श्री गणेशाय नम:
नमस्कार, मी अजित विनोद पंडित आपण एव्हाना मला ओळखू लागला आहातच आणि माझ्या पोस्टची आतुरतेने वाट पाहता, आपल्याला कुतूहल असते कि येत्या आठवड्यात नवीन काय वाचायला मिळेल, हे कुतूहल ही उत्सुकता खूप आनंददायी आहे. आपल्या ब्लॉगची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे आणि आपण सगळेच त्याचे वाटेकरी आहात.
आपल्याकडून खूप छान आणि वेगवेगळया कमेंट येत आहेत काही कौतुकाच्या, काही माहिती देणाऱ्या तर काही नवीन सुचवणाऱ्या, सगळयांचे मी आभार मानतो. या ब्लॉगच्या माध्यमातून मी अष्टागर उलगडण्याचा प्रयत्न करतोय, काही गोष्टी मनाशी ठरवून एक स्वरूप तयार केले आहे त्यानुसार मी पोस्ट लिहीत असतो, या कारणाने सगळे विषय येथे नमूद करता येत नाही ब्लॉग च्या मर्यादेनुसार मला पोस्टची लांबी ठेवावी लागते. हल्ली वेळेला खूप महत्व आहे त्यामुळे पोस्ट जास्त लांबवत नाही जेणेकरून सगळेच ती वाचू शकतील. तरी देखील कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय.
अष्टागराची
एक खासियत सांगतो, येथील प्रत्येकाचे आठही गावांशी ऋणानुबंध आहेत प्रत्येकाच्या गोड
आठवणी या गावांमध्ये आहेत. अष्टागर हे एक घर आहे त्यामुळे "अष्टाघर" असाही
आपण उच्चार करू शकता. मजेशीर गोष्ट म्हणजे विवाह प्रसंगात जर दोन्ही पक्ष अष्टागरातले
असले तर दोन्ही पक्षांचे ९०% पाहुणे सामायिक (कॉमन) असतात आहे कि नाही गम्मत. आपण आत्तापर्यन्त
अष्टागरातील तीन गावे पाहिलीत बरीच माहिती आपण पोस्ट केली आहे आज आपण सरावली या गावाविषयी
जाणून घेणार आहोत.
सरावली
:- बोईसर च्या खांद्याला
खांदा लावून बोईसर पालघर रस्त्यावर वसलेले हे गाव, येथे आता मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे मला
वाटते कि अष्टागरातील सगळ्यात जास्त शहरीकरण झालेले हे एकमेव गाव आहे. सरावलीत आता
जुन्या घरांच्या जागेवर नवीन बंगले आणि इमारती पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी आजही
जुन्यापद्धतीची टुमदार घरे आपण पाहू शकता. ब्राह्मण आळीमध्ये प्रशस्त सिमेंटचे रस्ते
आहेत. त्यामुळे सहज सोप्या पद्धतीने दळण वळण करता येते.
सरावली
गावात नाईक, जोशी, रोडे, कुलकर्णी तसेच रत्नाकर ही कुटुंबे वस्त्याव्यास आहेत. त्यांची
येथील आणि बाहेर वस्त्यव्यास असणारी अंदाजे ७५ लोकसंख्या असावी. विस्तृत माहिती पुढील
प्रमाणे,
नाईक
कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी असून गोत्र कात्यायन आहे.
जोशींची
कुलस्वामिनी श्री पिंपळादेवी, सातारा असून वसिष्ठ हे त्यांचे गोत्र आहे.
गावात
रोडे मंडळी सुद्धा वास्त्यव्यास आहेत त्यांची कुलस्वामिनी श्री पाटणादेवी, चाळीसगाव
असून भारद्वाज गोत्र आहे.
रत्नाकर
कुटुंब गेली अनेक वर्ष येथे असून त्यांची कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी असून भारद्वाज
गोत्र आहे.
येथे अनेक वर्षापासून कुलकर्णी कुटुंब स्थायिक असून त्यांचे गोत्र वसिष्ठ आहे आणि कुलस्वमिनी श्री रेणुका माता आहे.
गावात
मुख्यत: पौरोहित्य केले जाते इथल्या ब्राह्मणेतर समाजातील बऱ्याच गावात येथील ब्रह्मवृंद
पौरोहित्य करतात. जोशिंचे यजमान सरावली, महागाव, कुकडे, नागझरी, किराट, बोरशेती पर्यंत
असून नाईकांचे उमरोळी, पंचाळी ,आगवण आणि परिसरात आहेत. येथील पुरोहित वसई विरार तसेच मुंबईत
देखील पौरोहित्य करतात. येथील ब्रह्मवृंदांवर
ब्राह्मणेतर समाजाचा मोठा विश्वास असून इतर अष्टागारातील गावांप्रमाणे यांनाही समाजात
बहुमान आहे.
वैद्यकीय
क्षेत्रात येथील दोघांचा समावेश आहे, येथील जोशी कुटुंबातील डॉ. श्वेता मुकेश जोशी
ह्या MS in Obstetrics and Gynaecology अर्थात स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. तर डॉ अमित
दिलीप जोशी हे DM Super Specialist in Gastroenterology आहेत.
मुळचे सातारा येथील पण आता येथे स्थायिक असणारे स्वप्निल सतीश शहाणे बैंकेत ब्रांच मॅनेजर आहेत या कुटुंबाचे गोत्र शांडिल्य असून श्री महालक्ष्मी कुलस्वामिनी आहे.
सरावली मध्ये एक गोगटे कुटुंब असून आलेवाडी चे नाईक कुटुंबाचे ते जावई आहेत आलेवाडी च्या कन्या संध्या गजानन नाईक (पूर्वश्रमीचे नाव) ह्याचे हे सासर असून त्या स्वतः शासनाच्या अंगणवाडी विभागात उच्चपदस्थ होत्या आता सेवा निवृत्त आहेत.
सरावली
येथील बरीच मंडळी शिक्षक आहेत काही सेवा निवृत्त झाले आहेत आजही त्यांना पंचक्रोशीत
बहुमान आहे. येथील काही स्त्रिया अंगणवाडी शिक्षिका
तसेच पोस्टाची कामे करतात. तर मुळच्या पोखरणच्या कन्या सौ स्वाती श्रीकांत जोशी स्वतः वधुवर सूचक मंडळ चालवतात.
येथील
मंडळी सरपंच, पोलीस, पोलीस पाटील म्हणून पदे भूषवित आहेत. काही मंडळी खाजगी नोकरी करत
असून काही सरकारी नोकरीत आहेत, प्राध्यापक आहेत, काहींचे व्यवसाय आहेत. येथील श्री सुरेश जोशी बँकेत
उच्चपदस्थ होते. खैरापाडा स्थित श्री अविनाश जोशी हे NPCIL म्हणजेच अणुऊर्जा केंद्र
काकरापारा गुजरात येथे Manager-Hopitality या पदावर कार्यरत होते आता सेवा निवृत्त आहेत.
येथील
जुनी आठवण सांगायची तर येथील कै. गजानन सदाशिव नाईक हे नाट्यकर्मी होते, ते अभिनय,
दिग्दर्शन करीत असत आणि अभिनय कला शिकवीत असत त्यासोबत ते पौरोहित्य देखील करीत.
येथील
रोडे कुटुंबाची कुलस्वामिनी श्री पाटणा देवी (चाळीसगाव) असून हे एक शक्तीपीठ आहे सतीच्या
उजव्या हाताचा भाग येथे येऊन पडला होता म्हणून वरदहस्त शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते.
हे एक जागृत पीठ आहे. १२ व्या शतकात उभारले गेलेलं हे हेमाडपंथी मंदिर एक पर्यटन स्थळ
आहे. निसर्गाच्या सानिध्यात
हे विसावलेले सुंदर मंदिर नवरात्रीला खूप बहरलेलं असते येथे वर्षभर भक्तांचा राबता
असतो. देवीचे रूप सप्तशृंगी देवी प्रमाणे आहे.
![]() |
श्री पाटणादेवी मंदिर, चाळीसगाव |
श्री पिंपळा देवी :- येथील जोशी कुटुंबाची ही कुलस्वामिनी आहे. साताऱ्या पासून अंदाजे 50 किलोमीटर वर औंध येथे देवीचे स्थान आहे. श्री यमाई आणि तसेच श्री काळूबाई या नावाने देखील देवीला ओळखले जाते. औंध येथे गडावर किल्ल्यामध्ये देवीचे मंदीर आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणात असून देेेेवी दोन मीटर ऊंच आहे, मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या हातात गदा, त्रिशूळ, धनुष्यबाण आणि पानपात्र आहे. मकर संक्रांतिला देविचा मोठा उत्सव असतो.
सौजन्य :- मला सरावली पोस्ट लिहिण्यासाठी श्री विनोद
नाईक, सौ वनिता विनोद नाईक, श्री विकास विनोद नाईक तसेच श्री रुपेश शशिकांत जोशी ह्यांनी बहुमूल्य मदत केली
आहे.
वाचा आलेवाडी बद्दल माहिती,
वाचा नांदगांव बद्दल माहीती,
वाचा टेंभी बद्दल माहीती,
वाचा अष्टागर प्रस्तावना.