Sunday, March 28, 2021

अष्टागरातील होळी

श्री गणेशाय नमः



नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आपल्या आजच्या पोस्ट मध्ये आपण अष्टागरातील होळीबद्दल जाणून घेऊयात. अष्टागर आणि परिसरात होळी फक्त एक दिवसाची नसते, तब्बल १५ दिवस आणि धुलीवंदन अशी १६ दिवस होळी साजरी केली जाते.

फाल्गुन शुद्ध पाडव्यापासून दररोज लहान होळी पेटवली जाते अर्थात लहान मुलं ही होळी साजरी करतात. संध्याकाळी घरोघरी जाऊन मुलं लाकडं हक्काने मागून आणतात. डब्बे, छोटे वाजवण्याचे साहित्य घेऊन वाजवत, गात, मौज करत मुलं आपल्या आळीत कुडी(लाकडं) मागत फिरतात.

"कुडी द्या कुडी मारीन उडी, कुडी नाही दिली तर होळी कशी पेटेल"

अशा आशयाची गाणी गात लहान मुलं घरोघरी फिरतात. हल्ली लहान मुलांना शाळेमुळे वेळ कमी मिळतो आणि ह्या गोष्टी करता येत नाहीत, पण अजूनही काही ठिकाणी मुलं ह्या गोष्टींचा आनंद लुटतात. पूर्वी होळी असली की "आट्या-पाट्या" हा खेळ खेळला जात असे आता मात्र हे खेळ खूप कमी (किंवा नाहीच) खेळले जातात.

लाकडं, पालापाचोळा, वाळलेले गवत एका झाडाच्या फांदीभोवती रचले जाते, या फांदीस सरा म्हणतात ही फांदी अगदी सरळ असते. पूर्ण झाड न तोडता फक्त फांदी तोडली जाते त्यामुळे वृक्षतोड होत नाही, भेंडीचा(भेंड वृक्ष) सरा शक्यतो लावला जातो, काही ठिकाणी सुपारी  किंवा गावातील प्रथा पद्धती नुसार सरा असतो हे झाड फुटीर वृक्ष असल्याने पुन्हा नव्याने त्याला फांद्या येतात. . होळीला अग्नी देऊन मुलं नाचतात, आनंदाने मोठ्याने "होळी पेटली रे" म्हणून एक सुरात आवाज देतात.

होळी पौर्णिमा आणि त्याच्या आदल्या दिवशी मोठी मंडळी होळीत सहभागी होत असतात. वर्गणी गोळा करून लाकडे खरेदी केली जातात काही मंडळी आपल्या कडे उपलब्ध असलेली लाकडे होळीस आनंदाने देतात. वृक्ष तोडून कोणी होळी साजरी करीत नाहीत वाळलेली जुनी लाकडे वापरून होळी साजरी केली जाते. मोठ्ठा सरा आणून त्याभोवती लाकडे रचून रांगोळी काढली जाते. होळीस हार साखरेची माळ घातली जाते. घरातील लहान मुलांना देखील साखरेची माळ किंवा साखरेचे दागिने घातले जातात.

आद्य अगरबत्ती सुगंधी लोबान


स्त्रिया होळीसाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळी, उकडीचे मोदक करतात. होळीची पूजा, औक्षण, नारळ अर्पण करून एखादे नाणे वाहिले जाते व नैवैद्य दाखवला जातो.

रात्री १२ वाजता किंवा मुहूर्तावर होळीस अग्नी दिला जातो. या प्रसंगी स्त्रीया पुरुष लहान मुले तसेच पहिला होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या पतीसोबत माहेरी आलेल्या नवविवाहित कन्या, अशी मोठी फौज होळीवर एकत्र येते.

अल्पउपहार केला जातो, तसेच होळीत वाहिलेले नारळ बाहेर काढले जातात प्रसाद म्हणून भाजलेले खोबरे खूप चविष्ट लागते. पुरुष मंडळी होळीशेजारी बसुन जागरण करतात.

दुसऱ्या दिवशी आनंदाने धुलीवंदन साजरे केले जाते, घरोघरी जाऊन शक्यतो नैसर्गिक रंग लावून होळी साजरी केली जाते, पूर्वी फुले आणि झाडांपासून रंग तयार केले जात असत हल्ली कालानुरूप त्यात बदल झाले आहेत. तसेच पूर्वी होळीच्या विस्तवावर अंघोळीचे पाणी तापवित असत त्यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही असा समज होता. रात्री विस्तवावर चणे, वालाच्या शेंगा,उकडले जातात आणि मंडळी एकत्र येऊन त्याचा आस्वाद घेतात.




धुलीवंदनाच्या दिवशी आपल्याकडे वर्षभर काही ना काही कामासाठी येणाऱ्या गडी मंडळींना किंवा घरकाम करणाऱ्या ताईंना आनंदाने पोस्त द्यायची पद्धत आहे, पोस्त म्हणजे पौशाच्या स्वरूपात दिली जाणारी छोटीशी भेट.



अष्टागरात सर्वच ठिकाणी अशाप्रकारे होळी साजरी केली जाते काही ठिकाणी थोडा फार बदल असला तरी मूळ प्रथा सारख्याच आहेत. तुम्हा सर्वांना होळीच्या खुप शुभेच्छा.

धन्यवाद.








वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Wednesday, March 17, 2021

अष्टागरातील साखरपुडा

 श्री गणेशाय नमः



नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या शृंखलेच्या पुढच्या कडी मध्ये आपले सगळयांचे स्वागत. मागच्या भागात आपण "कुंकू लावणे" ह्या प्रथेबद्दल जाणून घेतलेत. आज आपण "वाङ्निश्चय" अर्थात साखरपुड्याबद्दल जाणून घेणार आहोत.

लग्न जमले आणि वधुस कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडला की वेध लागतात साखरपुड्याचे. बैठकीत किंवा कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात साखरपुड्याचा मुहूर्त पाहिला जातो, घरातील जाणती मंडळी पंचांग पाहून योग्य तो मुहूर्त काढतात किंवा गुरुजींना विचारून सवडीनुसार साखरपुडा ठरतो.

वधु आणि वरपक्ष दोन्ही कडे आनंदाचे आणि लगबगीचे वातावरण असते. शक्यतो साखरपुडा वधु पक्षाकडे असतो किंवा दोन्ही पक्ष सोयीनुसार ठिकाण ठरवतात. वधूपक्षाकडून किंवा ज्या पक्षाकडे कार्य असते त्या पक्षाकडून साखरपुड्याचे स्थळ, गुरुजी, भोजन व्यवस्था, मंडप व्यवस्था याची तजवीज केली जाते.

सगळ्यात आवडीचे म्हणजे दोन्हीही पक्षात खरेदी सुरू होते, वराचा पोशाख आणि अंगठी वधु पक्ष आणि वधूची साडी आणि अंगठी वरपक्ष खरेदी करतात. अर्थात वधू वराच्या आवडीनुसार खरेदी केली जाते. दोन्ही पक्ष एकमेकांशी संवाद साधून या सर्व गोष्टी करीत असतात, ह्यामध्ये दोन्ही पक्षातून प्रत्येकी एक व्यक्ती पुढाकार घेऊन संवाद साधतात किंवा लग्न जुळवून देणारी मध्यस्त व्यक्ती हे कार्य आनंदाने पार पाडत असते.

पाहुण्यांचे यथायोग्य स्वागत झाले की आपले आराध्य दैवत श्री गणेशाचे पूजन केले जाते वधु आणि वराचे आईवडील किंवा जवळचे नातेवाईक दांपत्य यजमानपद भूषवतात, गुरुजींच्या/ भटजींच्या उपस्थितीत सर्व कार्य केले जाते.







वरपक्षाकडून (वधूस पाटावर किंवा चौरंगावर बसवून) वधुची ओटी भरून साडीचोळी आणि सौंदर्य प्रसाधने दिली जातात तसेच पुष्पमाला घातली जाते. तसेच यथाशक्ती एखादा दागिना वधुस भेट दिला जातो. वरास देखील वधूपक्षाकडून पोशाख आणि यथायोग्य आहेर देवून सन्मान केला जातो तसेच पुष्पमाला घातली जाते. वधूचे तसेच वराचे पाच सुवासिनी औक्षण करतात. वधूची साखरपुड्यातील ओटी खास लग्नापर्यंत जपून ठेवली जाते.  

हिरव्या रंगाच्या साडीत वधु 


वधु वर दोघेही समोरच्या पक्षाकडून मिळालेला पेहेराव करतात, वधूची साडी शक्यतो हिरवी असते किंवा कुठल्याही शुभरंगाची असते. वधुवर एकमेकांना अंगठी घालून वाङ्निश्चय पार पाडतात तसेच एकमेकांना साखरपुडा दिला जातो.

वधु-वराच्या नातेवाईकांचा तसेच  करवलीचा दोन्ही पक्षांकडून मानपान केला जातो. सुवासिनीच्या ओट्या भरून त्यांचा सन्मान केला जातो. गजरा किंवा फुले दिली जातात. व्याही भेट होते तसेच इतर नातेवाईक उदा. वधू चे काका व वराचे काका एकमेकांस आलिंगन देऊन श्रीफळ देतात त्याच प्रमाणे स्त्रीवर्गात देखील एकमेकींना भेटण्याचा कार्यक्रम होतो. 

दोन्ही पक्षांकडून आणलेले पेढे एकत्र करुन पाहुण्यांना दिले जातात, तसेच आप्तस्वकीय व शेजाऱ्यांना वाटले जातात. आनंदाने स्नेहभोजन केले जाते वधुवरास उखाण्यात एकमेकांचे नाव घेण्याचा आग्रह नाही झाला तर नवलच.

लग्नाचा मुहूर्त, ठिकाण, वेळ याच वेळी निश्चित करण्यात येते. अशाप्रकारे आनंदात साखरपुडा संपन्न होतो.

पुढील भागात आपण "गहू टिपणे/ निवडणे" ह्या प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत.

धन्यवाद.

फोटो सौजन्य :- श्री अभिजित तिवाड व सौ अंकिता तिवाड.






वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Wednesday, March 3, 2021

कुंकू लावण्याची प्रथा(अष्टागरातील लग्नसमारंभ)

श्री गणेशाय नमः




 नमस्कार,

माझे नाव श्री अजित विनोद पंडीत तुम्ही जाणताच की मी अष्टागराबद्दल माहिती लिहितो. मी यापुढे अष्टागरातील लग्नसमारंभ ह्याबद्दल माहिती शृंखला सुरू करत आहे थोडक्यात येथे कशाप्रकारे विवाह सोहळे पार पाडले जातात त्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत.

आपल्या भारत देशात किंवा आर्यावर्तात विवाह हा एक संस्कार मनला जातो. लग्न वधु वरांचे जरी असले तरी दोन कुटुंब यामुळे कायमची जोडली जातात.

अष्टागरात विवाह काही एकादिवसात पार पडत नाहीत तर या संस्काराच्या निमित्ताने अनेक सुंदर क्षण, प्रथा, रीतीभाती आणि वेगवेगळ्या प्रसंगांना गायली जाणारी पारंपरिक गाणी यांना आपण उजाळा देणार आहोत. आज सुरुवातीला आपण वधुस कुंकू लावण्याची प्रथा जाणून घेणार आहोत.

जेव्हा वधु आणि वर एकमेकांना पसंत करतात आणि दोन्हीही कुटुंब पुढे जायचा निर्णय घेतात तेव्हा बैठकीचा कार्यक्रम होतो. हि प्रथा सगळीकडे आहे, बैठक यशस्वी झाली की वाङ्निश्चय अर्थात साखरपुडा ठरवला जातो. बैठक आणि साखरपुडा या दोन कार्यक्रमामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम करण्याची प्रथा येथे आहे त्यास कुंकू लावणे असे म्हणतात.

प्रथेनुसार वधूला तिच्या होणाऱ्या सासरकडची मंडळी अर्थात स्त्रीवर्गातील वराची जवळची स्त्री म्हणजे आई, बहीण, आत्या किंवा वहिनी वधुस हळद कुंकू लावून खणा नारळाने ओटी भरते. वधुस साडीचोळी, सौंदर्य प्रसाधने या वेळी देण्याची पध्दत आहे. या वेळी पाटावर किंवा चौरंगावर होणाऱ्या वधुस बसवले जाते.



होणाऱ्या वरास देखील यावेळी साजेसा आहेर देऊन योग्यतो मानपान केला जातो. ठरलेल्या लग्नास एक मूर्तस्वरूप प्राप्त व्हावे या उद्धेशाने हा छोटेखानी कार्यक्रम केला जातो.  शक्यतो बैठकीच्या दिवशीच हा कार्यक्रम उरकून घेतला जातो किंवा दोन्ही पक्षांच्या सवडीनुसार कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडतो.

या वेळेस अल्पउपहार किंवा छोटेखानी स्नेहभोजन केले जाते, या प्रसंगी भटजी अथवा गुरुजींची आवश्यकता नसते. शक्यतो मुलीच्या घरीच दोन्ही कुटुंबे मिळून हा कार्यक्रम करतात.

आज आपण होणाऱ्या वधुस कुंकू लावणे ह्या प्रथेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलीत पुढे अशा अनेक रिति-भातींबद्दल माहिती घेऊ.

धन्यवाद.

वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...