Saturday, September 4, 2021

अष्टागरातील पिठोरी अमावास्येचे व्रत

 श्री गणेशाय नमः

बाजारात मिळणारी श्री पिठोरी देवीची प्रतिमा

नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आज आपण पिठोरी अमावास्येबद्दल जाणून घेणार आहोत. श्रावण अमावस्येला हे व्रत स्त्रिया किंवा माता आपल्या मुलांकरिता करतात. आपल्या बाळाला दीर्घायुष्य मिळावे त्यावरील सर्व संकटं दूर व्हावी म्हणून माता श्री पिठोरीचे हे व्रत करत असतात म्हणून यास मातृदिन असेही म्हणतात. संतती प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत करण्याची प्रथा आहे.

अष्टागरात पाहुयात कशाप्रकारे हे व्रत केले जाते. भिंतीवर श्री पिठोरी देवीची प्रतिमा साकारली जाते ह्या प्रतिमेमध्ये काय असतं हे पाहुयात. ह्यावर ठळकपणे ६४ योगिनी असतात. आई आपल्या पाळण्यात झोपलेल्या बाळाला जोजवत आहे असे चित्र असते. सूर्य, चंद्र, देवीसाठी पाच फळे, सौभाग्याचे प्रतीक कुंकवाचा करंडा, फणी, बांगड्या, पायातील जोडवे, आरसा. हल्ली देवीचा कागद बाजारात उपलब्ध आहे ह्या कागदात योगिनींसोबत आणखी प्रतिमा असतात जसे की गौरी, गणपती, श्रीकृष्ण, शंकरपार्वती, गाय वासरू, घरकाम करताना स्त्रिया, वाजंत्री, आईकडून प्रसाद घेणारी मुले, हत्ती. असे एकंदरीत स्वरूप असतं.

घरी साकारण्यात येणारी पिठोरी


पूजेसाठी हार फुलांसोबत, तेरडे, आघाडे, लेकुरवाळीची वेल आवर्जून आणली जाते. प्रसाद म्हणून खीर केली जाते.

ह्या दिवशी उपास केला जातो, संध्याकाळी षोडशोपचारे देवीचे पूजन केले जाते, हळदी कुंकवासोबत ६४ योगिनींना तसेच आई आणि बाळाच्या प्रतिमेस काजळ लावले जाते. तेरडे आघाडे देवीस अर्पण केले जातात. लेकुरवाळीची वेल हाराप्रमाणे देवीस अर्पण केली जाते. ह्या वेलीस खूप छोटी छोटी फळे लगडलेली असतात अगदी आईस बाळ बिलगुन बसावे अशा प्रकारे ती दिसतात. त्यामुळे मातृत्वाचे प्रतीक म्हणून ही वेल विशेषतः पूजेत समाविष्ट केलेली आढळते.
लेकुरवाळी

देवीला खिरीचा प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. हा प्रसाद म्हणजे खीर एका ताटात वट्यांमध्ये देवी समोर ठेवला जातो, त्यानंतर आई एक वाटी हातात घेऊन "अतिथी कोण" असे म्हणते तिच्या पाठी असणारे तिचे अपत्य आपले नाव सांगून पाठूनच ती वाटी हातात घेते आणि प्रसाद ग्रहण करते. शक्यतो रव्याची खीर करण्याचा प्रघात आहे. काही ठिकाणी ह्या दिवशी देवीसाठी उकडीचे मोदक केले जातात. एक किंवा अनेक स्त्रिया एकत्र येऊन आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करतात.

थोडक्यात कथा:- पिठोरीचे हे व्रत नागकन्या आणि देवकन्या ह्यांनी एका स्त्रीला सांगितले होते प्रसूती होताच तिचं बाळ दगावत असे, दरवर्षी तिच्या आजेसासऱ्यांच्या श्राद्धाच्या दिवशी हे घडत असे त्यामुळे श्राद्धात अडथळा येई, म्हणून तिला तिच्या सासऱ्यांनी तिच्या मृत बाळासकट घरातून हाकलून दिले होते त्या वेळी म्हणजे श्रावण अमावस्येच्या रात्री एका झाडावर बसून त्या स्त्रीने हे नागकन्या देवकन्यांचे व्रत पाहिले, नागकन्या अतिथी कोण म्हणताच ती स्त्री पुढे आली आणि आपली करूण कहाणी त्यांना सांगितली. नागकन्या आणि देवकन्या ह्यांनी तिचे मृत बाळ आणि आधीच्या मृत बाळांना पुनरुज्जीवित केले, आणि यापुढे तू आपल्या बाळांच्या रक्षणासाठी हे व्रत कर असे तीस सांगितले, पुढे आपल्या सर्व मुलासोबत ती स्त्री तिच्या घरी गेली आणि सुखाने नांदू लागली.

धन्यवाद.


नागपंचमी बद्दल वाचा

रूखवत वाचा











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

10 comments:

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...