नमस्कार,
मी अजित विनोद पंडीत, आपल्याकडे भारतात अनेक सण समारंभ, उत्सव कायम सुरू असतात. मन शांत आणि प्रफुल्लित ठेवण्यासाठी किंवा पुन्हा refresh होण्यासाठी आपल्याकडे सण हा खूप चांगला option आहे. आपल्या सणांबद्दल किंवा संस्कृतीबद्दल खूप माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे मात्र डिजिटल मिडीया किंवा सोशल मीडियावर त्याचा प्रचार हवातसा होत नाही.
मला लिहिण्याची आवड आहे आपल्या संस्कृतीमधील अनेक गोष्टी ज्या काळाच्या पडद्याआड जात आहेत किंवा गेल्या आहेत त्यांना पुन्हा उजाळा द्यायला मला आवडतं त्यासाठी हा छोटासा प्रयत्न.
दरवर्षी पौष महिन्यात १४ किंवा १५ जानेवारीला मकर संक्रांत आपण महाराष्ट्रात साजरी करतो तसेच इतर राज्यात लोहरी, बिहू, पोंगल साजरे केले जातात. आज आपण मकरसंक्रांत ह्याविषयी बोलूयात. आम्ही पालघर परिसरात राहतो आणि तिथे अष्टाघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भागात कशाप्रकारे मकरसंक्रांत साजरी केली जाते ह्याबद्दल आपण पाहुयात.
जसे दिवाळीत आपण उटणे लावून अंघोळ करतो तसे भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ घालून अंघोळ करण्याची येथे प्रथा आहे. हल्ली दिवाळीत थंडी अनुभवता येत नसली तरी मकरसंक्रांतिला ती हमखास हजेरी लावते.
आद्य अगरबत्ती (अष्टागरातील अगरबत्ती) ऑर्डर करा 9637847937 |
भोगीची प्रसिध्द भाजी येथे केली जातेच पण त्याशिवाय येथे उकडहंडी केली जाते त्यास काही ठिकाणी पोपटी म्हणतात. वालाच्या शेंगा, कोनफळ(विशेष प्रकारचा कंद), बटाटा, रताळे, शेवगाच्या शेंगा, एक विशिष्ट प्रकारची वनस्पती आणि मसाला तसेच आपल्या आवडीनुसार इतर पदार्थ एका मडक्यात पाण्याशिवाय घातले जाते. माडक्याचे तोंड बंद करून त्यास शेकोटी मध्ये ठेवून भाजी वाफेवर शिजवली जाते. जिभेवर रेंगाळत राहणारी हयाची चव वर्षभर आठवत राहते. ह्या दिवसात तरले उकडून खाल्ले जातात तरले म्हणजे ताडाच्या फळातून निघालेले कोंब. हे कोंब हळद मीठ घालून उकडवले जातात खूपच चविष्ट असतात हे तरले आता लिहिताना सुद्धा तोंडाला पाणी येतंय माझ्या.
येथे संक्रातीला विशेष प्रकारचे घावन केले जातात त्यास पोळे म्हणतात. तांदूळ, उडीदाची डाळ, जिरे घालून भरभरीत दळले जाते आणि ह्या पिठात दही, मीठ, हळद घालून आंबवले जाते. त्याचे छान घावन केले जातात त्याला पोळे म्हणतात चटणीसोबत नाश्त्याला हे पोळे म्हणजे फक्कड बेत. पोळे कितीही खा पोट भरतं पण मन मात्र भरत नाही.
तिळगुळ आणि मकरसंक्रांत हे समीकरण तर आपण सगळेच जाणतो. तिळगूळ घ्या आणि गोड बोला असे म्हणत आप्त आणि शेजाऱ्यांना तिळगुळ वाटण्याची प्रथा आपल्याकडे सर्वश्रुत आहे. स्त्रिया मकरसंक्रांतीला घरात हळदीकुंकू समारंभ आयोजित करत असतात. ह्यावेळी स्त्रियांना हळदीकुंकू देत तिळगुळ (तिळाचा लाडू) आणि वाण म्हणून एखादी वस्तू, फुल द्यायची प्रथा आहे. नवविवाहित स्त्रिया पहिली पाच वर्षे सौंदर्य प्रसाधने वाण म्हणून देतात, पहिल्या वर्षी हळद आणि कुंकू लुटले जाते. हळदी कुंकवाच्या समारंभात खूप स्त्रियांना आमंत्रण दिली जातात.
ह्या दिवसात थंडी खूप असते त्यासाठी हे सर्व पदार्थ आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात, शास्त्र आणि उत्सव किंवा सण ह्याची सांगड घालणारी आपली एकमेवाद्वितीय संस्कृती आहे हे मी काही वेगळे सांगायला नको.
आपल्याकडे खूप विविधता आहे त्यामुळे माझ्या लिखाणात काही गोष्टींचा उल्लेख राहून गेला असल्यास क्षमस्व.
धन्यवाद.
माझे इतर लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
धन्यवाद.
खूप छान
ReplyDeleteधन्यवाद पूनम
DeleteHari om
ReplyDeleteSundarlihale aahe
खूप छान
Khupach chhan
ReplyDeleteधन्यवाद
Delete