ्या देवापुढे लक्ष तेलवण पडे,
आधी पडे देवाला
नंतर पडे मुहूर्तमेढी,
नंतर पडे नवऱ्याला/ नवरीला.
अशोक वनामध्ये उभी
सिता मंजुळ करूनी, तितक्यात आले मारुती,
झाडावर चढोनी, चमत्कातर पाहुनी, टाकुनी मुद्रिका,
सीता मनी दचकली.
लोणं-मुणं भरली ताट ससूये घाट,
घाट जो रुंदला वेलाणीया आगर रुंदला,
विष्णुनावे हाताचे कांकण देऊ करा.
आणा हो चावी या उघडाहो पेटी या,
काढाहो ठुशि या पेहेराव हाती,
या "अलका" बाई अलका बाई आत्या,
"विनोद" देव पिता "विद्या" बाई माता,
या दोघा तिघांचे पूर्व सोवाळे,
नवऱ्याला/ नवरीला तेल चढे.
ह्यानंतर वधु/वराची अंघोळ झाली की त्यांच्या पायावर कुंकवाने केळवे काढले जातात म्हणजेच कुंकू भिजवून (पाणी किंवा तेलात) पायावर स्वस्तिक आणि मेंदी प्रमाणे नक्षी काढली जाते. या वेळी वधु/वराचा मामा हाताला कांकण बांधतो.
मामा मांडीपाट, मामी काढिते रांगोळी,
....माझ्या ग बाळाचे/बाईचे केळवण आजवेळी.
अष्टागर परिसर समुद्राच्या जवळ असल्या कारणाने येथिल कोळी, आगरी तसेच आणखी ब्राह्मणेतर समाज बांधव आपल्या आमंत्रणाला मान देऊन केळवणाच्या दिवशी/रात्री आवर्जून स्नेहभोजनासाठी उपस्थित असतात त्यांच्या संस्कृती मध्ये हळदीच्या कार्यक्रमाला खूप महत्व आहे.
वाजंत्री, नृत्य आणि भरपूर मौज करून केळवणाचा कार्यक्रम आनंदात साजरा केला जातो.
ऑर्डर करा 9637847937 |
लग्नाआधी म्हणजेच लग्नाला काही दिवस शिल्लक असताना जवळचे नातेवाईक वधुस/वरास केळवणासाठी आमंत्रित करण्याचा प्रघात आहे, यावेळी हळद न लावता फक्त पायावर केळवे काढून औक्षण केले जाते. स्नेहभोजन आणि भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता केली जाते. काही ठिकाणी ह्या केळवणाच्या वेळी हळद लावून मोठा कार्यक्रम केला जातो मात्र वधु/वरास इतर कामानिमित्त बाहेर फिरावे लागत असल्या कारणाने हळद लावणे शक्यतो टाळले जाते.
तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला ही लेखमाला कशी वाटते नक्की कळवा.
धन्यवाद.
पारंपरिक गाण्यांसाठी सौजन्य:- नेहेमी प्रमाणे माझी आत्या "श्रीमती जैमिनी वसंत पंडीत"
पुढील लिंकवर क्लिक करून इतर पोस्ट वाचा.
Hari Om
ReplyDeleteSundar,chaan मुद्देसूद मांडणी झाली आहे
धन्यवाद
Deleteनेहमी प्रमाणे खुपच छान माहीती लिहिली आहेस. आणि विडीओ पण छान आहेत.
ReplyDeleteधन्यवाद...
Delete