श्री गणेशाय नमः
माझा हा ब्लॉग पालघर व डहाणू तालुक्यातील ब्राह्मण समाजात अष्टागर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ८ गावांबद्दल माहिती देण्यासाठी आहे .अनेक पिढयांपासुन हा समाज या अष्टागरात वास्तव्यास आहे. अष्टागर म्हणजे आठ गावांचा समूह , अष्ट म्हणजे आठ आणि आगर म्हणजे गाव.
Saturday, September 11, 2021
गणपती आरती दीनदयाळा
नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आपल्या अष्टागर लेखमालेत तुमचं सगळ्यांच पुनःश्च स्वागत आहे आपण अष्टागरातील आरत्यांबद्दल माहिती करून घेत आहोत मागच्या लेखात आपण "स्थापीत प्रथमा" या गणेश आरतीला उजाळा दिला होता. आज आपण गणपती बाप्पाच्या "दिनदायाळा गणपती स्वामी" या आरतीवर प्रकाश टाकणार आहोत.
आपल्या "स्थापित प्रथमा" या आरतीची किंवा आपण नेहेमी ज्या संत रामदासांच्या आरत्या म्हणतो त्यांच्या चाली खूप सोप्या आहेत मात्र आजच्या आरतीची चाल थोडी कठीण आहे. मात्र आरती श्रवणीय आहे. ही आरती म्हणायला नेहेमी पेक्षा जास्त व्यक्ती असल्या की आरती म्हणायला मजा येते आणि सोपेही जाते.
दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी। तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥धृ.॥
कवण अपराध म्हणवुनि देवा केला रुसवा। अहर्निशी मी हृदयी तुझा करितसे धांवा ॥ दीन.॥१॥
चिंताकूपी पडलों कोण काढील बाहेरी। धांवें पावें सखया करुणा करुनि उद्धरी॥ दीन.॥२॥
ऐसे होते चित्ती तरि का प्रथमचि देवा। अंगीकार करुनि केला कृपेचा ठेवा॥ दीन.॥३॥
आतां करणें त्याग तरिही स्वामी अघटित। शरण आलों माझा आता चुकवी अनर्थ॥दीन.॥४॥
यादवसुत हा विनवी दोन्ही जोडूनियां कर॥ तव चरणाचा सखया मजला आहे आधार॥दीन.॥५॥
ह्या आरतीच्या माध्यमातून कवी यादवसुतांनी श्री गणेशाला आर्त विनवणी केली आहे, हे दिनांच्या दयाळा मला येऊन भेट, हे सखया तुझे दोन्ही चरण मला खूप प्रिय आहेत. माझ्या हातून असा कुठला अपराध घडला की तू मजवर रुसला आहेस. मी मनापासून हृदयातून तुझा धावा करतोय. मी मोठ्या चिंतेत आहे त्यातून मला बाहेर काढ गणराया. माझ्यावर दया कर आणि माझा उद्धार कर. मी तुला शरण आलो आहे या संकटामधून मला बाहेर काढ आणि माझ्यावर ओढावलेला हा अनर्थ टळू दे. देवा तुझ्या चरणांचा मला खूप मोठा आधार आहे, माझे दोन्ही हात जोडून मी तुला विनवणी करतो आहे त्याचा विचार कर.
किती सुंदर आरती आहे, नाही का? आजच्या कोरोना संकट काळात ही आरती अगदी तंतोतंत जुळते आहे, आपण श्री गणपतीला प्रार्थना करू की लवकर ह्या संकटामधून तू सर्वाना बाहेर काढ.
आरती स्थापित प्रथमा
Tuesday, September 7, 2021
आरत्या अष्टागरातल्या(स्थापित प्रथमा)
श्री गणेशाय नमः
नमस्कार,
मी अजित विनोद पंडीत तुमचे आपल्या लेखमालेत पुन्हा एकदा स्वागत आहे, श्रावण महिना सुरु झाला की आपल्याकडे सणवार आणि धार्मिक कार्यांची पर्वणीच सुरू होते. श्रावणापाठोपाठ भाद्रपद, गौरी गणपती घेऊन येतो. घरी बाप्पा विराजमान झाले की गणपतीची आराधना, स्तुती करण्यासाठी आपण त्याची मनोभावे आरती करतो. टाळ्या आणि टाळ छान लयीत वाजवून आर्त स्वरात आरती गायली जाते. ८० वर्षांच्या आज्जी आजोबांपासून ते अगदी एक वर्षाच्या चिमुकल्या पर्यंत सगळ्यांच्या आवडीच्या ह्या आरत्या परिसरात पावित्र्य आणतात. आजचा आपला विषयच आहे अष्टागरातील आरत्या.
आपल्या आर्यावर्तात सर्व देवांच्या खूप वेगवेगळ्या आणि अनेक भाषांमध्ये आरत्या आहेत अष्टागरात देखील अनेक आरत्या गायल्या जातात, सर्वश्रुत आरत्या म्हणजे सुखकर्ता, शेंदूर लाल चढायो, शंकराची, देवीची, विठ्ठलाची ह्या आरत्या तर सगळेच गातात मात्र आणखी काही पारंपारीक आरत्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
आज आपण "स्थापित प्रथमा" या आरती बद्दल बोलणार आहोत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे सुंदर वर्णन करणारी ही आरती आहे. ही आरती गाताना मंत्रमुग्ध व्हायला होतं. ह्या आरती मध्ये माणिकदासांनी बाप्पाचे यथार्थ वर्णन केले आहे.
ही आरती म्हणताना समोर बाप्पाची देखणी मूर्ती उभी नाही राहीली तर नवलच. आणि आपण देवासमोर जेव्हा हि आरती गातो तेव्हा प्रत्येक पद गात असताना, प्रत्येक पदागणिक देवाच्या संपूर्ण रुपाकडे एक एक करून आपलं लक्ष वेधलं जातं.
स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती।
विघ्ने वारुनी करिसी दीनेच्छा पुरती।
ब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुती करिती।
सुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकीर्ती॥१॥
जय देव जय देव जय श्री गणराजा।
आरती ओवाळू तुजला महाराजा॥धृ.॥
एकदंत स्वामी हे वक्रतुंडा।
सर्वाआधी तुझा फ़डकतसे झेंडा।
लप लप लप लप लप लप हालविसी गज शुंडा।
गप गप मोदक भक्षिसी घेऊनि करि उंडा॥जय.॥२॥
शेंदूर अंगी चर्चित शोभत वेदभुजा।
कर्णी कुंडल झळ्के दिनमनी उदय तुझा।
परशांकुश करि तळपे मूषक वाहन दुजा।
नाभिकमलावरती खेळत फ़णिराजा॥३॥
भाळी केशरिगंधावर कस्तुरी टीळा।
हीरेजडित कंठी मुक्ताफ़ळ माळा॥
माणिकदास शरण तुज पार्वतिबाळा।
प्रेमे आरती ओवाळिन वेळोवेळा॥जय.॥४॥
ही आरती खूप साधी आणि सरळ आहे, आरतीचा अर्थ पहा किती छान आहे, प्रत्येक कार्यारंभी गणपती बाप्पाची स्थापना किंवा आवाहन केले जाते. सगळ्यांचे विघ्नहरण करणाऱ्या आणि दिनांची इच्छापुर्ती करणाऱ्या बाप्पाची स्वयं ब्रह्मा, विष्णू आणि महेश स्तुती करतात तसेच सुरवर मुनिवर बाप्पाची स्तुती गातात.
दुसऱ्या पदामध्ये म्हटलंय एकदंत, वक्रतुंड स्वामी गणेशाला प्रत्येक कार्यात अग्रमान आहे, तसेच बाप्पा आपला आवडता मोदक सोंडेच्या मदतीने कसा खातो ह्याचे सुंदर वर्णन केले आहे.
तिसऱ्या पदामध्ये बाप्पाचे शेंदूर चर्चित अंग, भुजा, हातातील पाश अंकुश, कानातील कुंडल, तसेच त्याच्या पोटाला लपेटून बसलेला फणिराज अर्थात नागदेवतेचे वर्णन आहे.
चवथे पद बाप्पाच्या कपाळावरील केशरी गंध, आणि गळ्यातील हिरेजडित कंठीचे वर्णन करत आहे ह्या शेवटच्या पदात कवी माणिकदासांनी स्वतःचा उल्लेख केला असून हे पार्वतीच्या बाळा मी तुला शरण आलोय आणि प्रेमाने वेळोवेळी तुझी आरती ओवाळत राहीन असे म्हटले आहे.
जर आपल्याकडे ही आरती म्हणत नसतील तर ह्यावर्षी नक्की प्रयत्न करा.
Saturday, September 4, 2021
अष्टागरातील पिठोरी अमावास्येचे व्रत
श्री गणेशाय नमः
![]() |
बाजारात मिळणारी श्री पिठोरी देवीची प्रतिमा |
नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आज आपण पिठोरी अमावास्येबद्दल जाणून घेणार आहोत. श्रावण अमावस्येला हे व्रत स्त्रिया किंवा माता आपल्या मुलांकरिता करतात. आपल्या बाळाला दीर्घायुष्य मिळावे त्यावरील सर्व संकटं दूर व्हावी म्हणून माता श्री पिठोरीचे हे व्रत करत असतात म्हणून यास मातृदिन असेही म्हणतात. संतती प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत करण्याची प्रथा आहे.
अष्टागरात पाहुयात कशाप्रकारे हे व्रत केले जाते. भिंतीवर श्री पिठोरी देवीची प्रतिमा साकारली जाते ह्या प्रतिमेमध्ये काय असतं हे पाहुयात. ह्यावर ठळकपणे ६४ योगिनी असतात. आई आपल्या पाळण्यात झोपलेल्या बाळाला जोजवत आहे असे चित्र असते. सूर्य, चंद्र, देवीसाठी पाच फळे, सौभाग्याचे प्रतीक कुंकवाचा करंडा, फणी, बांगड्या, पायातील जोडवे, आरसा. हल्ली देवीचा कागद बाजारात उपलब्ध आहे ह्या कागदात योगिनींसोबत आणखी प्रतिमा असतात जसे की गौरी, गणपती, श्रीकृष्ण, शंकरपार्वती, गाय वासरू, घरकाम करताना स्त्रिया, वाजंत्री, आईकडून प्रसाद घेणारी मुले, हत्ती. असे एकंदरीत स्वरूप असतं.
![]() |
घरी साकारण्यात येणारी पिठोरी |
पूजेसाठी हार फुलांसोबत, तेरडे, आघाडे, लेकुरवाळीची वेल आवर्जून आणली जाते. प्रसाद म्हणून खीर केली जाते.
ह्या दिवशी उपास केला जातो, संध्याकाळी षोडशोपचारे देवीचे पूजन केले जाते, हळदी कुंकवासोबत ६४ योगिनींना तसेच आई आणि बाळाच्या प्रतिमेस काजळ लावले जाते. तेरडे आघाडे देवीस अर्पण केले जातात. लेकुरवाळीची वेल हाराप्रमाणे देवीस अर्पण केली जाते. ह्या वेलीस खूप छोटी छोटी फळे लगडलेली असतात अगदी आईस बाळ बिलगुन बसावे अशा प्रकारे ती दिसतात. त्यामुळे मातृत्वाचे प्रतीक म्हणून ही वेल विशेषतः पूजेत समाविष्ट केलेली आढळते.
![]() |
लेकुरवाळी |
देवीला खिरीचा प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. हा प्रसाद म्हणजे खीर एका ताटात वट्यांमध्ये देवी समोर ठेवला जातो, त्यानंतर आई एक वाटी हातात घेऊन "अतिथी कोण" असे म्हणते तिच्या पाठी असणारे तिचे अपत्य आपले नाव सांगून पाठूनच ती वाटी हातात घेते आणि प्रसाद ग्रहण करते. शक्यतो रव्याची खीर करण्याचा प्रघात आहे. काही ठिकाणी ह्या दिवशी देवीसाठी उकडीचे मोदक केले जातात. एक किंवा अनेक स्त्रिया एकत्र येऊन आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करतात.
थोडक्यात कथा:- पिठोरीचे हे व्रत नागकन्या आणि देवकन्या ह्यांनी एका स्त्रीला सांगितले होते प्रसूती होताच तिचं बाळ दगावत असे, दरवर्षी तिच्या आजेसासऱ्यांच्या श्राद्धाच्या दिवशी हे घडत असे त्यामुळे श्राद्धात अडथळा येई, म्हणून तिला तिच्या सासऱ्यांनी तिच्या मृत बाळासकट घरातून हाकलून दिले होते त्या वेळी म्हणजे श्रावण अमावस्येच्या रात्री एका झाडावर बसून त्या स्त्रीने हे नागकन्या देवकन्यांचे व्रत पाहिले, नागकन्या अतिथी कोण म्हणताच ती स्त्री पुढे आली आणि आपली करूण कहाणी त्यांना सांगितली. नागकन्या आणि देवकन्या ह्यांनी तिचे मृत बाळ आणि आधीच्या मृत बाळांना पुनरुज्जीवित केले, आणि यापुढे तू आपल्या बाळांच्या रक्षणासाठी हे व्रत कर असे तीस सांगितले, पुढे आपल्या सर्व मुलासोबत ती स्त्री तिच्या घरी गेली आणि सुखाने नांदू लागली.
धन्यवाद.
नागपंचमी बद्दल वाचा
रूखवत वाचा
Subscribe to:
Posts (Atom)
अष्टागरातील गुढीपाडवा
श्री गणेशाय नम: नमस्कार, मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...

-
श्री गणेशाय नम: नमस्कार, मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...
-
श्री गणेशाय नमः नमस्कार मंडळी मी अजित विनोद पंडीत आपल्या आजच्या विशेष पोस्ट मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे सध्या नवरात्र सुरु आहे आणि को...
-
श्री गणेशाय नमः नमस्कार, मी अजित विनोद पंडीत अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखमालेत आपलं सगळ्यांच मनःपूर्वक स्वागत. आपण आत्तापर्यंत वधुस कुंकू...