श्री गणेशाय नमः
आपला समाज हा मनुष्यप्रिय असून नातेसंबंध जपणारा आहे. आपल्या प्रत्येक कार्यात आपले नातेवाईक किंवा आप्त आपल्या सोबत रहावे या उद्देशाने काही प्रथा आहेत त्या आपण पाहुयात ह्यामुळे आपली नाती अधिक दृढ होतात.
लग्नात वर/वधूच्या मामास खूप महत्व आहे, सर्वप्रथम वर/वधुस मामा हाती कांकण बांधतो. वधुसाठी लागणारे वधूवस्त्र अर्थात पिवळ्या रंगाची साडी, आपल्याकडे अष्टागरात त्यास पारणेट म्हणतात हे नेसून वधु लग्नासाठी तयार होते ते मामाकडून असतं आणि चोळी(ब्लाऊज) वधुच्या मावशीने आणावी अशी पद्धत आहे. तसेच मामा वधुला बोहल्यावर उभी राहण्यासाठी घेऊन येतो. पुढील गाण्यांच्या ओळी बघा काय म्हणतायत.
"मामाचं पातळ मावशीची कांचोळी,
वधु (चे नाव) न ग बाई माझी गौरी हाराची पुतळी"
लग्नात करवलीस बहुमान आहे हे काही मी वेगळे सांगायची आवश्यकता नाही. वधु/वरासोबत करवली प्रत्येक रितिभाती मध्ये अग्रस्थानी असते. वर/ वधूची बहीण करवली म्हणून लग्न मुंजीत आवर्जून लागतेच.
"मंडपाच्या दारी, करवल्या दहा वीस,
आणि करवली(चे नाव) बाई माझे मानाचे खाली बस"
"रुसली ग करवली, नाही येणार मांडवा,
करवली(चे नाव) न ग बाई माझी पायी धरिसी पांडवा".
जशी लग्नात करवली लागते तसेच "कानपिळी" या रितीसाठी वधूचा भाऊ उपस्थित असतो, माझ्या बहिणीचा योग्य सांभाळ करा असे सांगत प्रेमाने आणि गमतीने वराचा कान तो धरतो आणि नवरा मुलगा (वर) त्यास वचन देऊन योग्य तो आहेर या प्रसंगी देतो.
![]() |
"कानपिळी"ची प्रथा |
लग्नात जसा वर/वधूच्या बहिणीस बहूमान असतो तसाच जावयास देखील मान असतो अष्टागरात लहान बहिणीच्या लग्नात मोठ्या बहिणीच्या पतीस, सासरे बुवा आहेर करतात यथाशक्ती एखादी सोन्याची किंवा मौल्यवान वस्तू भेट म्हणून देतात तसेच आपल्या कन्येस व नातवंडासही योग्य तो आहेर देतात.
"बुंदीचे ग लाडू, जावयाच्या फराळाला,
एवढा ग अग्रमान, लेकीकारण जावयाला"
अशाप्रकारे आपल्या रिती भाती आपली माणसे जोडून ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणखी कुठल्या प्रथा आहेत ते पुढे पाहुयात.
अष्टागरात लग्न किंवा मुंज लागतेवेळी वधु आणि वराची आई(वरमाय) तेथे उपस्थित न राहता तुळशी समोर किंवा देवाजवळ हात जोडुन उभी असते.
लग्नमंडपास प्रवेशद्वार असतं त्यास दोन केळी बांधल्या जातात त्यास केळीचे खांब म्हणतात. ही केळीची झाडे केळीच्या घडाने लगडलेली असतात. ह्या केळी बांधताना सुवासिनी त्यांचे व या केळी आणणाऱ्या मंडळींचे औक्षण करतात.
लग्नाच्या काही दिवस आधी कासाराला (बांगडया वाली स्त्री) आमंत्रित करून घरातील स्त्रिया आणि शेजारील तसेच आळीतील स्त्रियांना बांगड्या भरल्या जातात. वधुकडे वधुस हिरवा चुडा भरला जातो यात २१ बांगड्या असतात. बांगड्यावालीस पैसे आणि शिधा नारळ देण्याची प्रथा आहे. जेवणाची वेळ असल्यास भोजन करवूनच त्या बांगड्यावाल्या स्त्रिला निरोप दिला जातो.
वधुस मेंदी लावण्याचा कार्यक्रम सुद्धा छोटेखानी पद्धतीनं केला जातो, वरास देखील थोडीशी मेंदी लावली जाते.
हिरवा चुडा आणि मेंदी |
अशा अनेक प्रथा परंपरांचे पालन करत आपल्याकडे लग्नसोहळा पार पाडला जातो, पुढील भागात आपण लग्नविधी बद्दल माहिती घेवूयात.
धन्यवाद.
गाण्यांसाठी विशेष आभार:- माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत (पूर्वाश्रमीचे नाव)
तुमचे सर्व ब्लॉग छान असतात.😊
ReplyDeleteस्वाती काजरेकर.
धन्यवाद स्वाती आपण आवर्जून प्रतिक्रिया देता...
Deleteछान लिहिले आहेस अजीत दादा.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप सुंदर लिहिले आहे
ReplyDeleteधन्यवाद पूनम
Deleteसुंदर लिहिले आहे
ReplyDeletePandit sir,nice discription I remembered my grandma as she used to sing, " manachi g khali bais" in Ovi, while grinding grain on stone chakki.
ReplyDeleteThanks a lot Madam...Yes our grand parents had "khajina" of nice old songs.
Delete