श्री गणेशाय नमः
नमस्कार,
मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखशृंखलेत तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण या लेखात रूखवत या बद्दल माहिती करून घेणार आहोत, आपल्या ब्राह्मणी पद्धतीनुसार लग्नाच्या दिवशी अष्टागरात देखील वधुचे, मंडपात किंवा कार्यालयात रूखवत मांडले जाते. शोभेच्या, खाण्याच्या वस्तूंचे तसेच संसाराला पूरक आणि काही पारंपरिक गोष्टी तसेच काही सुविचारांनी नटलेल्या वस्तूंचे हे एक छानसे छोटेखानी प्रदर्शनच असते.
हस्तकला, चित्रकला, पाककला, विणकाम, शिवणकाम, भरतकाम अशा अनेक कलांचा संगम येथे पाहायला मिळतो. लग्नात एका टेबलावर छान वस्तूंची आकर्षक मांडणी केलेली दिसली की समजावे ते रूखवत आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाने हे रूखवत पाहिले असेलच आणि लग्नात 5 मिनिटे का असेना प्रत्येक व्यक्ती विशेषतः स्त्रिया या रुखवताला नक्कीच भेट देतात.
हल्ली पारंपरिक गोष्टी जरी कमी होत असल्या तरी रुखवतामध्ये काहीगोष्टी आजही आपले स्थान कायम टिकवून आहेत. स्वतः वधु आणि तिचे नातेवाईक ह्या वस्तू बनवतात. हल्ली बाजारात ह्या रुखवतात योग्य बसतील अशा शोभिवंत वस्तू सर्रास मिळत असल्या तरी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची हजेरी देखील आपण अनुभवताच.
ह्या रुखवतामध्ये छोटी बैलगाडी, छोट्या धान्याच्या गोणी, सप्तपदी आणि प्रत्येक पावलांवर सुंदर उपदेशात्मक लेखन असते (आजही सुंदर हस्ताक्षरात देखील पहायला मिळते), सनई चौघडा, तोरण, हिरव्या बांगड्या त्यातील माहिती ह्या गोष्टी नक्की पाहायला मिळतात. काजू, सुपारी आणि लवंगाची शेंडी असणारे कागदी हवन करणारे भटजी आपली उपस्थिती आजही लावतात. घरगुती स्वयंपाक घरातील वस्तूंपासून बनवलेले सौभाग्य अलंकार सोन्यालाही लाजवतील इतके आकर्षक असतात.
खाद्य पदार्थात पापड, कुरडया पासून फराळाचे आणि लोणची मुरांबे ते चटण्यापर्यंत बरंच काही असते, बुंदीचे नेहेमी पेक्षा आकाराने मोठे लाडू भाव खाऊन जातात तसेच वधु वरांचे नाव, पापड आपल्या अंगावर छान मिरवतात.
रूखवत आलं बाई झाकुनी ग ठेवा,
(वधूच्या घरातील मानाने मोठी स्त्रीचे नाव) माझ्या ग बाईला वडिलीला मान द्यावा.
रूखवत आलं, जिलेबी ग नाही आली,
वधु ग माझ्या बाईच्या आईला ग घाई झाली.
रूखवत आलं सरी सांडली तेलाची,
(आईचे नाव) बाई माझी वरमाई ग लेकाची
गृहपयोगी वस्तूंची रेलचेल पाहून वधुच्या मानातील आपल्या नवीन संसारासाठी लागणाऱ्या गोष्टींची केलेली तजवीज जाणवते.
वधुकडील मंडळी सकाळी छान रूखवत मांडत असतात तर पाठवणीच्या प्रसंगी वराकडील मंडळी अलगद पण लगबगीने ह्या वस्तू उचलत असतात. निघताना रिकाम्या टेबलावर वधुच्या माऊलीसाठी वरपक्षाकडून साडी ठेवली जाते.
माझा लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की लिहा, आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी मोलाच्या आहेत.
धन्यवाद,
रूखवत सौजन्य:- सौ. अंकिता तिवाड-पंडीत आणि सौ स्वाती लवाटे.
गाण्यासाठी आभार : श्रीमती जैमिनी वसंत पंडीत(पूर्वश्रमीचे नाव)
उत्तम माहीती 👍 तुमचे ब्लॉगस खूप छान असतात👍
ReplyDeleteधन्यवाद स्वाती, नवीन लिखाणासाठी आपण नेहेमी प्रोत्साहित करता..
Deleteअहो तुमच लिखाण नेहमीच सुंदर असत. relatable असत. लिहीत राहा keep it up
Deleteधन्यवाद
Deleteखूप छान माहिती आहे.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर माहीती आहे .
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान लेखन आहे, आपली गाणी आणि रीतीभाती खूपच छान आहेत
ReplyDeleteधन्यवाद आत्या
Deleteखूप मस्त लिखाण केले आहे
ReplyDeleteधन्यवाद पुनम
Deleteखूप मस्त लिहिले आहे
ReplyDelete