Saturday, September 11, 2021

गणपती आरती दीनदयाळा

 श्री गणेशाय नमः



नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आपल्या अष्टागर लेखमालेत तुमचं सगळ्यांच पुनःश्च स्वागत आहे आपण अष्टागरातील आरत्यांबद्दल माहिती करून घेत आहोत मागच्या लेखात आपण "स्थापीत प्रथमा" या गणेश आरतीला उजाळा दिला होता. आज आपण गणपती बाप्पाच्या "दिनदायाळा गणपती स्वामी" या आरतीवर प्रकाश टाकणार आहोत.

आपल्या "स्थापित प्रथमा" या आरतीची किंवा आपण नेहेमी ज्या संत रामदासांच्या आरत्या म्हणतो त्यांच्या चाली खूप सोप्या आहेत मात्र आजच्या आरतीची चाल थोडी कठीण आहे. मात्र आरती श्रवणीय आहे. ही आरती म्हणायला नेहेमी पेक्षा जास्त व्यक्ती असल्या की आरती म्हणायला मजा येते आणि सोपेही जाते.

दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी। तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥धृ.॥

कवण अपराध म्हणवुनि देवा केला रुसवा। अहर्निशी मी हृदयी तुझा करितसे धांवा ॥ दीन.॥१॥

चिंताकूपी पडलों कोण काढील बाहेरी। धांवें पावें सखया करुणा करुनि उद्धरी॥ दीन.॥२॥

ऐसे होते चित्ती तरि का प्रथमचि देवा। अंगीकार करुनि केला कृपेचा ठेवा॥ दीन.॥३॥

आतां करणें त्याग तरिही स्वामी अघटित। शरण आलों माझा आता चुकवी अनर्थ॥दीन.॥४॥

यादवसुत हा विनवी दोन्ही जोडूनियां कर॥ तव चरणाचा सखया मजला आहे आधार॥दीन.॥५॥

ह्या आरतीच्या माध्यमातून कवी यादवसुतांनी श्री गणेशाला आर्त विनवणी केली आहे, हे दिनांच्या दयाळा मला येऊन भेट, हे सखया तुझे दोन्ही चरण मला खूप प्रिय आहेत. माझ्या हातून असा कुठला अपराध घडला की तू मजवर रुसला आहेस. मी मनापासून हृदयातून तुझा धावा करतोय. मी मोठ्या चिंतेत आहे त्यातून मला बाहेर काढ गणराया. माझ्यावर दया कर आणि माझा उद्धार कर. मी तुला शरण आलो आहे या संकटामधून मला बाहेर काढ आणि माझ्यावर ओढावलेला हा अनर्थ टळू दे. देवा तुझ्या चरणांचा मला खूप मोठा आधार आहे, माझे दोन्ही हात जोडून मी तुला विनवणी करतो आहे त्याचा विचार कर.





किती सुंदर आरती आहे, नाही का? आजच्या कोरोना संकट काळात ही आरती अगदी तंतोतंत जुळते आहे, आपण श्री गणपतीला प्रार्थना करू की लवकर ह्या संकटामधून तू सर्वाना बाहेर काढ.

धन्यवाद.

आरती स्थापित प्रथमा

नागपंचमी बद्दल वाचा

रूखवत वाचा











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना.

Tuesday, September 7, 2021

आरत्या अष्टागरातल्या(स्थापित प्रथमा)

 श्री गणेशाय नमः


नमस्कार,
मी अजित विनोद पंडीत तुमचे आपल्या लेखमालेत पुन्हा एकदा स्वागत आहे, श्रावण महिना सुरु झाला की आपल्याकडे सणवार आणि धार्मिक कार्यांची पर्वणीच सुरू होते. श्रावणापाठोपाठ भाद्रपद, गौरी गणपती घेऊन येतो. घरी बाप्पा विराजमान झाले की गणपतीची आराधना, स्तुती करण्यासाठी आपण त्याची मनोभावे आरती करतो. टाळ्या आणि टाळ छान लयीत वाजवून आर्त स्वरात आरती गायली जाते. ८० वर्षांच्या आज्जी आजोबांपासून ते अगदी एक वर्षाच्या चिमुकल्या पर्यंत सगळ्यांच्या आवडीच्या ह्या आरत्या परिसरात पावित्र्य आणतात. आजचा आपला विषयच आहे अष्टागरातील आरत्या.

आपल्या आर्यावर्तात सर्व देवांच्या खूप वेगवेगळ्या आणि अनेक भाषांमध्ये आरत्या आहेत अष्टागरात देखील अनेक आरत्या गायल्या जातात, सर्वश्रुत आरत्या म्हणजे सुखकर्ता, शेंदूर लाल चढायो, शंकराची, देवीची, विठ्ठलाची ह्या आरत्या तर सगळेच गातात मात्र आणखी काही पारंपारीक आरत्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

आज आपण "स्थापित प्रथमा" या आरती बद्दल बोलणार आहोत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे सुंदर वर्णन करणारी ही आरती आहे. ही आरती गाताना मंत्रमुग्ध व्हायला होतं. ह्या आरती मध्ये माणिकदासांनी बाप्पाचे यथार्थ वर्णन केले आहे.

ही आरती म्हणताना समोर बाप्पाची देखणी मूर्ती उभी नाही राहीली तर नवलच. आणि आपण देवासमोर जेव्हा हि आरती गातो तेव्हा प्रत्येक पद गात असताना, प्रत्येक पदागणिक देवाच्या संपूर्ण रुपाकडे एक एक करून आपलं लक्ष वेधलं जातं.

स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती।
विघ्ने वारुनी करिसी दीनेच्छा पुरती।
ब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुती करिती।
सुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकीर्ती॥१॥
जय देव जय देव जय श्री गणराजा।
आरती ओवाळू तुजला महाराजा॥धृ.॥

एकदंत स्वामी हे वक्रतुंडा।
सर्वाआधी तुझा फ़डकतसे झेंडा।
लप लप लप लप लप लप हालविसी गज शुंडा।
गप गप मोदक भक्षिसी घेऊनि करि उंडा॥जय.॥२॥

शेंदूर अंगी चर्चित शोभत वेदभुजा।
कर्णी कुंडल झळ्के दिनमनी उदय तुझा।
परशांकुश करि तळपे मूषक वाहन दुजा।
नाभिकमलावरती खेळत फ़णिराजा॥३॥

भाळी केशरिगंधावर कस्तुरी टीळा।
हीरेजडित कंठी मुक्ताफ़ळ माळा॥
माणिकदास शरण तुज पार्वतिबाळा।
प्रेमे आरती ओवाळिन वेळोवेळा॥जय.॥४॥

ही आरती खूप साधी आणि सरळ आहे, आरतीचा अर्थ पहा किती छान आहे, प्रत्येक कार्यारंभी गणपती बाप्पाची स्थापना किंवा आवाहन केले जाते. सगळ्यांचे विघ्नहरण करणाऱ्या आणि दिनांची इच्छापुर्ती करणाऱ्या बाप्पाची स्वयं ब्रह्मा, विष्णू आणि महेश स्तुती करतात तसेच सुरवर मुनिवर बाप्पाची स्तुती गातात.
दुसऱ्या पदामध्ये म्हटलंय एकदंत, वक्रतुंड स्वामी गणेशाला प्रत्येक कार्यात अग्रमान आहे, तसेच बाप्पा आपला आवडता मोदक सोंडेच्या मदतीने कसा खातो ह्याचे सुंदर वर्णन केले आहे.

तिसऱ्या पदामध्ये बाप्पाचे शेंदूर चर्चित अंग, भुजा, हातातील पाश अंकुश, कानातील कुंडल, तसेच त्याच्या पोटाला लपेटून बसलेला फणिराज अर्थात नागदेवतेचे वर्णन आहे.

चवथे पद बाप्पाच्या कपाळावरील केशरी गंध, आणि गळ्यातील हिरेजडित कंठीचे वर्णन करत आहे ह्या शेवटच्या पदात कवी माणिकदासांनी स्वतःचा उल्लेख केला असून हे पार्वतीच्या बाळा मी तुला शरण आलोय आणि प्रेमाने  वेळोवेळी तुझी आरती ओवाळत राहीन असे म्हटले आहे.

जर आपल्याकडे ही आरती म्हणत नसतील तर ह्यावर्षी नक्की प्रयत्न करा. 


धन्यवाद.

नागपंचमी बद्दल वाचा

रूखवत वाचा











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

Saturday, September 4, 2021

अष्टागरातील पिठोरी अमावास्येचे व्रत

 श्री गणेशाय नमः

बाजारात मिळणारी श्री पिठोरी देवीची प्रतिमा

नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आज आपण पिठोरी अमावास्येबद्दल जाणून घेणार आहोत. श्रावण अमावस्येला हे व्रत स्त्रिया किंवा माता आपल्या मुलांकरिता करतात. आपल्या बाळाला दीर्घायुष्य मिळावे त्यावरील सर्व संकटं दूर व्हावी म्हणून माता श्री पिठोरीचे हे व्रत करत असतात म्हणून यास मातृदिन असेही म्हणतात. संतती प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत करण्याची प्रथा आहे.

अष्टागरात पाहुयात कशाप्रकारे हे व्रत केले जाते. भिंतीवर श्री पिठोरी देवीची प्रतिमा साकारली जाते ह्या प्रतिमेमध्ये काय असतं हे पाहुयात. ह्यावर ठळकपणे ६४ योगिनी असतात. आई आपल्या पाळण्यात झोपलेल्या बाळाला जोजवत आहे असे चित्र असते. सूर्य, चंद्र, देवीसाठी पाच फळे, सौभाग्याचे प्रतीक कुंकवाचा करंडा, फणी, बांगड्या, पायातील जोडवे, आरसा. हल्ली देवीचा कागद बाजारात उपलब्ध आहे ह्या कागदात योगिनींसोबत आणखी प्रतिमा असतात जसे की गौरी, गणपती, श्रीकृष्ण, शंकरपार्वती, गाय वासरू, घरकाम करताना स्त्रिया, वाजंत्री, आईकडून प्रसाद घेणारी मुले, हत्ती. असे एकंदरीत स्वरूप असतं.

घरी साकारण्यात येणारी पिठोरी


पूजेसाठी हार फुलांसोबत, तेरडे, आघाडे, लेकुरवाळीची वेल आवर्जून आणली जाते. प्रसाद म्हणून खीर केली जाते.

ह्या दिवशी उपास केला जातो, संध्याकाळी षोडशोपचारे देवीचे पूजन केले जाते, हळदी कुंकवासोबत ६४ योगिनींना तसेच आई आणि बाळाच्या प्रतिमेस काजळ लावले जाते. तेरडे आघाडे देवीस अर्पण केले जातात. लेकुरवाळीची वेल हाराप्रमाणे देवीस अर्पण केली जाते. ह्या वेलीस खूप छोटी छोटी फळे लगडलेली असतात अगदी आईस बाळ बिलगुन बसावे अशा प्रकारे ती दिसतात. त्यामुळे मातृत्वाचे प्रतीक म्हणून ही वेल विशेषतः पूजेत समाविष्ट केलेली आढळते.
लेकुरवाळी

देवीला खिरीचा प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. हा प्रसाद म्हणजे खीर एका ताटात वट्यांमध्ये देवी समोर ठेवला जातो, त्यानंतर आई एक वाटी हातात घेऊन "अतिथी कोण" असे म्हणते तिच्या पाठी असणारे तिचे अपत्य आपले नाव सांगून पाठूनच ती वाटी हातात घेते आणि प्रसाद ग्रहण करते. शक्यतो रव्याची खीर करण्याचा प्रघात आहे. काही ठिकाणी ह्या दिवशी देवीसाठी उकडीचे मोदक केले जातात. एक किंवा अनेक स्त्रिया एकत्र येऊन आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करतात.

थोडक्यात कथा:- पिठोरीचे हे व्रत नागकन्या आणि देवकन्या ह्यांनी एका स्त्रीला सांगितले होते प्रसूती होताच तिचं बाळ दगावत असे, दरवर्षी तिच्या आजेसासऱ्यांच्या श्राद्धाच्या दिवशी हे घडत असे त्यामुळे श्राद्धात अडथळा येई, म्हणून तिला तिच्या सासऱ्यांनी तिच्या मृत बाळासकट घरातून हाकलून दिले होते त्या वेळी म्हणजे श्रावण अमावस्येच्या रात्री एका झाडावर बसून त्या स्त्रीने हे नागकन्या देवकन्यांचे व्रत पाहिले, नागकन्या अतिथी कोण म्हणताच ती स्त्री पुढे आली आणि आपली करूण कहाणी त्यांना सांगितली. नागकन्या आणि देवकन्या ह्यांनी तिचे मृत बाळ आणि आधीच्या मृत बाळांना पुनरुज्जीवित केले, आणि यापुढे तू आपल्या बाळांच्या रक्षणासाठी हे व्रत कर असे तीस सांगितले, पुढे आपल्या सर्व मुलासोबत ती स्त्री तिच्या घरी गेली आणि सुखाने नांदू लागली.

धन्यवाद.


नागपंचमी बद्दल वाचा

रूखवत वाचा











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

Friday, August 13, 2021

अष्टागरातील नागपंचमी

 श्री गणेशाय नमः


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आज आपण नागपंचमी या सणाबद्दल माहिती घेणार आहोत, आपल्याकडे श्रावण महीना सुरू झाला की पहिला सण नागपंचमी येतो आपल्याला माहिती आहेच की आपल्या आर्यावर्तात प्राणी पक्षी आणि एकूणच निसर्गास देव मानून त्याचे संवर्धन केले जाते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे प्रतिकात्मक पूजन केले जाते. अष्टागरातील नागपंचमी कशी असते ते जाणुन घेऊयात.

चंदन आणि हळद उगाळून पाटावर नऊ किंवा आपल्या प्रथेनुसार नाग काढले जातात त्यातील एक नाग शेपूट नसलेला असतो. काही ठिकाणी हळद, कुंकू, अबीर, कडधान्य, तृणधान्य, लाह्या ह्यापासून नाग काढले जातात. जमिनीवर पाट ठेवून त्याचे षोडशोपचारे पूजन करतात चंदनाचे नाग काढलेला पाट भिंतीला लावून एक पाट किंवा चौरंग  जमिनीवर ठेवला जातो त्यावर पूजेचे साहित्य ठेवले जाते. पटाखाली पिकलेले तोंडले आवर्जून ठेवले जाते. 


तेरडे, आघाडे, कापशी वस्त्राची माळ, फुले वाहून नागांचे पूजन करतात काही ठिकाणी नागाची मूर्ती देखील पुजली जाते. दूध आणि भाताच्या लाह्यांचा नैवेद्य नागासाठी परसात ठेवला जातो. प्रसाद म्हणून पाच कडधान्य आदल्या दिवशी भाजली जातात, कारण नागपंचमीच्या दिवशी तवा वापरत नाहीत, शक्यतो स्वयंपाक घरात भाजले, कापले जात नाही, तसेच शेतकरी शेतात नांगर फिरवत नाहीत. घरातील स्त्रीवर्ग नागाचे पूजन करून उपास करतात.


पूर्वी पूजन करताना नागासाठी काही गाणी गायली जात असत हल्ली ती गाणी काळाच्या ओघात पुसट झाली आहेत.

नागपंचमीच्या एका कहाणी मध्ये एका स्त्रीला भाऊ नव्हता त्यावेळेस तीने नागाला आपला भाऊ मानले होते, एकेदिवशी नागाच्या वारुळात नागीण प्रसूत होत असताना ती स्त्री दिवा घेऊन उभी होती वळवणारे नागाचे पिल्लू पाहून एका पिल्लाच्या शेपटावर तिच्या हातातला दिवा निसटून पडला व त्याची शेपूट जळाली होती. त्या पिल्लास पुढे इतर मंडळी, छोटी पिल्ल, बिना शेपटाचा नाग म्हणून चिडवीत आई कडून सर्व हकीकत कळल्यावर ते पिल्लू त्या आपल्या आत्यास डंख मारण्यास गेले होते. मात्र आत्याने नागपंचमीची पूजा केली होती आपली प्रतिमा पाहून त्याचा राग पळाला पाटाखालचे तोंडले खाऊन तो घरी परतला आपल्या आईस लाल तोंड दाखवले ते पाहून आई घाबरली आपल्या आत्यास तू का डंख मारलास असे विचारताच त्याने सगळी हकीकत सांगितली. ही गोष्ट आज आपल्याला थोडी विचित्र वाटेल मात्र त्यामागील भावना आणि शुद्ध हेतू महत्वाचा नाही का?

धन्यवाद.



वाचा रूखवत











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

Wednesday, July 7, 2021

रूखवत (अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः



नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखशृंखलेत तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण या लेखात रूखवत या बद्दल माहिती करून घेणार आहोत, आपल्या ब्राह्मणी पद्धतीनुसार लग्नाच्या दिवशी अष्टागरात देखील वधुचे, मंडपात किंवा कार्यालयात रूखवत मांडले जाते. शोभेच्या, खाण्याच्या वस्तूंचे तसेच संसाराला पूरक आणि काही पारंपरिक गोष्टी तसेच  काही सुविचारांनी नटलेल्या वस्तूंचे हे एक छानसे छोटेखानी प्रदर्शनच असते.



हस्तकला, चित्रकला, पाककला, विणकाम, शिवणकाम, भरतकाम अशा अनेक कलांचा संगम येथे पाहायला मिळतो. लग्नात एका टेबलावर छान वस्तूंची आकर्षक मांडणी केलेली दिसली की समजावे ते रूखवत आहे.

आपल्यापैकी प्रत्येकाने हे रूखवत पाहिले असेलच आणि लग्नात 5 मिनिटे का असेना प्रत्येक व्यक्ती विशेषतः स्त्रिया या रुखवताला नक्कीच भेट देतात. 



हल्ली पारंपरिक गोष्टी जरी कमी होत असल्या तरी रुखवतामध्ये काहीगोष्टी आजही आपले स्थान कायम टिकवून आहेत. स्वतः वधु आणि तिचे नातेवाईक ह्या वस्तू बनवतात. हल्ली बाजारात ह्या रुखवतात योग्य बसतील अशा शोभिवंत वस्तू सर्रास मिळत असल्या तरी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची हजेरी देखील आपण अनुभवताच.



ह्या रुखवतामध्ये छोटी बैलगाडी, छोट्या धान्याच्या गोणी, सप्तपदी आणि प्रत्येक पावलांवर सुंदर उपदेशात्मक लेखन असते (आजही सुंदर हस्ताक्षरात देखील पहायला मिळते), सनई चौघडा, तोरण, हिरव्या बांगड्या त्यातील माहिती ह्या गोष्टी नक्की पाहायला मिळतात. काजू, सुपारी आणि लवंगाची शेंडी असणारे कागदी हवन करणारे भटजी आपली उपस्थिती आजही लावतात.  घरगुती स्वयंपाक घरातील वस्तूंपासून बनवलेले सौभाग्य अलंकार सोन्यालाही लाजवतील इतके आकर्षक असतात.




खाद्य पदार्थात पापड, कुरडया पासून फराळाचे आणि लोणची मुरांबे ते चटण्यापर्यंत बरंच काही असते, बुंदीचे नेहेमी पेक्षा आकाराने मोठे लाडू भाव खाऊन जातात तसेच वधु वरांचे नाव, पापड आपल्या अंगावर छान मिरवतात.

रूखवत आलं बाई झाकुनी ग ठेवा,
(वधूच्या घरातील मानाने मोठी स्त्रीचे नाव) माझ्या ग बाईला वडिलीला मान द्यावा.

रूखवत आलं, जिलेबी ग नाही आली,
वधु ग माझ्या बाईच्या आईला ग घाई झाली.

रूखवत आलं सरी सांडली तेलाची,
(आईचे नाव) बाई माझी वरमाई ग लेकाची


गृहपयोगी वस्तूंची रेलचेल पाहून वधुच्या मानातील आपल्या नवीन संसारासाठी लागणाऱ्या गोष्टींची केलेली तजवीज जाणवते.

वधुकडील मंडळी सकाळी छान रूखवत मांडत असतात तर पाठवणीच्या प्रसंगी वराकडील मंडळी अलगद पण लगबगीने ह्या वस्तू उचलत असतात. निघताना रिकाम्या टेबलावर वधुच्या माऊलीसाठी वरपक्षाकडून साडी ठेवली जाते. 



माझा लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की लिहा, आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी मोलाच्या आहेत. 

धन्यवाद,

रूखवत सौजन्य:- सौ. अंकिता तिवाड-पंडीत आणि सौ स्वाती लवाटे.
गाण्यासाठी आभार : श्रीमती जैमिनी वसंत पंडीत(पूर्वश्रमीचे नाव)











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

Sunday, May 16, 2021

अष्टागरातील लग्नसमारंभातल्या रितिभाती

 श्री गणेशाय नमः


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत अष्टागरातील लग्नसमारंभ ह्या लेखमालेत मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो. आत्तापर्यंतच्या आपल्या लेखमालिकेत आपण कुंकू लावण्याची प्रथा ते हळद लावण्याच्या प्रथेपर्यंत अनेक विवाह निगडित संस्कार, रितिभाती विधी ह्यांना उजाळा दिला आहे. आज आपण आपल्या अष्टागरात विवाह संस्कारात आणखी कुठल्या पद्धती पायंडे आहेत ते जाणून घेऊयात सोबत पारंपरिक गाणी असणार आहेतच.


आपला समाज हा मनुष्यप्रिय असून नातेसंबंध जपणारा आहे. आपल्या प्रत्येक कार्यात आपले नातेवाईक किंवा आप्त आपल्या सोबत रहावे या उद्देशाने काही प्रथा आहेत त्या आपण पाहुयात ह्यामुळे आपली नाती अधिक दृढ होतात.

लग्नात वर/वधूच्या मामास खूप महत्व आहे, सर्वप्रथम वर/वधुस मामा हाती कांकण बांधतो. वधुसाठी लागणारे वधूवस्त्र अर्थात पिवळ्या रंगाची साडी, आपल्याकडे अष्टागरात त्यास पारणेट म्हणतात हे नेसून वधु लग्नासाठी तयार होते ते मामाकडून असतं आणि चोळी(ब्लाऊज) वधुच्या मावशीने आणावी अशी पद्धत आहे. तसेच मामा वधुला बोहल्यावर उभी राहण्यासाठी घेऊन येतो. पुढील गाण्यांच्या ओळी बघा काय म्हणतायत.

"मामाचं पातळ मावशीची कांचोळी,
वधु (चे नाव) न ग बाई माझी गौरी हाराची पुतळी"

मामा वधुला घेऊन येताना


लग्नात करवलीस बहुमान आहे हे काही मी वेगळे सांगायची आवश्यकता नाही. वधु/वरासोबत करवली प्रत्येक रितिभाती मध्ये अग्रस्थानी असते. वर/ वधूची बहीण करवली म्हणून लग्न मुंजीत आवर्जून लागतेच.

"मंडपाच्या दारी, करवल्या दहा वीस,
आणि करवली(चे नाव) बाई माझे मानाचे खाली बस"

"रुसली ग करवली, नाही येणार मांडवा,
करवली(चे नाव) न ग बाई माझी पायी धरिसी पांडवा".

जशी लग्नात करवली लागते तसेच "कानपिळी" या रितीसाठी वधूचा भाऊ उपस्थित असतो, माझ्या बहिणीचा योग्य सांभाळ करा असे सांगत प्रेमाने आणि गमतीने वराचा कान तो धरतो आणि नवरा मुलगा (वर) त्यास वचन देऊन योग्य तो आहेर या प्रसंगी देतो.

"कानपिळी"ची प्रथा

लग्नात जसा वर/वधूच्या बहिणीस बहूमान असतो तसाच जावयास देखील मान असतो अष्टागरात लहान बहिणीच्या लग्नात मोठ्या बहिणीच्या पतीस, सासरे बुवा आहेर करतात यथाशक्ती एखादी सोन्याची किंवा मौल्यवान वस्तू भेट म्हणून देतात तसेच आपल्या कन्येस व नातवंडासही योग्य तो आहेर देतात.

"बुंदीचे ग लाडू, जावयाच्या फराळाला,
एवढा ग अग्रमान, लेकीकारण जावयाला"

अशाप्रकारे आपल्या रिती भाती आपली माणसे जोडून ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणखी कुठल्या प्रथा आहेत ते पुढे पाहुयात.

अष्टागरात लग्न किंवा मुंज लागतेवेळी वधु आणि वराची आई(वरमाय) तेथे उपस्थित न राहता तुळशी समोर किंवा देवाजवळ हात जोडुन उभी असते.

लग्नमंडपास प्रवेशद्वार असतं त्यास दोन केळी बांधल्या जातात त्यास केळीचे खांब म्हणतात. ही केळीची झाडे केळीच्या घडाने लगडलेली असतात. ह्या केळी बांधताना सुवासिनी त्यांचे व या केळी आणणाऱ्या मंडळींचे औक्षण करतात.



केळीच्या खांबाचे प्रवेशद्वार

लग्नाच्या काही दिवस आधी कासाराला (बांगडया वाली स्त्री) आमंत्रित करून घरातील स्त्रिया आणि शेजारील तसेच आळीतील स्त्रियांना बांगड्या भरल्या जातात. वधुकडे वधुस हिरवा चुडा भरला जातो यात २१ बांगड्या असतात. बांगड्यावालीस पैसे आणि शिधा नारळ देण्याची प्रथा आहे. जेवणाची वेळ असल्यास भोजन करवूनच त्या बांगड्यावाल्या स्त्रिला निरोप दिला जातो.

वधुस मेंदी लावण्याचा कार्यक्रम सुद्धा छोटेखानी पद्धतीनं केला जातो, वरास देखील थोडीशी मेंदी लावली जाते.

हिरवा चुडा आणि मेंदी

अशा अनेक प्रथा परंपरांचे पालन करत आपल्याकडे लग्नसोहळा पार पाडला जातो, पुढील भागात आपण लग्नविधी बद्दल माहिती घेवूयात.

धन्यवाद.

गाण्यांसाठी विशेष आभार:- माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत (पूर्वाश्रमीचे नाव)











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Sunday, May 2, 2021

केळवण(अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः



नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ ह्या लेखमालेत आपलं सगळयांचे मनःपूर्वक स्वागत. दिवसेंदिवस आपली ही लेखमाला अधिक खुलत आहे आणि हळूहळू पुढे सरकत आहे. आज आपण वधुस/ वरास हळद लावण्याच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत त्यास केळवण असे म्हणतात.

आपण सगळेच जाणून आहात की हळद ही आरोग्यासाठी अतिशय लाभदायक अशी औषधी वनस्पती आहे, आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. लग्न म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात असते अनेक जबाबदाऱ्या ओघाने दोघांवर येत असतात त्यासाठी निरोगी असणे अती आवश्यक आहे, म्हणूनच आपल्या आर्यावर्तात/भारतात लग्नाआधी हळद लावली जाते हे काही मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

आपल्याकडे लग्नाआधी वर/वधुस हळद लावण्याची प्रथा आहे आणि या केळवणाच्या कार्यक्रमात हळदी सोबत केसाला शिरं म्हणजे नारळाचे दूध, सुगंधी तेल देखील लावले जाते, केळवण, तेलवण, ह्याबद्दल जाणून घेऊयात.

आदल्या दिवशीच (गहू टिपण्याचा वेळेस वर/वधु कडून कुटून घेतलेली) हळद त्यात चंदन भुकटी(पावडर) घालून रात्रभर भिजवली जाते. केळवणाच्या आधी ओल्या नारळाचे दूध शिरं तयार केले जाते. ह्या कार्यक्रमास स्रीवर्गास विशेषतः आमंत्रण असतं कारण हा कार्यक्रम सुद्धा मुख्यतः त्याच पार पाडत असतात.

केळवण करताना वर/वधु सोबत करवली आणि आई वडील ह्यांना पाटावर बसवून त्यांचे पाच सुवासिनी औक्षण करतात,  सुरुवातीला सुवासिनी आंब्याच्या पानाने वधुस/वरास हळद लावतात आणि ही हळद आधी पायाला, गुढगे हात अशाप्रकारचे वर चढवली जाते. वर/वधु पाठोपाठ करवली, आई वडील ह्यांना हळद लावली जाते मुहूर्ताची हळद लावून झाली की हाताने हळद लावली जाते सोबत पारंपारिक गाणी गायली जातात. वराची उष्टी हळद वधुसाठी पाठवली जाते. केळवण घरात किंवा मंडपात करण्याचा प्रघात आहे.




मंडपाच्या दारी हळदीचं वाळवण,
....माझ्या ग बाळाचे/बाईचे नवऱ्याचे/नावरीचे केळवण.

हळदी लाविल्या सारणी दंडीवाहे पाणी
तेवत्या मालिनी दाल देता,

बहू जाहले उशीर चिंते तुमचे दीर लक्ष्मण,
लक्ष्मणाचे धोतरे चंदन माखले, वाळत घातले नाग चाफे.

हळद लावून झाली की तेलवण केले जाते, डोक्याला शिरं आणि सुगंधी तेल लावले जाते. खायच्या पानाला तेल लावून ते डोक्यावर पडेल अशा पद्धतीने पाच सुवासिनी पान हाताळतात आणि गाणी गातात.

तेलवण 

चाफेलं धुपेलं मोगरेल तेल, 
त्या तेलवणासाठी चौघी सुवासिनी 
उभ्या देवापुढे लक्ष तेलवण पडे,

आधी पडे देवाला 
नंतर पडे मुहूर्तमेढी, 
नंतर पडे नवऱ्याला/ नवरीला.

अशोक वनामध्ये उभी 
सिता मंजुळ करूनी, तितक्यात आले मारुती,  
झाडावर चढोनी, चमत्कातर पाहुनी, टाकुनी मुद्रिका, 
सीता मनी दचकली.

त्यानंतर दोन उडदाचे पापड, एक पापड वधु/वराच्या हातात आणि दुसरा सुवासिनीच्या हातात घेऊन त्यात सुपारी एका पापडातून दुसऱ्या पापडात फिरवली जाते असे पाच सुवासिनी करतात. त्यावेळेस हे गाणे गायले जाते.

लोणं-मुणं भरली ताट ससूये घाट,
घाट जो रुंदला वेलाणीया आगर रुंदला,

विष्णुनावे हाताचे कांकण देऊ करा.
आणा हो चावी या उघडाहो पेटी या,
 काढाहो ठुशि या पेहेराव हाती,

या "अलका" बाई अलका बाई आत्या,
"विनोद" देव पिता "विद्या" बाई माता,
या दोघा तिघांचे पूर्व सोवाळे,
नवऱ्याला/ नवरीला तेल चढे.


ह्यानंतर वधु/वराची अंघोळ झाली की त्यांच्या पायावर कुंकवाने केळवे काढले जातात म्हणजेच कुंकू भिजवून  (पाणी किंवा तेलात) पायावर स्वस्तिक आणि मेंदी प्रमाणे नक्षी काढली जाते. या वेळी वधु/वराचा मामा हाताला कांकण बांधतो.

मामा मांडीपाट, मामी काढिते रांगोळी,
....माझ्या ग बाळाचे/बाईचे केळवण आजवेळी.

कुठल्याही शुभ कार्यात आपण देवाला विसरत नाही त्यामुळे ग्रामदेवता तसेच गावातील इतर देवतांना न विसरता वधु/वर मंदिरात आशीर्वादासाठी जाण्याची प्रथा आहे, सोबत घरातील तसेच आळीतील मंडळी आणि वाध्यवृंद असतो. मंदिराच्या कळसावर भगव्या रंगाचा बावटा(झेंडा) लावला जातो, वधु/वराच्या हस्ते देवाची यथासांग पूजा करून नारळ फोडला(वाढवला) जातो.


अष्टागर परिसर समुद्राच्या जवळ असल्या कारणाने येथिल कोळी, आगरी तसेच आणखी ब्राह्मणेतर समाज बांधव आपल्या आमंत्रणाला मान देऊन केळवणाच्या दिवशी/रात्री आवर्जून स्नेहभोजनासाठी उपस्थित असतात त्यांच्या संस्कृती मध्ये हळदीच्या कार्यक्रमाला खूप महत्व आहे.

वाजंत्री, नृत्य आणि भरपूर मौज करून केळवणाचा कार्यक्रम आनंदात साजरा केला जातो.

ऑर्डर करा 9637847937


लग्नाआधी म्हणजेच लग्नाला काही दिवस शिल्लक असताना जवळचे नातेवाईक वधुस/वरास केळवणासाठी आमंत्रित करण्याचा प्रघात आहे, यावेळी हळद न लावता फक्त पायावर केळवे काढून औक्षण केले जाते. स्नेहभोजन आणि भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता केली जाते. काही ठिकाणी ह्या केळवणाच्या वेळी हळद लावून मोठा कार्यक्रम केला जातो मात्र वधु/वरास इतर कामानिमित्त बाहेर फिरावे लागत असल्या कारणाने हळद लावणे शक्यतो टाळले जाते.

तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला ही लेखमाला कशी वाटते नक्की कळवा.

धन्यवाद.

पारंपरिक गाण्यांसाठी सौजन्य:- नेहेमी प्रमाणे माझी आत्या "श्रीमती जैमिनी वसंत पंडीत"

पुढील लिंकवर क्लिक करून इतर पोस्ट वाचा. 











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...