Friday, October 30, 2020

नवान्न पौर्णिमा

 श्री गणेशाय नमः 


नवान्न पौर्णिमेचे नवकं 

नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, आज माझ्या ह्या विशेष पोस्ट मध्ये आपण नवान्न पौर्णिमेबद्दल जाणून घेणार आहोत. बरेचदा कोजागिरी आणि नवान्न पौर्णिमा एकाच दिवशी येतात मात्र ह्या वर्षी वेग-वेगळ्या आहेत. आपल्या अष्टागरात नवान्न पौर्णिमेला वेगळे महत्व आहे.

आपल्या महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्र पूजन करतो, पाटी पूजन (सरस्वती पूजन)करतो, आपल्या घरातील विविध वस्तू ,वाहने ह्यांची देखील पूजा करतो, सोने वाटले जाते हे सगळे इथे आपल्या अष्टागारात देखील केले जाते मात्र दाराला तोरण नवान्न पौर्णिमेला बांधले जाते. 

अष्टागरात ह्या तोरणाला नवकं असे म्हणतात आणि हे बनवण्याची पद्धत सुद्धा थोडी वेगळी आहे. भरीव बांबूचा रुंदीने लहान आणि दाराच्या मापाचा तुकडा घेतला जातो तो मध्ये चिरून त्याचे दोन भाग केले जातात. काही जण दोन बांबू घेऊन हे तोरण बनवतात. आंब्याचे पान, झेंडूचे फुल, भाताचे कणीस हे सगळे एकत्र करून चिरलेल्या बांबू मध्ये घट्ट बसवले जाते, अशाप्रकारे एकमेकांना लागून आपल्या दाराला पुरेल इतके गुच्छ लावले जातात. हे तोरण दिसायला अतिशय सुंदर असते. सोबत एक गुच्छ देखील दोरीला बांधून एकेरी तोरण तयार केले जाते.

हे नवकं आणि इतर एकेरी तोरणं एका पाटावर ठेवून त्याची पंचोपचारे पूजा केली जाते. आणि घराच्या मुख्य दाराला हे तोरण बांधले जाते. तयार केलेली एकेरी तोरणं घरातील इतर दारांना, इलेट्रॉनिक वस्तू, कपाटे, वाहने ह्यांना बांधायची प्रथा आहे. खूप मंगलमय वातावरण असते ह्या दिवशी.

आपल्याला कल्पना यावी ह्या उद्धेशाने नवक्याचा आणि एकेरी तोरण ह्याचे फोटो सोबत शेअर करत आहे. आहे की नाही वेगळी प्रथा. ह्या रूढी ह्या प्रथा परंपरांमुळेच अष्टागराने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे.

आंब्याचे पान  फुल आणि कणसाचा गुच्छ  



Wednesday, October 28, 2020

अष्टागरातील नगावे गाव

 

श्री गणेशाय नमः

श्री रेणुका देवी 

नमस्कार, मी अजित विनोद पंडीत अष्टागर लेखमालेतील हे सातवे ग्रामपुष्प आपल्या समोर सादर करीत आहे. आपल्या अष्टागरातील सुसंस्कृत ब्राह्मण समाजाविषयीची खूप सकारात्मक माहिती आपण आजवर वाचलीत. आता पुढील गाव नगावे. अनवधानाने कुठला उल्लेख राहिला असल्यास माझ्या व्हाट्सअप क्रमांकावर माहिती द्या उल्लेखनीय बाब असल्यास आपण नक्की add करू.

नगावे :-  सफाळे रेल्वे स्थानकापासून अंदाजे ८ कि.मी. अंतरावर हे गाव वसले आहे. गावाच्या ईशान्य दिशेला तलाव असून तलावाचे खोदकाम करताना काही प्राचीन मूर्ती तसेच पायऱ्या सापडल्या आहेत तलाव उत्खननाचे कार्य हे कै. श्री दिवाकर पंडित ह्यांच्या कार्यकाळात झाले असून ते येथे ११ वर्ष सरपंच म्हणून कार्यरत होते, अनेक लोकाभिमुख कामे त्यांनी केली आहेत. तळ्याच्या पश्चिम काठावर श्री वाघ्या देव आपल्या छोटेखानी व टुमदार मंदिरात विराजमान झाले आहेत. तसेच गावात दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर आहे जन्मोत्सवाला येथील ब्रह्मवृंद मारुतीची मनोभावे सेवा करतात कै मोरेश्वर तिवाड ह्यांनी हा उत्सव सुरु व्हावा ह्यासाठी खुप प्रयत्न केले होते समाजात त्यांना बहुमान होता कै. श्री अनंत तिवाड ह्यांनी देखील अनेक लोकाभिमुख कार्य केली असून ते उपसरपंच आणि ग्रामपंचायत संदस्य होते. श्री शेड्या देव ग्रामदैवत आहे. गावात पाटील, जोशी, तिवाड, पंडित, पाध्ये ही कुटुंबे राहतात.

श्री मारुती, श्री वाघ्या देव मंदीर, तलाव.. नगावे.

श्री मारुती पालखी, नगावे 


येथील पाटील आणि जोशी कुटुंब एकच आहे काही मंडळी जोशी तर काही पाटील हे आडनाव लावतात ह्या कुटुंबाची कुलस्वामिनी श्री रेणुका माता असून कश्यप गोत्र आहे.

तिवाड कुटुंबाचे गोत्र कात्यायनी असून कोल्हापूर ची श्री महालक्ष्मी त्यांची कुलस्वामिनी आहे.

पंडित कुटुंबाचे गोत्र मैत्रेय असून श्री रेणुका माता त्यांची कुलस्वामिनी आहे.

पाध्ये  कुटुंबाचे गोत्र जमदग्नी असून  श्री मुजबा देवी ही त्यांची कुलस्वामिनी आहे.

मी जसे म्हणतो की आपल्या अष्टागरातील प्रत्येक गावात काही ना काही विशेष आहेच आपला समाज नेहेमीच हुशार आणि सुसंस्कृत मानला जातो आणि त्याची प्रचिती नेहेमी येतेच त्याचे उदाहरण म्हणजे नगावे येथील विरारस्थित श्री विजय सीताराम जोशी (पाटील) हे पेशाने वकील आहेत गावातले पहिलेच  पदवीधर आहेत व एल एल बी आहेत.  त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई हायकोर्टात वर्ग दोन अधिकारी म्हणून काम करत असताना एका विशेष केसच्या निकालपत्रात (३२१ पानी) त्यांचा विशेष कार्यासाठी खास उल्लेख केला गेला आहे आणि असे पहिल्यांदा कुणाच्या बाबतीत झाले आहे. १९९१-९२ साली शेअर बाजारात हर्षद मेहता ह्याने केलेल्या घोटाळा प्रकरणाची ही केस होती. आता श्री विजय जी सेवानिवृत्त आहेत, आहे की नाही त्यांचे कार्य उल्लेखनीय आणि अभिमानास्पद बाब.

केस च्या निकालपत्रातील श्री विजय जोशी ह्यांचे विशेष उल्लेख असलेले पान 

श्री विजय जोशी ह्यांचा पुत्र प्रथमेश जोशी ह्याने भूतदयेचे खूप छान उदाहरण जगासमोर मांडले आहे, कोरोना लोकडाऊन च्या पार्श्वभूमीवर विरार येथील २० ते २२ श्वानांना (कुत्र्यांना) दोन वेळचे अन्न आणि पाणी स्वखर्चानं ४० दिवस पुरवले आहे. त्याच्या कामाची नोंद महाराष्ट्र टाइम्स ने देखील घेतली होती. प्रथमेश हा इंजिनीअर असून मर्चंट नेवी मध्ये नोकरीस आहे.

प्रथमेश चा उल्लेख असलेले कात्रण 

गावातील बारिच मंडळी पौरोहित्य करत असून विरार ते थेट मुंबई, ठाणे परिसरात कार्यरत आहेत. येथे अनेक पदवीधर आहेत, खाजगी तसेच सरकारी नोकरीत आहेत शासनाचा परिवहन RTO विभाग, एस टी येथे कार्यरत आहेत. खाजगी मध्ये काही इंजिनीअर, डेप्युटी मॅनेजर  आहेत. येथील होतकरू तरुण निखिल तिवाड, अक्षय पाटील आणि नितीश तिवाड व्यवसायात उतरले असून पूजा साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात, तसेच वसईस्थित श्री श्याम जोशी हे देखील अशाच प्रकारचा  व्यवसायात आहेत. मुंबईस्थित श्री संदीप काशिनाथ तिवाड ह्यांचा केबल व्यवसाय आहे. येथील श्री मनोज भालचंद्र पाटील हे वनविभागात परिमंडळ वन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. श्री संजय मोरेश्वर तिवाड हे नोकरीनिमित्त परदेशात आहेत. येथील श्री पांडुरंग विनायक जोशी ह्यांचा छोटासा जनरल स्टोअर्स चा व्यवसाय आहे.

येथील छाया नरेंद्र तिवाड (पुर्वश्रमीचे नाव) ह्यांचे सुपुत्र श्री अक्षय विश्वनाथ मुळे ह्यांनी विमान शास्त्राचा अभ्यास केला आहे तसेच शैक्षणिक प्रशिक्षण द्यायचा व्यवसाय आहे त्याने M.Tech in Mechanics Of food, B. Tech in Aerospace Engineering, MBA  in Marketing and Finance  केले आहे. विशेष म्हणजे अक्षय ह्यांच्या मातोश्री ह्यांचा देखील वाण सामान आणि इतर वस्तू विक्रीचा व्यवसाय असून पुर्वाश्रमी त्यांनी बी. ए. पर्यंत शिक्षण अतिशय बिकट परिस्थिती मध्ये केले आहे.

येथील मुंबईस्थित श्री रवीताभ काशिनाथ जोशी हे यूट्यूबर आहेत त्यांचे यूट्यूब वरील चॅनेल भटकंती एक प्रवास खूप लोकप्रिय आहे लाखो चाहते आहेत या चॅनेलचे. मुंबईतील विविध मूर्तिकार, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कोळी बँड, इतर वाद्यवृंद आणि असे बरेच काही त्यांच्या चॅनेल वर आपण पाहू शकता. मी लिंक देतो आहे "भटकंती एक प्रवास" ह्यावर क्लिक करून आपण नक्कीच त्यांचे चॅनेल पहा. 

गावातील काही मंडळी शेती करत असून गावात सगळ्यात जास्त शेती येथील ब्रह्मवृंदांची आहे. कायमच ग्रामपंचायती मध्ये येथील सदस्य निवडून येत असतात तर बरेचवेळा सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आपल्याच समाजाचे आहेत. इथल्या ब्राह्माणेतर समाजात आपल्या समाजाला खूप मान आहे.

श्री रेणुका देवी : - नगावे येथील पाटील/ जोशी , पंडित कुटुंबाची ही कुलस्वामिनी असून आपण सगळे देवीबद्दल जाणून आहात. नांदेड येथील माहूर येथे देवी विराजीत आहे.

देवीची आख्यायिका :- शिवाची पत्नी पार्वती ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूर चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येउन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.

सौजन्य :- सर्वप्रथम मी आभार मानतो श्री विजय सीताराम जोशी ह्याचे त्यांनी खूप मदत केली आहे मला ही पोस्ट लिहिण्यासाठी, श्री दयेश जोशी तसेच नितीश तिवाड, सौ. कृतिका ओंकार पंडीत ह्यांनी देखील बरीच माहिती दिली आहे. 

धन्यवाद,  

वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

Friday, October 23, 2020

कुलस्वामिनी अष्टागराच्या

 श्री गणेशाय नमः 

नमस्कार मंडळी मी अजित विनोद पंडीत आपल्या आजच्या विशेष पोस्ट मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे सध्या नवरात्र सुरु आहे आणि कोरोनाच्या साथीमुळे शक्यतो आपल्याला बाहेर मंदिरात जाता येत नाही त्यामुळे आपल्या अष्टागारातील परिवारांच्या कुलस्वामिनी बद्दल आज आपण माहिती घेऊयात.

 

1)     श्री चंडिका देवी,

2)     श्री महालक्ष्मी देवी,

3)     श्री आशापुरा देवी,

4)     श्री वेडुबाई माता,

5)     श्री पिंपळा देवी,

6)     श्री पाटणा देवी,

7)     श्री रेणुका देवी,

8)     श्री मुजबा देवी,

9)     श्री महाजाई,

10)  श्री भवानी माता.

चला करूया दर्शन आपल्या कुलस्वामिनीचे.

 

श्री चंडिका देवी :- आलेवाडी येथील पंडीत कुटुंबाची कुलस्वामिनी श्री चंडिका देवी रत्नागिरीतील दापोली शेजारी दाभोळ येथे आहे, देवीचे कौलारू मंदिर हे आपण कोकणात आहोत ह्याची प्रचिती देते. देवीच्या मंदिर परिसरात एक गोड पाण्याचा झरा आहे ह्या पाण्यात पाय धुवून मंदिरात प्रवेश केला जातो. देवी मंदिराच्या आत एका शांत, खोल व थंड गुहेमध्ये विसावली आहे. राक्षस मर्दुन देवीने येथे विसावा घेतला आहे, देवीचे लोभस रूप समईच्या मंद प्रकाशात उजळून निघालेले आपण पाहू शकता, देवीला समईचा प्रकाश जास्त प्रिय असावा म्हणून आजही गाभाऱ्यात विजेचा दिवा टिकत नाही.

मंदिराच्या शेजारी पुरातन समाधी आढळते. मंदिर परिसरामध्ये शिवकालीन भुयार आहे. महाराज आणि मावळे त्याचा वापर करीत असत हल्ली मात्र हा भुयारी मार्ग बंद आहे.

मैसूर येथे श्री चंडिका देवीचे मूळ स्थान असून वसई जूचंद्र येथे देखील ही देवी छोटेखानी टेकडीवर विराजमान झाली आहे हे मंदिर पांडव कालीन असून हल्ली मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. श्री चंडिका, श्री महिषासुर मर्दिनी आणि श्री महाकाली अशा तिघी देवी येथे बसल्या आहेत. वसईचा किल्ला बांधतांना श्री चिमाजी अप्पा ह्यांनी येथील दगड वापरले होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

 

श्री चंडिका देवी

श्री चंडिका देवी , मंदिर 


श्री महालक्ष्मी देवी : - कोल्हापूरची अंबाबाई ही अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे अष्टागरातील अनेक कुटुंबांची ती कुलस्वामिनी आहे. फाटक, पंडीत, पाठक, जोशी, तिवाड, शहाणे,  ह्या कुटुंबाची ही कुलस्वामिनी आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे. देवी बद्दल माहिती जग जाहीर आहे आपण देवीची थोडी वेगळी माहिती पाहुयात.

पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५.

तोच ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले.छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत.

श्री महालक्ष्मी देवी

श्री महालक्ष्मी देवी, मंदिर


श्री महालक्ष्मी देवी मंदिर , पोखरण

श्री आशापुरी माता :- राणे कुटुंबाची कुलस्वामिनी आशापुरी माता सफाळे येथील एडवण गावात समुद्रात वसली आहे, समुद्रात एका छोटेखानी बेटावर /टेकडीवर सर्वोच्च ठिकाणी गुहेमध्ये देवी  विराजमान झाली आहे. देवीचे मंदिर देखील खूप सुंदर आहे. या टेकडीवर देवी सोबत काही वृक्ष आहेत त्यांना येथील बोली भाषेत राजणीचे वृक्ष म्हणतात. आता देवी पर्यंत जाण्यासाठी सिमेंटचा मार्ग असून येथे विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. राणे कुटुंबीय नेहेमी देवीच्या मंदिरासाठी सुखसोयी करण्यात तत्पर असतात. समुद्राला भरती असली की या टेकडी च्या चोहोबाजूने पाणी असते.

देवीचा डोंगर म्हणा किंवा टेकडी अतिशय नयन रम्य आहे मागील बाजूस खूप छान परिसर आहे समुद्राचे पाणी येथील दगड अतिशय फोटोजेनिक जागा आहे. काहींच्या म्हणण्यानुसार मागे एक पाण्याचा खड्डा किंवा खोल विहीर आहे त्याच्या खोलीचा थांग लागत नाही. अतिशय नयन रम्य ठिकाण आहे. येथील कोळी समुदाय ह्या देवीचे मनोभावे सर्व काही करीत असतात.

आपण थेट मंदिरापर्यंत आपल्या वाहनाने जाऊ शकता. सफाळे रेल्वे स्टेशन पासून एडवणला जायला सहा आसनी रिक्षा तसेच एस टी बसेस ची सोय आहे.

श्री आशापुरी देवी

 
श्री आशापुरी देवी, मंदिर

श्री वेडुबाई माता :- आलेवाडी चे नाईक कुटुंबाची ही कुलस्वामिनी असून आलेवाडी येथे हिचे मंदिर आहे. येथील श्री वेडुबाई मातेचे छोटेखानी मंदिर मनाला शांती देणारे असून देवी सोबत श्री परशुरामाची आणि श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे, देवीचे व्याघ्रवाहन आणि कूर्म देवीसमोर नतमस्तक झालेले आढळतात. नाईक कुटुंब मंदिराचा वर्धापन दिन साजरा करतात तसेच नवरात्रौत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

नाईक कुटुंबाच्या कुलस्वामिनीचे मूळ स्थान उस्मानाबाद येरमाळा आहे. तेथूनच देवीची मूर्ती तसेच अखंड तेवणारा दीप मंदिर उभारणीच्या वेळेस आणले गेले होते.

येरमाळा येथे एका टेकडीवर किंवा छोटेखानी गडावर देवी विराजमान झाली आहे मंदिर परिसरात श्री दत्त, गणपती श्री दुर्गा ह्यांच्या मूर्ती आहेत टेकडीवर अनेक वृक्ष आहेत. येथील स्थानिक मंडळी येथे दरवर्षी चुना वेचण्यासाठी येतात.

देवीची गोष्ट :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते. देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात.

 

श्री वेडुबाई माता, आलेवाडी 

श्री येडेश्वरी माता ,येरमाळा 


श्री येडेश्वरी माता मंदिर, येरमाळा 

श्री पिंपळा देवी :- सरावली येथील जोशी कुटुंबाची ही कुलस्वामिनी आहे. साताऱ्या पासून अंदाजे 50  किलोमीटर वर औंध येथे देवीचे स्थान आहे.  श्री यमाई आणि तसेच श्री काळूबाई या नावाने देखील देवीला ओळखले जाते.  औंध येथे गडावर किल्ल्यामध्ये देवीचे मंदीर आहे.  देवीची मूर्ती काळ्या पाषाणात असून देेेेवी दोन मीटर ऊंच आहे, मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या हातात गदा, त्रिशूळ, धनुष्यबाण आणि पानपात्र आहे. मकर संक्रांतिला देविचा मोठा उत्सव असतो.

कोल्हापुरची अंबाबाई आणि श्री राम देविला "ये माई" अशा प्रकारे बोलवित असत त्यावरून देवीस यमाई हे नाव प्राप्त झाले आहे अशी आख्यायिका आहे.

सरावली च्या खैरा स्थित सौ. सुप्रिया सुशिल जोशी ह्यांनी देवीची माहिती आपल्या पर्यंत पोहचवली आहे मी त्यांचे आभार मानतो

श्री पाटणा देवी:- सरावली येथील रोडे कुटुंबाची कुलस्वामिनी श्री पाटणा देवी (चाळीसगाव) असून हे एक शक्तीपीठ आहे.

माता सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारदमुनींच्या सूचनेवरुन माता सती यज्ञ सोहळ्यास येतात. मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता सती अपमान झाला म्हणून स्वतःच्या शरिरातील प्राण काढून घेते त्यामुळे तिचे शव यज्ञ मंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात आणि तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करु लागतात. त्यावेळी त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप उडतो. अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णु सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात. उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तिचीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करुन चंडिकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरुन खाली यावे अशी विनंती गोविंद स्वामींनी भगवतीला केली. यावर भगवतीने होकार देतांना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते. कुंडात स्नान कर तेव्हा माझी स्वयंभु मुर्ती तुझ्या हातात येईल असे भगवती सांगते. पाटणादेवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या स्वयंभु मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केली आहे.

पाटणादेवी हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 18 किमी अंतरावर नैऋत्येला असणारे हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तिचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात.

श्री पाटणा देवी


श्री पाटणा देवी, मंदिर


श्री रेणुका देवी : - नगावे येथील पाटील/ जोशी , पंडित कुटुंबाची ही कुलस्वामिनी असून आपण सगळे देवीबद्दल जाणून आहात. नांदेड येथील माहूर येथे देवी विराजीत आहे.

देवीची आख्यायिका :- शिवाची पत्नी पार्वती ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूर चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येउन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.

श्री रेणुका देवी

श्री रेणुका देवी, मंदिर


श्री मुजबा देवी :- वेढी येथील पाध्ये कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी आहे. मांडा, सफाळे येथे देवीचे स्थान आहे. देवीचे मंदिर सुंदर असून समोर पुरातन विहीर आहे, मनशांती साठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. छायाचित्रांमध्ये आपण ते अनुभवू शकता.

देवीबद्दल :- देवीबद्दल :- कै केशवराव कुशाबा आचार्य ह्यांना श्री तुळजा भवानी देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि  "मांडा सफाळे येथे आसपासच्या टेकडीवर मी श्री मुजबा देवी या नावाने स्वयंभू प्रकट झाले आहे तू मला माझे स्थान बांधून दे" अशाच प्रकारचे स्वप्न गोसावी श्री सोमगिरी हे मांड्यात आले होते तेव्हा त्यांना पडले होते "तू मुंबईला जाऊन श्री केशवरावांना भेट आणि त्यांना इथे घेऊन ये"असे देवीचे सांगणे होते, गोसावी आणि श्री केशवराव तसेच त्यांचे बंधू श्री गणेश आचार्य ह्या सर्वांनी मांडे परिसरात येऊन बैलगाडीत स्वयंभू प्रकट मूर्ती घेतली आणि सफाळेच्या दिशेने प्रवास सुरु केला पुढे जात असताना गावाच्या वेशीवर गाडीचा बैल आज देवीचे मंदिर आहे तिथे बसून पडला हेच ते स्थान. ही जागा केशवरावांनी विकत घेऊन वैशाख शुद्ध पौर्णिमा शके १८१४ इसवी सन १८९२ रोजी देवीची स्थापना केली.

श्री मुजबा देवी, मांडा


श्री मुजबा देवी मंदिर, मांडा

श्री महाजाई :- वेढी येथील साठे कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी असून आलेवाडी येथील एका नाईक कुटुंबाची देखील ही कुलस्वामिनी आहे. बोईसर पासून अंदाजे ७ किलोमीटर वर महागाव वसले आहे तेथेच श्री महाजाई देवीचे सुंदर स्थान आहे. देवीचे मंदिर एका छोटेखानी घराप्रमाणे आहे अतिशय सुंदर मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला अनेक वृक्ष आहेत परिसर अतिशय लोभस आहे एकूणच मन प्रसन्न करणारे हे पवित्र स्थान आहे.  

मंदिरामध्ये देवीच्या मूर्ती सोबत आणखी काही पुरातन मूर्ती आहेत. मंदिरासमोर तुळशीवृंदावन आहे. देवीचे देखणे रूप , छानदार नथ मन प्रसन्न करते. देवीसमोर संगमरवर दगडामध्ये कोरलेली देवीची पाऊले खूप रेखीव आहेत.

श्री महाजाई, महागाव

श्री महाजाई, मंदिर महागाव

श्री भवानी देवी :-  बहाड येथील काही मंडळी श्री भवानी देवीस आपली कुलस्वामिनी मानतात, देवी सर्वश्रुत आहे, देवीबद्दल माहीती पुढील प्रमाणे.

 महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत.पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सागितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.

पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे.

श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.

नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.


श्री भवानी माता

श्री भवानी माता, मंदिर


 सौजन्य :- नावरात्री बद्दल पोस्ट लिहावी हे मनात होते मात्र काही केल्या ते होत नव्हते आज वेढी येथील श्री प्रसाद तिवाड ह्यांनी आग्रह केला आणि खूप मदत देखील केली त्यामुळे मी आज ही पोस्ट करू शकलो तसेच सौ स्वप्नाली साठे, श्री प्रशांत सुधीर नाईक ह्यांनी देखील मदत केली आहे.









वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


Wednesday, October 21, 2020

अष्टागरातील पोखरण गाव

 


श्री गणेशाय नमः

                                                                                


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, आपण दर आठवड्याला भेटत असतो आणि नव-नवीन माहिती जाणून घेत असतो, आत्ता पर्यंत आपण बहाड पर्यंत पोहोचलो होतो ५ गावांची माहिती आपण प्रकाशीत केली असून आज आपण अष्टागरातील पोखरण बद्दल माहिती घेणार आहोत. आपण जर या आधी माझ्या पोस्ट वाचल्या नसतील तर या पोस्टच्या शेवटी मी प्रत्येक गावाचे नाव नाव लिहिले आहे त्यावर क्लीक करून आपण अष्टागरातील माहिती मिळवू शकता. 

कोरोनाच्या संकटामुळे मी व्यक्तिशः भेटून गावांची माहिती मिळवू शकत नाही त्यामुळे फोन, व्हाट्सअप, फेसबुक च्या माध्यमातून मी माहिती एकत्रित करीत असतो तसेच मला माहिती देणारे किंवा मी स्वतः देखील व्यवसायाने लेखक किंवा पत्रकार नाही त्यामुळे काही माहिती अनवधानाने राहून जाऊ शकते. आपल्या सर्व वाचकांना विनंती आहे की एखादी माहीती राहून गेली आसल्यास माझ्या ९६३७८४७९३७ ह्या क्रमांकावर व्हाट्सअप करावी. उल्लेखनिय माहिती असल्यास आपण नक्कीच त्या पोस्टमध्ये प्रकाशित करूच. ह्या ब्लॉगचा हेतू हाच आहे की अष्टागरातील माहिती मूर्तस्वरुपात कुठे तरी उपलब्ध असावी.  आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. चला आता अष्टागरातील पोखरण बद्दल माहिती घेऊया.  

पोखरण :- डहाणू तालुक्यातील हे अष्टागरातले दुसरे गाव, पोखरण म्हंटले कि चिंचेचे वृक्ष त्यांची शीतल छाया, येथील लाल वाल, ह्या गोष्टी मनात आल्या शिवाय राहत नाहीत.  पोखरण ची भौगोलिक परिस्थिती पाहता एका बाजूला वाणगाव रेल्वे स्थानक आहे तर दुसऱ्या बाजूला डहाणू रेल्वे स्थानक आहे. गावात येण्यासाठी दोन मार्ग आहेत. गावाच्या दोन वेशीवर दोन देवी विराजमान आहेत पहिली ग्रामदेवता श्री पद्मावती माता तर दुसरी अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी.  

गावात ब्रह्मवृन्दाची तीन कुटुंबे आहेत जोशी, पंडित आणि राणे, जोशींचे गोत्र वसिष्ठ असून श्री महालक्ष्मी त्यांची कुलस्वामिनी आहे. पंडित कुटुंबाचे मैत्रेय गोत्र आहे आणि आई महालक्ष्मी कुलस्वामिनी आहे तर राणे कुटुंबीयांची कुलस्वामिनी श्री आशापुरी माता, एडवण असून गोत्र गार्ग्य आहे. श्री पद्मावती ही त्यांची ग्रामदेवता असून आई महालक्ष्मी आणि श्री कृष्ण त्यांचे आराध्य आहेत. गावातील व कामानिमित्त बाहेर असणारी ब्रम्हवृंदांची लोकसंख्या अंदाजे २१० आहे.

गावात पौरोहित्य केले जात असले तरी अनेक मंडळी शिक्षकी पेशात आहेत येथील पुरोहित पंचक्रोशीत तसेच मुंबई पर्यंत सर्वदूर पौरोहित्य करतात. काही मंडळी खाजगी नोकरी करीत असून काही व्यवसाय करतात. आणखी महत्वाचे म्हणजे पोखरणकर नेहेमी म्हणतात की क्रिकेट आमच्या रक्तात आहे.

येथील आशागड स्थित श्री संजीव शशिकांत जोशी ह्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदले गेले आहे त्यांनी एका दिवसात भारतीय राज्य घटनेवर सलग ४० व्याख्याने दिली आहेत आणि प्रत्येक व्याख्यान सलग ३० मिनिटांचे होते आणि महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे श्रोते असत व्याख्यानाचा एकही विषय पुन्हा घेतला नाही (नवीन व्याख्यान नवीन विषय). आपल्या ब्लॉग तर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो.  गेली अनेक वर्ष ते दैनिक राजतंत्र प्रकाशित करीत आहेत तसेच काही वर्ष त्यांनी डहाणू न्युज सुद्धा केबल टीव्ही वर सुरु केले होते. काही वर्ष त्यांनी कोचिंग क्लासेस देखील चालवलेत, त्यांचे विध्यार्थी चांगले गुण मिळवीत असा क्लासचा नावलौकिक होता. त्यांचे बंधू श्री शेखर शशीकांत जोशी हे व्यवसायाने वकील असून आयात निर्यात करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. दुसरे बंधु श्री राजेश जोशी हे त्यांचा बांधकाम व्यवसाय सांभाळतात. त्यांचे वडील श्री शशिकांत जोशी हे सर्कल अधिकारी होते आता सेवानिवृत्त आहेत. 

येथील कै. मोरेश्वर हरी जोशी हे मुख्य शिक्षक म्हणून काम करीत व परिसरातील सर्व शाळा त्यांच्या अखत्यारीत होत्या ताडियाळे येथील सरस्वती मंदिर शाळा उभारणीत त्यांचा देखील महत्वाचा वाटा आहे. विद्यालयाचा उल्लेख बहाडच्या पोस्ट मध्ये केल्यामुळे पुन्हा मी करत नाही मात्र पोखरण चा सुद्धा ह्या विद्यालयाच्या उभारणीमध्ये वाटा आहे. पोखरण येथील शिक्षकांविषयी मी माझ्या भविष्यातील पोस्ट मध्ये लिहिणार असल्यामुळे येथे सर्वच शिक्षकांचा उल्लेख करत नाहीये.

येथील चंडिगावस्थित डॉ.  श्री नरेंद्र विश्वनाथ जोशी गेली अनेक वर्ष पंचक्रोशीत वैद्यकीय सेवा देत आहेत तर त्याचे सुपुत्र डॉक्टर श्री नैनेश नरेंद्र जोशी बोईसर येथे  फिजिओथेरपिस्ट आहेत. 

 ब्लॉग च्या मर्यादेमुळे सर्वांचीच नावे नमूद करता येत नसली तरी काही उल्लेखनीय नावे, श्री अनिल सखाराम जोशी - प्रांत अधिकारी त्यांच्या विषयी खास आठवण म्हणजे ते आपल्या कार्यालयात जाण्यासाठी सरकारी गाडी न वापरता सार्वजनिक वाहनातून प्रवास करीत., श्री त्र्यंबक मोरेश्वर जोशी - ग्राम विस्तार अधिकारी, श्री अरुण डी जोशी - कृषी अधिकारी, श्री वसंत जोशी उच्च तलाठी अधिकारी , येथील श्री विठ्ठल जोशी ह्यांनी मा. आमदार श्री कृष्णा घोडा ह्यांचे पी. ए. म्हणून अनेक वर्ष कार्यभार सांभाळला आहे तसेच ते राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित आहेत. श्री प्रदीप जोशी हे डहाणू नागरपालिके मध्ये उपमुख्य अधिकारी आहेत. श्री किरण जोशी हे स्वतःचे वधुवर सूचक मंडळ चालवतात व अदानी थर्मल पॉवर प्लांट येथे उच्चपदस्थ असून त्यांना त्यांच्या कार्यासाठी कंपनीने सुवर्ण पदक आणि अनेक पुरस्कार दिले आहेत. श्री अजय जोशी ह्यांचे देखील स्वतःचे वधुवर सूचक मंडळ आहे. येथील श्री शरद पंडित हे सोळशेत आदिवासी भागात आदिवासींना धान्य वाटपाचे कार्य करतात येथे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान चालवतात. तसेच कै.श्री विष्णुपंत जोशी हे मुंबई महानगर पालिकेत अधिकारी होते. मराठी माणूस शक्यतो व्यवसाय करीत नाही मात्र येथील श्री कमळाकर राणे ह्यांचा वाण सामान (किराणा) विक्रीचा व्यवसाय आहे. 

पोखरण आणि येथील श्री कृष्णजन्मोत्सव एक अतूट नाते आहे. गेली ७५ पेक्षा जास्त वर्षे येथे श्री कृष्णजन्मोत्सव साजरा केला जातो आठ दिवस आधीपासून येथे देवाचे अनुष्ठान केले जाते या वेळी येथील वातावरण खूप भक्तिमय असते, नवसाला पावणारा कृष्ण म्हणून ह्या गादीची पंचक्रोशीत ख्याती आहे. अनेक मंडळींना खूप छान अनुभव आले आहेत. श्रीमती उज्वला जोशी आणि कै. दामोदर रामचंद्र जोशी यांच्या ओटीवर हे पवित्र अनुष्ठान केले जाते.

श्री कृष्ण जन्माष्टमी, पोखरण

पोखरण ची आणखी एक ख्याती म्हणजे येथे आयोजित केले जाणारे खास पोखरण करांचे स्नेह-संमेलन किंवा gate together. शक्यतो दरवर्षी १ मे किंवा ५ मे ह्या दिवशी हे संमेलन आयोजित केले जाते देवी श्री महालक्ष्मीला अभिषेक, स्त्रियांसाठी हळदी कुंकू, जेष्ठनागरिकांचे सन्मान, विशेष कार्य करणाऱ्या मंडळींचे, गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव देखील केले जातात तसेच सामूहिक मिष्ठान्न भोजन असते. गावातल्या लेकींना आपल्या कुटुंबासमवेत येथे खास आमंत्रण असते. एकूणच खूप आनंदात आणि दिमाखात दोन दिवसांचा सोहळा पार पाडला जातो अर्थातच याचे श्रेय सर्व ब्रह्मवृंद आणि सदस्यांना जाते. आणखी महत्वाचे म्हणजे गावातील देवींचे उत्सव देखील आनंदाने मोठ्या भक्तिभावाने आणि शांततेत पार पाडले जातात.   

श्री महालक्ष्मी, पोखरण 

येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चैत्र अष्टमी आणि नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि शांततेने पार पडतात. या वेळी भक्तांची मोठी गर्दी असते विशेषतः चैत्र अष्टमीच्या हवनाला मोठी गर्दी असते.

धन्यवाद.


वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


सौजन्य :- ही पोस्ट लिहिण्यासाठी श्री किरण जोशी ह्यांनी खूप माहिती दिली असून श्री वैभव जोशी ह्यांनी देखील महत्वाची माहिती दिली आहे, श्री अभिजित तिवाड ह्यांचा देखील हातभार लागला.




Wednesday, October 14, 2020

अष्टागरातील बहाड गाव

श्री गणेशाय नमः


नमस्कार मी अजित विनोद पंडित, आता मला माझी वेगळी ओळख द्यायची आवश्यकता नाही मात्र नवीन वाचकांसाठी मी माझे नाव नमूद करतो. तुम्हाला सगळ्यांना अष्टागराविषयी माहिती देताना खूप काही गोष्टी मला सुद्धा नव्याने माहिती होत आहेत, नवीन ओळखी होत आहेत, आपल्या अष्टागरातील टॅलेंट बाहेर येतय खूप आनंद होतोय. मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचे आहे कि आपल्या अष्टागराविषयी माहिती कुठेच लिखित स्वरूपात नाही त्यामुळे मला संपूर्ण माहिती मिळू शकत नाही माहिती देणारे देखील काही प्रशिक्षित नाहीत त्यांना जसे जेवढे शक्य असेल त्याप्रमाणे मला ते मदत करत असतात. त्यांच्या किंवा माझ्या अनावधानाने काही गोष्टी नमूद करायच्या राहिल्या तर आपण सांभाळून घ्यावे. एखादी माहिती राहून गेल्यास हक्काने माझ्या व्हाट्सअप क्रमांकावर द्यावी.

बहाड :- आज आपण अष्टागरातील बहाड गावाविषयी जाणून घेणार आहोत. अष्टागरातील बहाड आणि पोखरण ही दोन्ही गावे म्हणजे जणू जुळी भावंडंच. पूर्वी या परिसराला बाडापोखरण म्हणून संबोधत, आजही काही घरांवर तशी नोंद दिसते. बोईसर डहाणू रस्त्यावर बहाड गाव वसले आहे श्री हनुमानाचे दर्शन झाले की पुढे जाताच ब्रह्मवृदांची घरे सुरु होतात. माझ्यासाठी बहाडची खास आठवण म्हणजे येथे पिकणारा लाल वाल. असा चविष्ट वाल इतरत्र मिळणे अशक्यच. आपल्या अष्टागरात वालाचे बिरडे सुप्रसिद्ध आहे हे काही वेगळे सांगायची आवश्यकता नाही. अष्टागरातील क्वचितच एखादी अन्नपूर्णा गृहिणी असेल की जिने वालाचे बिरडे केले नाही.  येथील ब्राह्मणाची लोकसंख्या अंदाजे ४७ तर परगावी असणारे १२० असावे. पाठक या कुटुंबाचे गोत्र सांख्यायन असून कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी आहे, काही मंडळी श्री भवानी मातेला देखील आपली कुलस्वामिनी मानतात. 

बहाड येथील हनुमान जयंती उत्सव खुप लोकप्रिय असून, गणेशोत्सव खास असतो, गोकुळ अष्टमी देखील अतिशय आनंदाने साजरी केली जाते. होळी हा सण देखील अतिशय हौसेने साजरा केला जातो.

हनुमान मंदिर, बहाड

श्री मारुती, बहाड 

आपल्या अष्टागरातील इतर गावांप्रमाणे बहाडही आपले वैशिष्टय जपून आहे कारण आहे इथली माणसे. सुरुवातीला मी कै. गिरीश पाठक यांच्या विषयी बोलणार आहे. त्यांनी आपल्या वाडी मध्ये ४०० नारळीच्या झाडांची लागवड केली आहे आणि त्यासाठी २००५ साली महाराष्ट्र शासनाचा कृषी पुरस्कार त्याना मिळाला होता पंचक्रोशीत इतक्या मोठ्या प्रमाणावर नारळीची लागवड करणारे ते बहुदा पहिलेच. त्यांनी बरीच लोकाभिमुख कार्ये देखील केली आहेत गावात पिण्याचे पाणी आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती संगीता गिरीश पाठक ह्या योग, प्राणायाम तसेच मेडिटेशनचे वर्ग चालवतात.

बहाड चे पालघर स्थित श्रीयुत अतुल पाठक हे पालघर नागरपालिकेमध्ये तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत यावरून त्यांच्या कार्याचा अंदाज आपल्याला आलाच असेल.  त्यांनी परिसरात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत.

काही उल्लेखनीय नावे :- येथील श्री शिरीष पाठक राष्ट्रीयकृत बँकेच्या मुख्यालयात ४० वर्षे सेवा देत आहेत, येथील ओंकार उल्हास पाठक हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात असून कामानिमित्त परदेशात वास्तव्यास आहेत. येथील श्री भूषण पाठक आणि प्रशांत पाठक हे गेली ३० वर्षे डायमेकिंगच्या व्यवसायात आहेत.  येथील श्री चारुदत्त निवास पाठक ह्यांनी शेतकी क्षेत्रात पदवी घेतली असून आधुनिक पद्धतीने शेती करतात. येथील चारकोप कांदिवली स्थित श्री सुबोध नरहरी पाठक हे व्यवसायाने वकील आहेत ते सर्व क्रिमिनल कोर्टात वकिली करतात तसेच हाय कोर्टात नेहेमीच कार्यरत असून सुप्रीम कोर्टात देखील कार्यरत आहेत. येथील पुणेस्थित श्री अरुण पाठक पुण्यात योगगुरू म्हणून प्रसिद्ध आहेत तर त्यांचे बंधू श्री कांचन पाठक हे बँकेत ब्रांच मॅनेजर होते हल्ली सेवानिवृत्त आहेत. येथील श्री हिमांशू दीपक पाठक हे एन एल पी कोचिंग आणि काउंसिलिंग करतात, मुलांच्या बुद्धिमत्तेसंदर्भात अतिशय महत्वाचे काम करतात. 

येथे गावात मुख्यतः पौरोहित्य केले जाते, काही खाजगी व सरकारी नोकरी करतात तसेच काही मंडळी पेश्याने शिक्षक आहेत, काही मंडळी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत. 

येथील लेकी सुना पुढील कामात पारंगत आहेत जसे की गरीब आणि होतकरू विध्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिकवणी घेणे, काही इंजिनीअर आहेत, काही शिक्षिका आहेत, काही उच्चशिक्षण घेत आहेत. 


सरस्वती विद्यामंदिर - बाडापोखरण 
काही जुन्या आठवणी :- येथील श्री अशोक विनायक पाठक ह्यांचा गावात विद्यालय (हायस्कुल) स्थापन करण्यात मोलाचा वाटा आहे. ही गोष्ट आहे १९६५-६६  ह्या वर्षातली, मुळचे कोकणातले डॉक्टर जोशी ह्यांनी श्री अशोक विनायक पाठक ह्यांच्यासमोर गावात ८ वी पासून पुढे शाळा नसल्याकारणाने आपण शाळा सुरु करू असा प्रस्ताव मांडला, त्यांना तो आवडला तसेच कै. हरिभाऊ पाठक यांनी कल्पना उचलून धरली ते जिल्हा परिषदेत हेडमास्तर म्हणून कार्यरत होते. सर्वानुमते बहाड येथील हनुमान मंदिरात सर्वप्रथम ८ वी चा वर्ग सुरु झाला. आणि शिक्षक म्हणून अशोकजी ह्यांनी श्री गणेशा केला सोबत श्री मोरेश्वर जोशी हे आणखी एक शिक्षक होते. अशा प्रकारे शाळा सुरु झाली पुढे शेजारील तडियाळे गावात शाळेला जागा मिळाली "सरस्वती विद्या मंदिर-बाडा पोखरण " या नावाने आजही हायस्कुल सुरु आहे. श्री अशोकजी यांनी शाळेची मुहूर्तमेढ रोवून पुढे वरळी डेरी येथील सरकारी नोकरी स्वीकारली क्लास -२ ऑफिसर म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत . ही गोष्ट संक्षिप्त आहे मी पुढे माझ्या भविष्यातील पोस्ट मध्ये तपशीलात माहिती लिहेनच .

शाळेचा विषय चालू आहे आणि कै. श्री मार्तंड नारायण पाठक ह्यांचे नाव कसे मागे असेल, गावात प्राथमिक शाळा सुरु करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे सरकार दरबारी पाठपुरावा करून त्यांनी बहाड येथे शाळा सुरु केली, त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत गावात सरकारी दवाखाना आणण्याचे महत्वाचे काम त्यांच्या हातून घडले आहे त्याची साक्ष आजही दवाखान्यातील त्यांच्या नावाची शिळा देत आहे. गावात शेतकी सोसायटी त्यांच्याच प्रयत्नातून सुरु झाली सोसायटीच्या चेअरमन पदी देखील ते विराजमान होते, इतक्यात ते थांबले नाहीत तर गावाचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच पदी ते विराजित होते ते ही तब्बल १६ वर्ष . पंचक्रोशीत त्यांना बहुमान होता. 

येथील कै. जगन्नाथ पाठक हे मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी नोकरीत होते मुंबईतला मोठा परिसर ते सांभाळीत असत. त्यांनी १२ वर्ष कुष्ठरोग्यांसाठी काम केले आहे ते ही सेवा निवृत्ती नंतर, एका जर्मन संस्थेसोबत ते बोरिवली (कुष्ठरोग्यांसाठी नॅशनल पार्क येथे कॅम्प होता) येथे काम करीत. डोंबिवली ते बोरिवली रोज लोकल प्रवास करून त्यांनी ही समाजसेवा केली होती पुढे पालघर येथे ते वास्तव्यास होते त्यावेळी पालघर ते बोरीवली असा देखील प्रवास काहीवर्ष केला. नुकतेच त्यांचे अल्पशः आजाराने निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

बहाडला कलेचा वारसा देखील लाभला आहे येथील श्री प्रवीण पाठक हे उत्तम गायक असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत गेली अनेक वर्ष ते सुमधुर गाण्यांचे कार्यक्रम करतात. माता सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेले श्रीयुत प्रवीण पाठक खूप छान गातात मी त्यांचे गाणे बरेचदा ऐकले आहे कार्यक्रमात त्यांच्या गाण्याला खूप छान दाद मिळत असते.

मेघना एरंडे
कला क्षेत्रातील पुढील नाव म्हणजे मेघना एरंडे-जोशी, बहाडच्या कन्या उषा अनंत पाठक(पूर्वाश्रमीचे नाव) ह्यांच्या त्या कन्या आहेत. आज मेघनाजींना कोण ओळखत नाही गेली ३० वर्ष त्या टेलिव्हिजन, हिंदी मराठी चित्रपट, मालिका, नाटक, जाहिरात, अँकरिंग या अनेक क्षेत्रात अभिनेत्री म्हणून प्रशिध्द आहेतच सोबत त्या खूप मोठ्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. अनेक लोकप्रिय चित्रपटातून त्यांनी कामे केली आहेत तर लहान मुलांची आवडती बरीच कार्टून्स  त्यांच्या आवाजात डब (सादर) झाली आहेत , तरुण वर्गाचे आवडते नेटफ्लिक्स वरील खूप फॉरेन लँग्वेज चे कार्यक्रम चित्रपट त्यांच्या आवाजात डब झाले आहेत. त्याचे काम खूप चॅलेंजिंग असून खूप अभ्यास करावा लागतो त्यांची खासियत म्हणजे लहान मुलांच्या आवाजाची नक्कल त्या इतक्या हुबेहूब करतात कि त्याला तोडच नाही.  काही युनिव्हर्सिटीज त्यांना विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा आमंत्रित करतात. ही त्यांची माहिती खूप संक्षिप्त स्वरूपाची आहे, मी त्यांच्या काही मुलाखती पहिल्या आहेत त्यांच्या बद्दल खूप लिहिण्या सारखे आहे एक पोस्ट मी खास त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी करेन.

त्यांनी केलेले अभिनय आणि दिलेले आवाज पुढील प्रमाणे मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, सनई चौघडे, झेंडा, टाइम पास, दिल दिमाग बत्ती, हिंदीत इंग्लिश बाबू देसी मेम , कसं 'तेरी कसं, दीदी, एक अजून, रज्जो. डबिंग :- हॉलिवूड चित्रपट:-  इंडिपेंडंस डे, ट्विस्टर थे लॉस्ट वर्ल्ड, हॅरी पॉटर, ट्विलाईट बोन, अजून खूप सारे, कार्टून्स:- नॉडी, निन्जा हातोडी, पेप्पा पिग, बॉब दी  बिल्डर आणखी खूप आहेत.


अभिनय क्षेत्रातील आणखी मोठे नाव म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर बहाडच्या कन्या लता कृष्णाजी पाठक (पूर्वाश्रमीचे नाव) ह्यांचे सुपुत्र. आपण सगळेच त्याना ओळखतो मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये मोठा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून त्यांचे नाव आहे. त्यांचा अभिनय, शरीरयष्टी आणि आवाज त्यांच्या अभिनयाला सोनेरी किनार आणतात. त्यांच्या आवाजाची विशिष्ट शैली त्यांची एक प्रकारे वेगळी ओळख आहे. आपल्या फॅन सोबत कसे वागावे आणि ट्रोलर (टीकाकार) ला कसे हाताळावे हे ह्यांच्या कडून शिकावे. चित्रपट, मालिका , नाटक, जाहिरात अशा अनेक क्षेत्रात ते वावरतात. ह्या गोजिरवाण्या घरात तसेच दामिनी या मालिकांपासून ते मराठी घराघरात प्रसिद्ध झाले, किमयागार, भूमिका, वादळवाट आणखी लिस्ट मोठी आहे तसेच चित्रपट ब्लाइंड गेम, मोरया, पिकनिक, आनंदाचे झाड, सनई चौघडे, शहाणपण देगा देवा, मुंबई मेरी जान अशाप्रकारे त्यांनी खूप काम करून ठेवले आहे त्यांनी केलेल्या अभिनयाची ही काही मोजकी उदाहरणे आहेत अष्टागरातील प्रत्येक माणसाला आज अभिमान आहे कि कला क्षेत्रातिल दोन दिग्गज इथल्या मातीशी नाते सांगतात.  त्यांच्यावर देखील मी एक स्वतंत्र पोस्ट लिहिणार आहे.

संतोष  जुवेकर आपल्या आईसोबत 

सौजन्य :- ही पोस्ट लिहिण्यासाठी मला अनेकांनी मदत केली आहे त्यातील काही नावे कु.अनिकेत अविनाश पंडित,  श्री प्रशांत अनंत पाठक, श्री प्रकाश पांडे, श्री अतुल पाठक.

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

पारंपारिक पेहेरावासाठी माझी बहीण सौ अंकिता पंडीत-तिवाड हिच्या "शुभवस्त्रं" ला ह्या लिंक वर क्लिक करून भेट द्या आवडल्यास ऑर्डर करा 






अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...