Wednesday, October 7, 2020

अष्टागरातील सरावली गाव

 श्री गणेशाय नम:


नमस्कार, मी अजित विनोद पंडित आपण एव्हाना मला ओळखू लागला आहातच आणि माझ्या पोस्टची आतुरतेने वाट पाहता, आपल्याला कुतूहल असते कि येत्या आठवड्यात नवीन काय वाचायला मिळेल, हे कुतूहल ही उत्सुकता  खूप आनंददायी आहे. आपल्या ब्लॉगची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे आणि आपण सगळेच त्याचे वाटेकरी आहात.

आपल्याकडून खूप छान आणि वेगवेगळया कमेंट येत आहेत काही कौतुकाच्या, काही माहिती देणाऱ्या तर काही नवीन सुचवणाऱ्या, सगळयांचे मी आभार मानतो. या ब्लॉगच्या माध्यमातून मी अष्टागर उलगडण्याचा प्रयत्न करतोय, काही गोष्टी मनाशी ठरवून एक स्वरूप  तयार केले आहे त्यानुसार मी पोस्ट लिहीत असतो, या कारणाने सगळे विषय येथे नमूद करता येत नाही  ब्लॉग च्या मर्यादेनुसार मला पोस्टची लांबी ठेवावी लागते. हल्ली वेळेला खूप महत्व आहे त्यामुळे पोस्ट जास्त लांबवत नाही जेणेकरून सगळेच ती वाचू शकतील. तरी देखील कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय.

अष्टागराची एक खासियत सांगतो, येथील प्रत्येकाचे आठही गावांशी ऋणानुबंध आहेत प्रत्येकाच्या गोड आठवणी या गावांमध्ये आहेत. अष्टागर हे एक घर आहे त्यामुळे "अष्टाघर" असाही आपण उच्चार करू शकता. मजेशीर गोष्ट म्हणजे विवाह प्रसंगात जर दोन्ही पक्ष अष्टागरातले असले तर दोन्ही पक्षांचे ९०% पाहुणे सामायिक (कॉमन) असतात आहे कि नाही गम्मत. आपण आत्तापर्यन्त अष्टागरातील तीन गावे पाहिलीत बरीच माहिती आपण पोस्ट केली आहे आज आपण सरावली या गावाविषयी जाणून घेणार आहोत.   

सरावली :- बोईसर च्या खांद्याला खांदा लावून बोईसर पालघर रस्त्यावर वसलेले हे गाव,  येथे आता मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे मला वाटते कि अष्टागरातील सगळ्यात जास्त शहरीकरण झालेले हे एकमेव गाव आहे. सरावलीत आता जुन्या घरांच्या जागेवर नवीन बंगले आणि इमारती पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी आजही जुन्यापद्धतीची टुमदार घरे आपण पाहू शकता. ब्राह्मण आळीमध्ये प्रशस्त सिमेंटचे रस्ते आहेत. त्यामुळे सहज सोप्या पद्धतीने दळण वळण करता येते.

सरावली गावात नाईक, जोशी, रोडे, कुलकर्णी तसेच रत्नाकर ही कुटुंबे वस्त्याव्यास आहेत. त्यांची येथील आणि बाहेर वस्त्यव्यास असणारी अंदाजे ७५ लोकसंख्या असावी. विस्तृत माहिती पुढील प्रमाणे,

नाईक कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी असून गोत्र कात्यायन आहे.

जोशींची कुलस्वामिनी श्री पिंपळादेवी, सातारा असून वसिष्ठ हे त्यांचे गोत्र आहे.

गावात रोडे मंडळी सुद्धा वास्त्यव्यास आहेत त्यांची कुलस्वामिनी श्री पाटणादेवी, चाळीसगाव असून भारद्वाज गोत्र आहे.

रत्नाकर कुटुंब गेली अनेक वर्ष येथे असून त्यांची कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी असून भारद्वाज गोत्र आहे. 

येथे अनेक वर्षापासून कुलकर्णी कुटुंब स्थायिक असून त्यांचे गोत्र वसिष्ठ आहे आणि कुलस्वमिनी श्री रेणुका माता आहे.

गावात मुख्यत: पौरोहित्य केले जाते इथल्या ब्राह्मणेतर समाजातील बऱ्याच गावात येथील ब्रह्मवृंद पौरोहित्य करतात. जोशिंचे यजमान सरावली, महागाव, कुकडे, नागझरी, किराट, बोरशेती पर्यंत असून नाईकांचे उमरोळी, पंचाळी ,आगवण आणि परिसरात आहेत. येथील पुरोहित वसई विरार तसेच मुंबईत देखील पौरोहित्य करतात.  येथील ब्रह्मवृंदांवर ब्राह्मणेतर समाजाचा मोठा विश्वास असून इतर अष्टागारातील गावांप्रमाणे यांनाही समाजात बहुमान आहे.

वैद्यकीय क्षेत्रात येथील दोघांचा समावेश आहे, येथील जोशी कुटुंबातील डॉ. श्वेता मुकेश जोशी ह्या MS in Obstetrics and Gynaecology अर्थात स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. तर डॉ अमित दिलीप जोशी हे DM Super Specialist in Gastroenterology आहेत.

मुळचे सातारा येथील पण आता येथे स्थायिक असणारे स्वप्निल सतीश शहाणे बैंकेत ब्रांच मॅनेजर आहेत या कुटुंबाचे गोत्र शांडिल्य असून श्री महालक्ष्मी कुलस्वामिनी आहे.

सरावली मध्ये एक गोगटे कुटुंब असून आलेवाडी चे नाईक कुटुंबाचे ते जावई आहेत आलेवाडी च्या कन्या संध्या गजानन नाईक (पूर्वश्रमीचे नाव) ह्याचे हे सासर असून त्या स्वतः  शासनाच्या अंगणवाडी विभागात उच्चपदस्थ होत्या आता सेवा निवृत्त आहेत.

सरावली येथील बरीच मंडळी शिक्षक आहेत काही सेवा निवृत्त झाले आहेत आजही त्यांना पंचक्रोशीत बहुमान आहे.   येथील काही स्त्रिया अंगणवाडी शिक्षिका तसेच पोस्टाची कामे करतात. तर मुळच्या पोखरणच्या कन्या सौ स्वाती श्रीकांत जोशी स्वतः वधुवर सूचक मंडळ चालवतात. येथील मिथुन सुरेश जोशी नोकरी निमित्त कॅनडा  येथे वास्त्यव्यास आहेत.

येथील मंडळी सरपंच, पोलीस, पोलीस पाटील म्हणून पदे भूषवित आहेत. काही मंडळी खाजगी नोकरी करत असून काही सरकारी नोकरीत आहेत, प्राध्यापक आहेत, काहींचे व्यवसाय आहेत. येथील श्री सुरेश जोशी बँकेत उच्चपदस्थ होते. खैरापाडा स्थित श्री अविनाश जोशी हे NPCIL म्हणजेच अणुऊर्जा केंद्र काकरापारा गुजरात येथे Manager-Hopitality  या पदावर कार्यरत होते आता सेवा निवृत्त आहेत.

येथील जुनी आठवण सांगायची तर येथील कै. गजानन सदाशिव नाईक हे नाट्यकर्मी होते, ते अभिनय, दिग्दर्शन करीत असत आणि अभिनय कला शिकवीत असत त्यासोबत ते पौरोहित्य देखील करीत.

येथील रोडे कुटुंबाची कुलस्वामिनी श्री पाटणा देवी (चाळीसगाव) असून हे एक शक्तीपीठ आहे सतीच्या उजव्या हाताचा भाग येथे येऊन पडला होता म्हणून वरदहस्त शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. हे एक जागृत पीठ आहे. १२ व्या शतकात उभारले गेलेलं हे हेमाडपंथी मंदिर एक पर्यटन स्थळ आहे. निसर्गाच्या सानिध्यात हे विसावलेले सुंदर मंदिर नवरात्रीला खूप बहरलेलं असते येथे वर्षभर भक्तांचा राबता असतो. देवीचे रूप सप्तशृंगी देवी प्रमाणे आहे.

श्री पाटणादेवी मंदिर, चाळीसगाव 

 


श्री पिंपळा देवी :- 
 येथील जोशी कुटुंबाची ही कुलस्वामिनी आहे. साताऱ्या पासून अंदाजे 50  किलोमीटर वर औंध येथे देवीचे स्थान आहे.  श्री यमाई आणि तसेच श्री काळूबाई या नावाने देखील देवीला ओळखले जाते.  औंध येथे गडावर किल्ल्यामध्ये देवीचे मंदीर आहे.  देवीची मूर्ती काळ्या पाषाणात असून देेेेवी दोन मीटर ऊंच आहे, मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या हातात गदा, त्रिशूळ, धनुष्यबाण आणि पानपात्र आहे. मकर संक्रांतिला देविचा मोठा उत्सव असतो.
कोल्हापुरची अंबाबाई आणि श्री राम देविला "ये माई" अशा प्रकारे बोलवित असत त्यावरून देवीस यमाई हे नाव प्राप्त झाले आहे अशी आख्यायिका आहे.


 सौजन्य :- मला सरावली पोस्ट लिहिण्यासाठी श्री विनोद नाईक, सौ वनिता विनोद नाईक, श्री विकास विनोद नाईक तसेच  श्री रुपेश शशिकांत जोशी ह्यांनी बहुमूल्य मदत केली आहे.

वाचा आलेवाडी बद्दल माहिती,

वाचा नांदगांव बद्दल माहीती,

वाचा टेंभी बद्दल माहीती,

वाचा अष्टागर प्रस्तावना. 


Wednesday, September 30, 2020

अष्टागरातील टेंभी गाव

श्री गणेशाय नमः 

 नमस्कार, मी अजित विनोद पंडीत (आलेवाडी) आपल्याला सगळ्यांना अवगत आहेच की आपण या ब्लॉगच्या माध्यमातून अष्टागर ब्राह्मण समाजाविषयी जाणून घेत आहोत. तुमच्या अभिप्रायांवरून मला कळतंय की माझ्याकडून आपल्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे माहिती विश्वासार्ह आणि खरी असावी हा माझा प्रयत्न असतो. अनावधानाने कुठली माहिती राहिली असेल तर मला माझ्या व्हाट्सअप वर पोस्ट करा माझा नंबर मी आलेवाडी च्या पोस्ट मध्ये दिला आहे. आणखी एक महत्वाचा उल्लेख मी करेन की आपल्या ब्लॉगचा सगळ्यात जास्त वाचकवर्ग पुण्यात आहे तसेच अमेरिका, इंग्लण्ड, दुबई, अशा अनेक देशात आपला ब्लॉग वाचनात येतोय मी त्यांचे आभार मानतो आणि मूळ विषयाकडे येतो आज आपण अष्टागर ब्राह्मण समाज, पालघर ह्यापैकी टेंभी गावाविषयी जाणून घेऊयात. 

 टेंभी :- बोईसर पासून अंदाजे ६ किलोमीटर वर हे गाव असून नवापूर रोड पासून ५०० मीटर आतमध्ये हे गाव वसले आहे. ब्राह्मण लोकवस्तीच्या सुरुवातीलाच श्री दत्तगुरूंचे पवित्र मंदिर आहे. येथे आपल्या अष्टागरातील ब्राह्मणांची अंदाजे लोकसंख्या ५७ असून नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असणारी लोकसंख्या अंदाजे ११४ आहे. गावात राणे, पंडित आणि पांडे ही कुटुंबे राहत असून राणेंची कुलदेवता सफाळे एडवण येथील श्री आशापुरी माता आहे तर गोत्र गार्ग्य आहे, कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी-कोल्हापूर पंडितांची कुलस्वामिनी असून गोत्र मैत्रेय आहे. पांडे कुटुंबाचे भार्गव हे गोत्र असून श्री महालक्ष्मी-कोल्हापूर त्यांची कुलस्वामिनी आहे. 

येथील ब्रह्मवृंदांची घरे समोरासमोर असून मध्ये रुंद व प्रशस्त रस्ता आहे. येथील जवळपास प्रत्येक घराचा पाया म्हणा किंवा व्हरांडा जमिनीला सलग नसून बऱ्यापैकी उंचीवर आहे. गावात नवीन तसेच पुरातन पद्धतीची छान घरे आहेत. 


पंडितांचे पुरातन घर, टेंभी

                                                                           
ब्रह्मवृंदांची घरे,टेंभी 


आपल्या अष्टागरातील इतर गावाप्रमाणे इथेही काही ना काही विशेष आहेच. सुरुवातीला आपण सुप्रसिद्ध खाजगी गुप्तहेर माननिय रजनी पंडित ह्यांच्या बद्दल माहिती घेवूयात. गावातील पंडित कुटुंबात १९६२ साली रजनी ताईंचा जन्म झाला. त्या मुंबईत वास्तव्याला असतात त्यांचे पूर्ण नाव रजनी शांताराम पंडित आहे, त्यांचे वडील स्वतः सब इन्स्पेक्टर-पोलीस होते. महाराष्ट्रातील आणि भारतातील त्या पहिल्या खाजगी महिला गुप्तहेर ठरल्या आहेत. 
श्री गुरुदेव दत्त, टेंभी 

त्यांच्या मुलाखती आपण खूप वेळा टीव्ही वर पाहतोच त्यांची प्रसिद्धी आपण सगळे जाणून आहोतच. अतिशय Challenging आणि महत्वाकांक्षी करियर त्यांनी निवडले आहे. खूप मोठ-मोठ्या आणि अतिशय गंभीर स्वरूपाच्या केसेस त्यांनी हाताळल्या आहेत. प्रसंगी स्वतःच्या जीवाची बाजी लावून देखील त्यांनी आपले कार्य पूर्ण केले आहे. रजनी ताईंनी दोन पुस्तके लिहिली आहेत पहिले "Faces Behind Faces" आणि दुसरे "मायाजाल"  पहिल्या पुस्तकाला दोन तर दुसऱ्या पुस्तकाला सहा पुरस्कार मिळाले आहेत. 

दूरदर्शन सह्याद्री चा "हिरकणी" पुरस्कार त्यांना मिळाला असून असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांचा संदर्भ घेऊन दिनेश राव ह्यांनी "Lady James Bond" ही डॉक्यूमेंटरी फिल्म बनवली आहे. लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येणार आहे. आपल्या सगळ्या अष्टागरातील मंडळीना त्यांचा सार्थ अभिमान आहे. 



सुप्रसिद्ध गुप्तहेर रजनी ताई पंडित 


पुढील माहिती आहे येथील मुंबईस्थित श्री प्रवीण गजानन पंडित ह्यांची, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्रीयुत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तिय असून  "शिवसेना भवनाचा" कार्यभार सांभाळतात. 

टेंभी बद्दल जुनी आठवण सांगायची तर येथील कै. बाजीराव पंडित ह्यांची चुन्याची तसेच विटांची भट्टी होती. पूर्वी बांधकाम करण्यासाठी सिमेंट ऐवजी चुनखडी गुळ व इतर काही साहित्य वापरून माल तयार केला जाई. गुजरात, मुंबई पुणे इथवर ह्या मालास मागणी होती. आणखी एक व्यक्ति कै. नारायण परशुराम पंडित हे त्यावेळेस वेदशास्त्री पंडित होते त्यांना अष्टागारात बहुमान होता. 

टेंभी येथील वेसावे स्थित स्वातंत्र्यसैनिक कै श्री दामोदर नारायण पंडित ह्यांनी १९४२ च्या भारतीय क्रांतिकारी आंदोलनात सहभाग घेतल्याने एक वर्षाचा कारावास भोगला होता ही अभिमानस्पद बाब आहे तसेच त्यांचे सुपुत्र डोंबिवलीस्थित श्री विनोद दामोदर पंडित परिवहन विभागात व त्यांच्या पत्नी सौ चारू विनोद पंडित ह्या बँकेत उच्चपदस्थ होत्या व आता दोघेही सेवानिवृत्त आहेत. त्यांची कन्या सौ ऋचा विनोद पंडित - पुराणिक यांनी रशिया येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून स्त्री रोग तज्ज्ञ (Gynacologist) विशेषज्ञ आहेत तसेच सुपुत्र श्री स्मित विनोद पंडित ह्यांनी अमेरिकेत Master of Science ही पदवी प्राप्त केली आहे व सध्या ऑस्ट्रिया देशात एका नामांकित कंपनीत उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. 

येथील ब्रम्हवृंद पौरोहित्य, शेती, आणि खाजगी नोकरी करत असून काही मंडळी व्यवसाय करतात काही MBA, Engineering, IT, शिक्षिका, शिक्षक, सरकारी नोकरी, राजकारण अशा क्षेत्रात आहेत. गावातील बरीच मंडळी, मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत तर काही परदेशातही आहेत. काही व्यक्ति नोकरिनिमित्त परदेशवारी करून आले आहेत. आजोळ टेंभी असणारे श्री मोहन जोशी पालघर येथे प्रख्यात वकील आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्ती सदस्य या समाजाने गावाला दिले आहेत पुरुषांसोबत येथील स्त्रियांचा यात वाटा आहे. 

काही उल्लेखनीय नावे जसे कि श्रीमती माधवीताई मुरली पंडित ह्या नवीमुंबई येथे मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. सौ आशा जोशी  टेंभीच्या कन्या बजाज या कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहेत. येथील श्री दर्पण पंडित लंडन येथे  IT Engineer म्हणून कार्यरत असून  त्यांचा SSC बोर्डात जनता हायस्कुल या शाळेत प्रथम क्रमांक आला होता व अनेक वर्ष त्यांच्या एकूण गुणांच्या जवळपासही कोणी विध्यार्थी पोहचू शकले नव्हते. त्यांचे बंधू श्री समीर पंडित देखील IT Engineer असून त्यांची देखील कामानिमित्त लंडन वारी झाली असून इन्फोसिस मध्ये उच्चपदस्थ आहेत. श्री सुभाष पंडित देखील कामानिमित्त ओमान  तसेच टर्की येथे वास्त्यव्यास होते. श्री अरुण पंडित हे देखील ग्रामविकास अधिकारी होते आता सेवानिवृत्त झाले आहेत. सौ चारुशीला पिंपूटकर श्री शंकर नीलकंठ पंडित ह्यांची कन्या त्यांचे स्वतःचे वधुवर सूचक मंडळ होते 30 वर्ष त्यांनी ते चालवले.

आता आपण गावातील दत्तमंदिराविषयी जाणून घेणार आहोत. येथील दत्तमंदिर ब्रम्हवृंद सांभाळत असून १९४५ साली हे मंदिर उदयास आले आहे तत्पूर्वी येथे श्री रामाचे मंदिर होते. कै. श्री मधू पंडित ह्यांनी मंदिर उभारणीत अतिशय महत्वाचा वाटा उचलला होता तसेच गावकऱ्यांनी देखील खूप मेहेनत घेतली आहे. 

श्री पांडुरंग पंडित ह्यांनी मूर्ती तसेच मंदिर बांधणीसाठी लागणारे कारागीर जयपूर हुन आणले होते. श्री पांडुरंग पंडित हे पोलीस पाटील होतेच तसेच सरकारी कंत्राटदार होते ते स्वतः व त्यांचे बंधू कै. बाजीराव पंडित ह्यांनी मंदिरासाठी आपली जागा उपलबद्ध करून दिली होती. 

येथील श्री दत्तगुरूंची संगमरवरातील प्रसन्न मूर्ती धेनु सोबत उभी आहे.पुरातन मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला आहे. प्रशस्त सभामंडप लाभलेले आणि पावित्र्याने भरलेले हे मंदिर असून मंदिरातील श्री मारुतींची आणि श्री गणेशाची आकर्षक आणि तेजस्वी मूर्ती पाहून मन प्रफुल्लित होते. 

येथील जत्रौत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे, मंदिरात उत्सवाला सुमधुर भजनाचा कार्यक्रम असतो तर येथील पालखी संपूर्ण गावात घरोघरी फिरत असते. मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो तसेच १९७० साला पासून दर वर्षी नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री सत्यनारायणाची महापूजा या मंदिरात घातली जाते. 



 येथील श्री कृष्ण जन्मोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा असून अष्टागरात त्याकाळी हा एकमेव उत्सव होता अशी मान्यता आहे त्यामुळे येथे संपूर्ण अष्टागरातून मंडळींची आवर्जून उपस्थिती असे. 

गावात प्रामुख्याने दिड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होतो तर काही मंडळी ५ दिवस साजरा करतात. दत्तजयंती उत्सव तसेच विविध वार्षिक सण येथे मोठ्या आनंदाने साजरे होतात.

धन्यवाद 

अजित विनोद पंडीत

श्री दत्त मंदिर, टेंभी 

   

पालखी सोहळा 


सौजन्य :- मला ही पोस्ट लिहिण्यासाठी माझे मित्र बंधु अनिकेत अविनाश पंडित आणि कुशल अरविंद राणे ह्यांनी खुप मदत केली आहे. तसेच फोटो सौजन्य पुनम अरुण पंडित ह्याच्या सोशल मिडिया अकाउंट वरुन, सर्वांचे धन्यवाद.

वाचा आलेवाडी बद्दल माहिती,
वाचा नांदगांव बद्दल माहिती,
वाचा सरावली प्रस्तावना.
वाचा अष्टागर प्रस्तावना.

Wednesday, September 23, 2020

अष्टागरातील आलेवाडी गाव

 

श्री गणेशाय नमः

नमस्कार, मी अजित विनोद पंडीत तुम्ही मला सगळे ओळखताच मी आलेवाडी येथील कै. विनोद वसंत पंडीत ह्यांचा द्वितीय पुत्र असून मी खाजगी नोकरीत  Assistant Manager Indirect Taxation  या पदावर कार्यरत आहे, आम्ही आलेवाडी येथे राहतो.

आपल्या ब्लॉगला खूप कमी दिवसात भरपूर प्रसिद्धी मिळत आहे आणि तुम्ही सगळे माझ्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असता हे तुमच्या कमेंट मधून लक्षात येत आहे मात्र एक विनंती आहे की आपण कमेंट करताना आपले नाव नमूद करा जेणे करून कोणी कमेंट केली आहे ते कळेल. पोस्ट लिहिण्यासाठी आपल्या अष्टागरातील बरीच मंडळी मला मदत करीत असतात त्यामुळेच मी जास्तीत जास्त माहिती लिहू शकतो. काही वेळेस जर अनावधानाने एखादी माहिती राहून गेली किंवा माझ्यापर्यंत माहिती पोहोचू शकली नाही तर आपण मला माझ्या ९६३७८४७९३७ ह्या संपर्क क्रमांकावर व्हाट्सअप किंवा फोन कॉलच्या माध्यमातून माहीती देऊ शकता.

जसे आपण अष्टागारातील गावांबद्दल जाणून घेतोय तसेच आपण येथील काही शब्द, शब्द-प्रचार तसेच काही म्हणी त्यांच्या अर्थासहित जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझा अभ्यास सुरु असून लेखन सुरु आहे. तुमच्याकडेही काही शब्द असतील तर शब्द व त्याचा अर्थ मला नक्की व्हाट्सअप करा.

नांदगाव नंतर आपण आज आलेवाडी गावाबद्दल जाणून घेणार आहोत.

आलेवाडी :- नांदगाव ह्या गावाला लागूनच आलेवाडी हे निसर्गरम्य गाव असून समुद्रकिनाऱ्याने या गावाची शोभा वाढते. गावाच्या सुरुवातीला काही अंतरावर येथील ब्राह्मण समाजाची वस्ती आहे. येथील ब्रह्मवृंदाची घरे म्हणजे पुढे अंगण आणि मागे परसबाग, परसात विविध फळांची झाडे असून प्रत्येकाच्या परसात एक विहीर आहे येथील तुळशीवृंदावने घराच्या मागील बाजूस आढळतात. श्री चिंचोबा हे ग्रामदैवत आलेवाडी या गावास लाभले आहे. येथे आपल्या अष्टागरातील ब्राह्मणांची अंदाजे ४५ लोकसंख्या आहे. नोकरी व्यवसायानिमित्त काही कुटुंब परगावी असतात अंदाजे लोकसंख्या १०५ असावी. गावात पंडीत , फाटक आणि नाईक मंडळी राहतात तसेच एक कुटुंब जोशींचे आहे.

पंडीतांचे भार्गव हे गोत्र असून श्री चंडिका माता दाभोळ ही त्यांची कुलस्वामिनी आहे.

फाटक यांचे गोत्र कौशिक असून अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूर ची महालक्ष्मी यांची कुलस्वामीनी आहे. नाईक कुटुंबाचे गोत्र उपमन्यु असून कुलस्वामिनी महालक्ष्मी आहे.

दुसऱ्या नाईक कुटुंबाची कुलस्वामिनी श्री वेडुबाई माता उस्मानाबाद गोत्र भारद्वाज आहे.

आणखी एका नाईक कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महाजाई असून गोत्र परशुराम आहे.

एक कुटुंब पाठक असून कामानिमित्त भाईंदर येथे वास्तव्यास आहे त्यांचे गोत्र सांख्यायन असून श्री महालक्ष्मी त्यांची कुलस्वामिनी आहे.

येथील जोशी कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी आहे.

गावाच्या सुरुवातीला वेडुबाईचे छोटेखानी मंदिर असून गावात दुसरे मंदिर श्री दत्ताचे आहे कै. सदानंद फाटक ह्यांनी ते उभारले आहे.

येथील पंडीत कुटुंबाचा गणपती मूर्ती घडवण्याचा व्यवसाय असून तीन पिढ्या ही कला जोपासत आहेत. त्यांच्या चित्रशाळेचे नाव "श्री वसंत चित्रशाळा" असे आहे. येथील मूर्तिकार:- पहिली पीढी कै. वसंत बळवंत पंडीत  दुसरी पिढी  कै. विनोद वसंत पंडीत , श्री विजय वसंत पंडीत आणि तिसरी पिढी श्री सुजित विनोद पंडीत.  गणपती, गौरी, श्री कृष्ण, नवदुर्गा, विश्वकर्मा अशा देवतांच्या मूर्ती येथे साकारल्या जातात, पंचक्रोशीत शाडू मातीच्या मूर्ती मिळण्याचे हे एकमेव ठिकाण आहे.   

श्री वसंत चित्रशाळेतील गणेश मूर्ती
श्री वसंत चित्रशाळेतील गणेश मूर्ती 

Shree vasant chitra shalaa  alewadi
श्री वसंत चित्रशाळेतील विविध मूर्ती 

येथील श्री वेडुबाई मातेचे छोटेखानी मंदिर मनाला शांती देणारे असून देवी सोबत श्री परशुरामाची आणि श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे, देवीचे व्याघ्रवाहन आणि कूर्म देवीसमोर नतमस्तक झालेले आढळतात. नाईक कुटुंब मंदिराचा वर्धापन दिन साजरा करतात तसेच नवरात्रौत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नाईक कुटुंबाच्या कुलस्वामिनीचे मूळ स्थान उस्मानाबाद येथे आहे मंदिर उभारणीच्या वेळेस तेथूनच देवीची मूर्ती तसेच अखंड तेवणारा दीप आणले आहेत. 


shree vedubai
श्री वेडुबाई माता मंदिर आलेवाडी 


श्री वेडुबाई माता ,आलेवाडी 


गावातील आणखी एक छोटेखानी दत्तमंदिर परिसरात प्रसिद्ध असून फाटक कुटुंबीय मंदिराची देखरेख करतात, दत्तजयंती उत्सवाला येथे भक्तांची रीघ लागते. मंदिरात आपले वाहन गो मातेसोबत श्री दत्तांची स्मित हास्य करणारी देखणी मूर्ती असून सोबत आई महालक्ष्मी आणि गणपती च्या मूर्ती मंदिरात पावित्र्य आणतात.



shree datt aalewadi
श्री दत्त मूर्ती आलेवाडी 

ब्राह्मण लोकवस्तीतली ही दोन्ही मंदिरे येथील समाजाची धार्मिकता दर्शवितात. या गावाचे श्री चिंचोबा हे ग्रामदैवत आहे. गावात श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा होतो तसेच घरो-घरी गौरी गणपती उत्सव आनंदात साजरे होतात. गावातील गणपती उत्सव गौरी विसर्जनादिवशी समाप्त होतो. 

येथील ब्रम्हवृंद पौरोहित्य, शेती, आणि खाजगी नोकरी करत असून काही मंडळी व्यवसाय करतात गावातील बरीच मंडळी, मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सदस्य या समाजाने गावाला दिले आहेत पुरुषांसोबत येथील स्त्रियांचा यात वाटा आहे.

गावातील लेकी सुना देखील नोकरी-व्यवसाय करतात. ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, प्राचार्य, गायन-किर्तन, लॅंडस्केप गार्डनिंग, पर्यटन क्षेत्र, कपड्याचे बुटीक तसेच designer कपड्याचे व्यवसाय केले जातात. सौ. सोनल अजित पंडीत ह्यांची www.nandaigarden.com ह्या वेबसाईट ला आपण नक्की भेट द्या गार्डनिंग च्या टिप्स साठी उपयुक्त आहे. येथील नाईक कुटुंबातील मुली बँकेत उच्च पदस्थ आहेत.

नाईक कुटुंबातील एक सदस्य वकील आहेत. येथील सुधा गजानन फाटक (पूर्वाश्रमीचे नाव) यांचे पुत्र डॉ. श्री शार्दूल कुलकर्णी यांनी PHD in Chemistry केले आहे . आलेवाडी येथे वास्तव्यास असणारे आणि येथील परगावी असणारी बरीच मंडळी MBA, Engineering, Technicians, IT अशा अनेक क्षेत्रात यशस्वी आहेत.

आलेवाडी येथील कन्या मृणाल मनोहर नाईक(पूर्वाश्रमीचे नाव) ह्यांच्या मुलांनी म्हणजेच समीर कमळाकर मुळे आणि नीलेश कमळाकर मुळे ह्यांनी छत्रपती  शिवाजी महाराजांवर मराठीतला पहिला animation चित्रपट "प्रभो शिवाजी राजा" बनवला आहे. दोन्ही भावांनी चित्रपट लिहिला असून नीलेश याने दिग्दर्शन केले आहे. शिवाजी महाराजांबद्दल बरेच वाचन करुन हजारो चित्र या चित्रपटासाठी काढली गेली होती, 16 फेब्रूवारी 2018 ला हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला.

येथील निवृत्त शिक्षकगणाना आजही समाजात बहुमान आहे.

भाईंदरस्थित श्री जितेंद्र पंढरी पाठक ह्यांचा गेली १९ वर्षे "कार असेसरीज" बनवण्याचा व्यवसाय आहे. ते राजकारणात सक्रिय असून एका मोठ्या पक्षात ते उच्च पदस्थ आहेत.

आलेवाडीचे भाईंदरस्थित श्रीयुत दीपक मोरेश्वर नाईक हे मानव अधिकार ह्या क्षेत्रात कार्यरत असून त्यात उच्चपदस्थ आहेत तसेच अनेक लोकाभिमुख कार्य ते करत असतात.

गावातील मुंबईस्थित श्रीयुत आशिष नाईक हे व्यवसायाने वकील (मुंबई हाय कोर्ट) असून त्यांचा सुपुत्र स्नुषा दोघेही व्यवसायाने वकील (मुंबई हाय कोर्ट) आहेत. मुलगी Adoption विषयात तज्ञ आहे. त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ. सुचित्रा आशिष नाईक या पी. एच .डी. इन फिलॉसॉफी असून ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात प्राचार्य  पद भूषवितात. 

आद्य अगरबत्ती - आलेवाडी, संपर्क 9637847937

येथील श्रीयुत श्री रवींद्र नाईक हे महाराष्ट्राचे दूध महासंघाचे माजी अध्यक्ष होते तसेच एका मोठया पक्षात उच्चपदस्थ आहेत, तसेच कै.गोपीनाथजी मुंढे ह्यांचे पी. ए. म्हणून कार्यभार सांभाळला आहे. 

पंडीत कुटुंबाची कुलस्वामिनी श्री चंडिका देवी रत्नागिरीतील दापोली शेजारी दाभोळ येथे आहे, देवीचे कौलारू मंदिर हे आपण कोकणात आहोत ह्याची प्रचिती देते. देवीच्या मंदिर परिसरात एक गोड पाण्याचा झरा आहे. मंदिराच्या आत एका शांत, खोल थंड गुहेमध्ये देवी विसावली आहे. राक्षस मर्दुन देवीने येथे विसावा घेतला आहे, देवीचे लोभस रूप समईच्या मंद प्रकाशात उजळून निघालेले आपण पाहू शकता, देवीला समईचा प्रकाश जास्त प्रिय असावा म्हणूनच आजही गाभाऱ्यात विजेचा दिवा टिकत नाही.

श्री चंडिका देवी दाभोळ 

सौजन्य:- या ब्लॉगसाठी लागणारी तांत्रिक मदत माझी पत्नी सौ. सोनल अजित पंडीत हिने केली असून पोस्ट साठी माहिती व काही फोटोची मदत माझा भाऊ श्री सुजित विनोद पंडीत आणि बहीण सौ श्वेता अपूर्व देशपांडे ह्यांनी केली आहे. 

हिंदू संस्कृती मधील सणांबद्दल माहिती हवी असल्यास माझी बहीण सौ. श्वेता अपूर्व देशपांडे ह्यांचा नव्याने सुरु केलेला   https://shwetadeshpande23.blogspot.com/हा ब्लॉग वाचा.









वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Wednesday, September 16, 2020

अष्टागर नांदगांव

श्री गणेशाय नमः

नमस्कार मी अजित विनोद पंडीत, आलेवाडी. आपल्याला माझी पहिली पोस्ट आवडली हे तुमच्या प्रतिक्रियांवरून समजले. अष्टागरातील मंडळींनी खूप काही सकारात्मक करून ठेवले आहे मात्र ते लिखित स्वरूपात नाही,  कुठेच काही सापडत नाही, हे सगळे डोक्यात चालू असतानां आपणच का काही करू नये असा विचार मनात तरळला आणि मग केला श्री गणेशा. 

पहिली पोस्ट प्रकाशित झाली आणि तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला, बरीच माहिती तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून, फोन करून दिलीत तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रिया दिल्यात खूप बरे वाटले. ज्यांनी मला ब्लॉग साठी मदत केली त्यांचा मी ऋणी आहे. त्यांचा उल्लेख मी त्यांनी दिलेल्या माहितीच्या खाली नक्की करेन.

आपल्या अष्टागराव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून सुद्धा शुभेच्छा आणि अभिप्राय आले आपल्या समाजातील बदलापूरचे श्रीयुत प्रकाशजी पांडे ह्यांनी सुंदर प्रतिक्रिया दिली आहे त्यांचे असे म्हणणे आहे की अष्टागरात आदरातिथ्य खुप छान केले जाते असा त्यांचा अनुभव आहे. मी आपल्या अष्टागरातर्फे त्यांचे आभार मानतो.

अष्टगरातील आपण सर्व गांवांवषयी जाणून घेणार आहोत आज आपण नांदगांव बददल माहिती घेऊयात.


नांदगाव Nandgaon:-

Nandgaon Beach
Nandgaon Beach नांदगांव  समुद्र किनारा


पालघर तालुक्यात अगदी अरबी समुद्राच्या कुशीत विसावलेले हे सुंदर गाव. नांदगाव चा पारनाका सोडला की रस्त्याच्या दुतर्फा ब्रह्मवृंदांची घरे आढळतात. जुन्या पद्धतीच्या  घरांच्या जागी आता नवीन घरे आढळतात, मात्र आजही काही जुनी घरे दिमाखात उभी आहेत. नांदगाव गाव म्हणजे प्रतीकोकण, नारळी, पोफळी, आंबे ह्या वृक्षांनी नटलेलंयेथे आपल्या अष्टागरातील ब्राह्मणांची अंदाजे ६२ लोकसंख्या आहे. नोकरी व्यवसायानिमित्त काही कुटुंब परगावी असतात त्यांची अंदाजे लोकसंख्या २५ असावी. गावात राणे आणि जोशी ही कुटुंबे आहेत, जोशींचे गौतम तर राणेंचे गार्ग्य गोत्र आहेसफाळे एडवण येथील श्री आशापुरी माता राणे यांची कुलस्वामिनी असून जोशींची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी-कोल्हापूर आहे. 

येथील राणे कुटुंबात तीन तहसीलदार/मामलेदार होऊन गेले आहेत कै. जयवंत राणे, श्री विनोद राजाराम राणे व सौ वंदना विनोद राणे.  तसेच मुलगी डॉ. जाई विनोद राणे डेंटिस्ट आहे. येथील शिक्षक मंडळी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. येथील काही मंडळी राजकारणात सक्रिय असून नोकरीत उच्चपदावर कार्यरत आहेत. पौरोहित्य, शेती तसेच नोकरी व्यवसाय येथील मंडळी करताना आढळून येतात. नोकरी निमित्त परदेशातही काही मंडळी वास्तव्य करून आलेली आहेत.  सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य या समाजाने गावाला दिले आहेत पुरुषांसोबत येथील स्त्रियांचा यात वाटा आहे. येथील श्री अजित शरद राणे हे कॅम्लिन लिमिटेड येथे उच्चपदस्थ आहेत.

येथील कै. श्री वसंत राणे हे राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले शिक्षक होते. गुरुजींना दिल्ली येथे खुद्द राष्ट्रपतींच्या हस्ते आदिवासींसाठी विशेष कार्य करणारे शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला होता. मला ही प्राथमिक शिक्षणात ते गुरु म्हणून लाभले होते, पाठ्यपुस्तकात सुलभता यावी आणि आपल्या परिसरात दिसणाऱ्या गोष्टी त्यात याव्या या साठी ते नेहेमी आग्रही असत. त्यांना नुकतीच काही महिन्यांपूर्वी देवाज्ञा झाली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

येथील पुरातन शंभू महादेवाचे मंदिर खूप लोभस असून श्रीयुत दांडेकर यांनी उभारले आहे. कोकणातील एखाद्या मंदिराची प्रतिकृती असावी असे हे मंदिर आहे. मंदिर कौलारू असून मंदिरात गणपती मारुती आणि पार्वती च्या मूर्ती देखील आढळतात. श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी रेलचेल असते, महाशिवरात्रीला येथील शिवलिंग पाहण्याजोगे असते खूप सकारात्मक ऊर्जा या मंदिरात मिळते. 


1शिवमंदीर नांदगाव

Shiv Mandir Nandgaon
शिवमंदीर नांदगाव


महाभारतामध्ये उल्लेख असलेल्या सप्तकुमारिका माता नांदगाव च्या समुद्राकिनारी विराजमान झाल्या असून येथील समाजाच्या त्या आराध्य आहेत. देवींना अनेक नवस सायास केले जातात. तसेच ग्रामदैवता श्री नांदबा देवी यांस लाभली आहे.

राणे कुटुंबाची कुलस्वामिनी आशापुरी माता सफाळे येथील एडवण गावात समुद्रात वसली आहे, समुद्रात एका छोटेखानी बेटावर /टेकडीवर सर्वोच्च ठिकाणी गुहेमध्ये देवी  विराजमान झाली आहे. देवीचे मंदिर देखील खूप सुंदर आहे. या टेकडीवर देवी सोबत काही वृक्ष आहेत त्यांना येथील बोली भाषेत राजणीचे वृक्ष म्हणतात. आता देवी पर्यंत जाण्यासाठी सिमेंटचा मार्ग असून येथे विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. राणे कुटुंबीय नेहेमी देवीच्या मंदिरासाठी सुखसोयी करण्यात तत्पर असतात. समुद्राला भरती असली की या टेकडी च्या चोहोबाजूने पाणी असते. अतिशय नयन रम्य ठिकाण आहे. 

2आशापुरी देवी मंदीर, एडवण

Aashapuridevi Edavan
आशापुरी देवी मंदीर, एडवण


3श्री आशापुरी माता , एडवण

Aashapuri Mata, Edavan
श्री आशापुरी माता , एडवण


4आशापुरी देवी बेट

Aashapuradevi Bet
आशापुरी देवी बेट


सौजन्य:- मला हा ब्लॉग लिहिण्यासाठी माझा मित्र बंधू सनी जोशी आणि आशिष जोशी यांनी बहुमूल्य मदत केली आहे दोघांचे आभार, आशापुरी देवीचे फोटो कीर्ती आणि धीरज वैती यांच्या सौजन्याने.

आपल्या प्रतिक्रिया खाली टिपण्णी वर क्लिक करुन दया.











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...